Thursday, May 9, 2024
Homeसंपादकीयरविवार मंथनघराला सुंदर बनवणारी डिझाईनर राजेश्री शेळके

घराला सुंदर बनवणारी डिझाईनर राजेश्री शेळके

दी लेडी बॉस: अर्चना सोंडे

“घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती,
तिथे असावा प्रेम-जिव्हाळा, नकोत नुसती नाती”

कवयित्री विमल लिमये यांनी घर कसे असावे याची तंतोतंत व्याख्या या काव्यात केलेली आहे. पूर्वीच्या काळी शेणामातीची घरं असत. त्यावर सुंदर नक्षीकाम केलेले असे. कालांतराने घराची रचना बदलली. शेणामातीची घरे जाऊन आता सिमेंट विटांची घरे आली. या घरांना सुंदर बनवणारी माणसे देखील निर्माण झाली. ती माणसे म्हणजे इंटिरिअर डिझाईनर. ही माणसे साध्या चार भिंतीला राजवाड्याचं रूप देऊ शकतात. एखादा राजमहाल लाजेल एवढी सुंदर रचना हे इंटिरिअर डिझाईनर करतात. जेव्हा इंटिरियर डिझायनर एखादी महिला असेल तेव्हा तिचे घराला घरपण देण्याचे कौशल्य अधिक दर्जेदार असते. या विधानाला साजेसे कर्तृत्व युनिक डिझाईनरच्या संचालिका राजेश्री शेळके यांचे आहे. आजपर्यंत शंभरपेक्षा जास्त घरांना राजेश्री शेळके यांनी आपल्या रचनेने जिवंतपणा दिलाय.

विठ्ठल गावडे हे भारताच्या इंडियन एअरलाइन्समधून सेवानिवृत्त झाले. मात्र त्यांच्या या नोकरीमुळे त्यांचा संसार हा एका ठिकाणी स्थिर नव्हता. सतत भारतातील कोणत्या न कोणत्या शहरात त्यांची बदली होत असे. पदरी दोन मुली आणि एक मुलगा. सोबत पत्नी सुशीलाची खंबीर साथ होती. त्यामुळे बदल्या जरी होत होत्या तरी मुलांकडे सुशीला गावडे बारीक लक्ष द्यायच्या. मुलांचे शिक्षण सुद्धा एकाच शहरात न होता विविध शहरांत झाले. राजेश्रीचं प्राथमिक शिक्षण औंधमध्ये झालं. तर माध्यमिक शिक्षण नालासोपाऱ्याच्या इंग्लिश स्कूलमध्ये झालं. दहावी झाल्यानंतर त्यांनी फॅशन डिझाईनिंगचा कोर्स केला. ९० च्या आसपास राजेश शेळके या होतकरू तरुणासोबत राजेश्रीचा विवाह झाला. एक कन्यारत्न देखील झालं. या सगळ्या घडामोडीत नोकरी करायची संधी मिळालीच नाही. सहा वर्षे राजेश्रीने कुटुंबाला दिली.

१९९६ साली ती एका आर्किटेक्ट फर्ममध्ये नोकरीस लागली. ऑफिस असिस्टंट असं काहीसं ते पद होतं. पगार होता पाच हजार रुपये. दहा वर्षे राजेश्रीने नोकरी केली. “त्या फर्मचे मालक नवीन पाटकर हे माझे या क्षेत्रातील पहिले गुरू. त्यांच्यामुळे मला संगणक शिकता आला. ड्रॉईंग डिझाईन शिकता आलं. असं त्या कृतज्ञतापूर्वक नमूद करतात. १९९५ च्या दरम्यान या फर्मने प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिराचे काम केले होते. त्या कामामध्ये राजेश्री यांचा देखील खारीचा वाटा होता. मात्र स्वत:चं वेगळं काही असावं ही महत्त्वाकांक्षा स्वस्थ बसू देत नव्हती. याच महत्त्वाकांक्षेतून २००३ च्या आसपास अमन इंटरप्राईजेस उदयास आली. या कंपनीच्या माध्यमातून राजेश्री शेळके विविध बँकांच्या पॅनेलवर गेल्या. अनेक बँकांची कार्यालये सुंदर करण्याचं काम त्यांनी केलं. तर काही कार्यालयांना फर्निचर किंवा तत्सम वस्तू देखील पुरवल्या.

निव्वळ मुंबईच नव्हे तर गोवा, सूरत, जयपूर, जोधपूर, अहमदाबाद अशा शहरांतील बँकांची कार्यालये त्यांनी डिझाईन केली. त्यांच्या कामाची पद्धत, डिझाईन, कामाप्रति झोकून देण्याची वृत्ती या साऱ्या गुणांमुळे बँकेच्या वर्तुळात त्या प्रसिद्ध होत्या. याबाबतीत एक किस्सा त्यांच्या कामाची पावती देतो. किस्सा असा आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नरपदी रघुराम राजन यांची निवड झाली होती. त्यांच्या कार्यालयाचे काम १५ दिवसांत पूर्ण करायचे होते. अनेक कंपन्यांनी असमर्थता दर्शवली. राजेश्री शेळके यांनी मात्र हे आव्हान स्वीकारलं. सायंकाळी कार्यालय सुटल्यानंतरच काम करता येणे शक्य होतं. शेळके यांनी आपल्या मजुरांसह त्या बँकेतच तळ ठोकला. अक्षरश: रात्रीचा दिवस करून अवघ्या १५ दिवसांत काम पूर्ण करून दिले. बँक अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणाऱ्या पुण्यामधील एका प्रशिक्षण संकुलाचे काम देखील युनिक डिझाईनर्सने पूर्ण केले.

त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा निवासी घरांकडे वळवला. आतापर्यंत त्यांनी ५०० हून अधिक घरांच्या अंतर्गत सजावटीचे काम पूर्ण केले आहे. मुंबई, नवी मुंबईसह पुणे, गोवा, सूरत, अहमदाबाद अशा शहरातील घरांना देखील शेळके यांनी आपल्या उद्योजकीय सेवेने सौंदर्य बहाल केले आहे. भविष्यात एकाच छताखाली घरच्या सगळ्या सुविधा पूर्ण करेल असे फर्निचर शोरूम उभारण्याचा राजेश्री शेळके यांचा मानस आहे. एका मुलीने उद्योगास सुरुवात केलेली ही उद्योजिका आज २५ हून अधिक लोकांना प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रोजगार देते. अंतर्गत सजावटीच्या सगळ्या सेवा-सुविधा युनिक डिझाईनर्समध्ये मिळतात.

२०१२ पासून राजेश्री शेळके यांचे पती राजेश शेळके यांनी त्यांना मोलाची साथ दिली. त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला आणि आपल्या उद्योजिका पत्नीच्या खांद्याला खांदा लावून सोबत केली. आपल्या पतीमुळे आपला उद्योजकीय प्रवास सुकर झाला असे राजेश्री शेळके आवर्जून सांगतात. “घर खरेदी करताना प्रत्येकाची एक भावना असते. त्याच्या भावना त्या वास्तूशी जोडलेल्या असतात. त्या घरातील एकूण एक कोपरा त्या घरातील व्यक्तींशी जणू संवाद साधत असतो. त्यामुळे त्या सगळ्यांच्या भावनांचा विचार करून आम्ही रचना करतो आणि सजावट करतो. यासाठी अगदी जमिनीवरच्या लादीपासून ते छतापर्यंत, दिवाणघरापासून ते स्वयंपाकघरापर्यंत सर्व घटकांचा विचार केला जातो. घराचं काम करताना ते आपलंच घर आहे या भावनेने त्या घराला आम्ही सेवा देतो” असं राजेश्री शेळके म्हणतात.

घराला स्त्रीशिवाय घरपण नसतं असं म्हणतात; पण घराला घरपणाबरोबरीने सौंदर्य देण्याची जबाबदारीही स्त्रीची असते. सौंदर्य देण्यासाठी समस्त महिला वर्ग झटत असतो. त्यातही ती स्त्री इंटिरिअर डिझाईनर असल्यास आपल्या रचनेने जिवंतपणा देण्याचे काम अधिक शास्त्रीय पद्धतीने करते. युनिक डिझाईनरच्या संचालिका राजेश्री शेळके आपल्या इंटिरिअरच्या कौशल्यातून स्त्री म्हणून वास्तूला फक्त आपलेपण आणि सौंदर्यच देत नाहीयेत तर ती वास्तू रचनात्मक अधिक जिवंत करतात. त्यामुळेच तर त्या लेडी बॉस ठरल्या आहेत.
theladybosspower@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -