Sunday, April 28, 2024
Homeमहत्वाची बातमीEknath Shinde : अडीच वर्षांत ‘वर्षा’ची माडी उतरला नाहीत, माझ्या दाढीपर्यंत केव्हा...

Eknath Shinde : अडीच वर्षांत ‘वर्षा’ची माडी उतरला नाहीत, माझ्या दाढीपर्यंत केव्हा पोहोचाल?

दाढीवरील टीकेवरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना सणसणीत टोला

धाराशिव : शिवसेनेच्या (Shivsena) ‘मिशन ४८ शिवसंकल्प ध्येय भगव्या महाराष्ट्राचे’ या अभियानांतर्गत धाराशिव (Dharashiv) तालुक्यातील ढोकी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत मेळावा पार पडला. यावेळी त्यांनी सरकारची विधायक कामे सांगत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) निशाणा साधला. उद्धव ठाकरे यांनी कोकणातील सभेत मुख्यमंत्र्यांवर टीका करत ‘मिंध्यांच्या दाढीला पकडून कुठूनही खेचून आणले असते’, असे वक्तव्य केले होते. त्याला या सभेत मुख्यमंत्र्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. ‘तुम्ही अडीच वर्षांत ‘वर्षा’ची माडी उतरला नाहीत, माझ्या दाढीपर्यंत केव्हा पोहोचाल?’ असा सणसणीत टोला त्यांनी लगावला.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, अडीच वर्षे वर्षा बंगल्याच्या माडीत उतरला नाहीत, माझ्या दाढीपर्यंत केव्हा पोहोचाल? याच दाढीला तुमच्या अनेक नाड्या माहिती आहेत. माझ्या नादाला लागू नका, असा इशारा त्यांनी दिला. पुढे ते म्हणाले, शिवसेना चोरली, असे रोज गावभर सांगत फिरता. अरे तुमच्याकडे लोक आहेत कुठे, रोज किती रडणार? शिवसेना आणि बाळासाहेब या चोरायच्या वस्तू आहेत? त्यांना बाळासाहेबांचे विचार नको, पैसे हवे आहेत, अशी टीका शिंदे यांनी केली.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, गत विधानसभेला बाळासाहेबांचे विचार सोडून तुम्ही वागलात. त्यामुळे शिवसेना वाचविण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या भाळी आलेला बेईमानीचा शिक्का पुसण्यासाठी आम्ही धाडसी निर्णय घेतला. स्वतःला मर्द समजता, तर दररोज मर्द आहोत म्हणून सांगत कशाला सुटता? असे ओरडून सांगण्याची वेळ तुमच्यावर का येते? असा खोचक प्रश्नही मुख्यमंत्र्यांनी विचारला.

आम्ही जो शब्द देतो तो पाळतो

मराठा समाजाने अनेक लोकांना मोठे केले, सत्ता दिली. मात्र, या नेत्यांनी संधी असताना त्यांना आरक्षणापासून वंचित ठेवले, याची मला खंत आहे. कुणबी नोंदी असताना दाखले मिळत नव्हते, ते आता दिले जात आहेत. ज्यांच्याकडे नोंदी नाहीत, त्यांना कायद्याच्या चौकटीत बसणारे टिकणारे आरक्षण देत ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देण्याची निर्णय घेतला. आम्ही जो शब्द देतो तो पाळतो, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

तुमच्यासारखा सरडा कोठे पाहिला नाही

अयोध्येत राममंदिर बांधून बाळासाहेबांचे स्वप्न खऱ्या अर्थाने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पूर्ण केले. बाळासाहेब आजघडीला असते, तर त्यांची छाती भरून आली असती. सत्तेच्या मोहापोटी, लालसेपोटी झटपट रंग बदलणारा सरडा आपल्या रूपाने अद्याप मी दुसरा पाहिलेला नाही, अशी टीका मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -