Monday, May 6, 2024
Homeटॉप स्टोरीCyclone Biparjoy: आज बिपरजॉय धडकणार! पण....

Cyclone Biparjoy: आज बिपरजॉय धडकणार! पण….

गुजरात आणि महाराष्ट्र प्रशासन सज्ज

कच्छ: अरबी समुद्रात निर्माण झालेलं बिपरजॉय चक्रीवादळ (Cyclone biparjoy) गुजरातच्या (Gujarat) दिशेनं सरकत आहे. बिपरजॉय चक्रीवादळानं रौद्र रुप धारण केलं आहे. हे वादळ आज गुजरातच्या किनारपट्टीवर धडकणार आहे. या पार्श्वभूमीवर गुजरात सरकारनं खबरदारी घेत आतापर्यंत किनारी भागातील ७४ हजार नागरिकांना सुरक्षीतस्थळी हलवले आहे. तसेच एनडीआरएफची (NDRF) ३३ पथके तैनात केली आहेत.

काल गुजरातमधील अनेक भागात मुसळधार पाऊस झाला. तसेच, कच्छमध्ये ३.३ रिश्टर स्केलच्या भूकंपाचे धक्के जाणवले. भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार,आज वाऱ्याचा वेग ताशी १२५ ते १३५ किमी पर्यंत जाऊ शकतो. गुजरातमध्ये जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मात्र, बिपरजॉयची तीव्रता हळूहळू कमी होत आहे असंही हवामान विभागानं म्हटलं आहे. भारतीय हवामान विभागाचे (IMD) महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले की, बिपरजॉय मार्ग बदलून ईशान्य दिशेने कच्छ आणि सौराष्ट्रकडे वळणार आहे. त्यानंतर गुरुवारी सायंकाळी ते जखाऊ बंदराजवळून पुढे जाईल.

हवामान विभागानं अधिकाऱ्यांना गीर, सोमनाथ आणि द्वारका सारख्या लोकप्रिय ठिकाणी पर्यटकांच्या हालचाली मर्यादित ठेवण्यास सांगितले आहे. लोकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आवाहन केले आहे. सोसाट्याच्या वार्‍यामुळे गवताची घरे पूर्णपणे उद्ध्वस्त होण्याची, तर कच्च्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान आणि पक्क्या घरांचे किरकोळ नुकसान होण्याची शक्यता आहे.

तीनही दले वादळाचा सामना करण्यास पुर्ण तयारीत

दरम्यान, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल तिन्ही सेना प्रमुखांशी चर्चा केली.  चक्रीवादळ बिपरजॉयच्या प्रभावांना तोंड देण्यासाठी सशस्त्र दलांच्या तयारीचा आढावा घेतला. राजनाथ सिंह म्हणाले की, चक्रीवादळामुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सशस्त्र दल सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे. तिन्ही सेना प्रमुखांशी बोलून बिपरजॉय चक्रीवादळाच्या संदर्भात सशस्त्र दलांच्या सज्जतेचा आढावा घेतला. लष्कर, नौदल आणि सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) देखील मदत आणि बचाव कार्यासाठी सज्ज आहेत.

एनडीआरएफच्या तुकड्या महाराष्ट्रात आणि गुजरातमध्ये तैनात

चक्रीवादळाचा संभाव्य ठोठावण्यापूर्वी, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाने (NDRF) गुजरात आणि महाराष्ट्रात मदत आणि बचाव कार्य करण्यासाठी एकूण ३३ तुकड्या नेमल्या आहेत. त्यापी १८ तुकड्या गुजरातमध्ये ठेवण्यात आल्या आहेत, तर एक तुकडी दीवमध्ये तैनात करण्यात आली आहे. दीवच्या उत्तरेला गुजरातमधील गिर सोमनाथ आणि अमरेली जिल्ह्यांनी आणि तिन्ही बाजूंनी अरबी समुद्राने वेढलेले आहे. गुजरातमध्ये एनडीआरएफच्या तैनातीबाबत माहिती देताना अधिकाऱ्यांनी सांगितले की, कच्छ जिल्ह्यात एनडीआरएफच्या चार, राजकोट आणि देवभूमी द्वारकामध्ये प्रत्येकी तीन, जामनगरमध्ये दोन, पोरबंदर, जुनागढ, गिर सोमनाथ, मोरबी, वलसाड आणि गांधीनगरमध्ये प्रत्येकी एक पथक तैनात करण्यात आले आहे. एक टीम तैनात करण्यात आली आहे.

महाराष्ट्रात, एकूण १४ तुकड्यांपैकी पाच मुंबईत तैनात करण्यात आल्या आहेत. तर बाकीच्या स्टँडबायवर ठेवण्यात आल्या आहेत. या प्रत्येक तुकडीमध्ये सुमारे ३५ ते ४० कर्मचारी आहेत. मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यांवर सर्व ६ सार्वजनिक समुद्रकिनाऱ्यांवर १२० जीवरक्षक नेमण्याचा निर्णय बीएमसीने घेतला आहे.

अमित शहा यांनी ओडीशा दौरा पुढे ढकलला

दरम्यान, चक्रीवादळ बिपरजॉयच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी १७ जून रोजी होणारा ओडिशा दौरा पुढे ढकलला आहे. पंतप्रधान मोदी आणि शाह हे दोघेही चक्रीवादळावर थेट लक्ष ठेवून आहेत. त्यामुळं केंद्रीय गृहमंत्र्यांना शनिवारी ओडिशाचा दौरा करणे शक्य होणार नाही. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनीही चक्रीवादळाच्या उद्रेकाला तोंड देण्याच्या तयारीचा आढावा घेतला असून ते राज्य सरकारच्या आपत्कालीन केंद्रालाही भेट देत आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -