Sunday, April 28, 2024
Homeताज्या घडामोडी'एसटीचे ब्रँड अ‍ॅम्बेसिडर' विनोदवीर मकरंद अनासपुरे

‘एसटीचे ब्रँड अ‍ॅम्बेसिडर’ विनोदवीर मकरंद अनासपुरे

एसटी प्रवासाशी अनेक आठवणी जोडलेल्या आहेत, हा कधीही न विसरता येणारा प्रवास : मकरंद अनासपुरे

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी महामंडळाच्या संदर्भात एक महत्वाची घोषणा केली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला ‘स्वच्छ सुंदर एसटी बस स्थानक’ हा उपक्रम आणखी प्रभावी व्हावा यासाठीची ही घोषणा आहे. मराठी मनोरंजन सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते, विनोदवीर मकरंद अनासपुरे यांची एसटी महामंडळाचे ब्रँड अ‍ॅम्बेसिडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या नावाची घोषणा करुन त्यांना शुभेच्छाही दिल्या आहेत. अनासपुरेंच्या एसटीच्या सदिच्छादूत पदाच्या नियुक्तीवर चाहते अत्यंत खूश आहेत.

सन २००३ साली महामंडळाचे सदिच्छा दूत म्हणून ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची नियुक्ती करण्यात आलेली होती. आता तब्बल २० वर्षांनी त्या जागी मकरंद अनासपुरे यांची निवड करण्यात आली आहे. ग्रामीण भागाची जाण असलेला, स्पष्ट वक्ता आणि दांडगा जनसंपर्क आणि एसटीने प्रवास केलेला असे एसटी महामंडळाच्या सदिच्छा दूताचे निकष होते, त्यात मकरंद अगदी योग्य ठरले.

समाजमाध्यमांतून चाहते त्यांच्यावर अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव करीत आहेत. अभिनेते मकरंद अनासपुरे यांनीही आपल्याला मिळालेल्या नव्या जबाबदारीप्रती आनंद व्यक्त केला आहे. यापूर्वी अनेकदा शुटींगच्या निमित्तानं एसटीमधून प्रवास केल्याने नवी जबाबदारी पार पाडताना त्याचा मला फायदा होईल, असं ते म्हणतात. एसटीच्या वेगवेगळ्या योजनाही त्यांना माहित असल्याचं ते सांगतात. एसटी प्रवासाशी अनेक आठवणी जोडलेल्या आहेत, हा कधीही न विसरता येणारा प्रवास आहे. महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं जी घोषणा करण्यात आली आहे ती समाधानकारक आणि आनंदी आहे, अशी भावना मकरंद यांनी यावेळी व्यक्त केली आहे. एसटीचा प्रवास अत्यंत जवळचा असल्याने एसटीसाठी जे काही करता येईल ते करण्यावर आपण भर देणार असल्याचे आणि प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी म्हटले.

आपल्या अभिनय क्षेत्रातील यशाचे सारे श्रेय ते नाना पाटेकर यांना देतात. त्यांच्यामुळेच त्यांना अभिनय क्षेत्रामध्ये येऊन करिअर करण्याची हिंमत मिळाली होते असे ते नेहमीच आपल्या मुलाखतीमध्ये सांगताना दिसून येतात. नाना पाटेकर यांच्यासोबत त्यांनी ‘नाम फाउंडेशन’ नावाची एक संस्था चालू केली आहे. दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्याच्या उद्देशाने या दोघांनी मिळून ही संस्था सप्टेंबर २०१५ मध्ये चालू केली असून त्या माध्यमातून ते राज्यात दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना खूप मदत करतात.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -