Thursday, May 9, 2024
Homeक्रीडाचेन्नई विरुद्ध गुजरात टायटन्स

चेन्नई विरुद्ध गुजरात टायटन्स

मुंबई (प्रतिनिधी) : सुपर संडे अर्थात आजही दोन सामन्यांचा दिवस असून पहिल्या सामन्यात दुपारी गुजरात टायटन्स आणि प्लेऑफच्या शर्यतीतून आधीच बाहेर पडलेला चेन्नई सुपर किंग्ज हे दोन संघ आज आमने-सामने असतील. हा या हंगामाचा अंतिम दुहेरी-हेडर असेल. प्लेऑफसाठीच्या पात्रतेच्या बाबतीत या दोन संघांच्या भवितव्यावर आधीच शिक्कामोर्तब झाले आहे. कारण, गुजरात हा या हंगामात प्लेऑफसाठी पात्र ठरणारा पहिला संघ ठरला आहे, तर चेन्नई प्लेऑफच्या शर्यतीतून बाद झाला आहे.

प्लेऑफच्या शर्यतीतून आपले स्थान गमावलेला चेन्नई जेथे सन्मान वाचवण्याचा प्रयत्न करतील, तर दुसरीकडे, गुजरात टॉप २ मध्ये आपले स्थान निश्चित करण्याचा प्रयत्न करतील. गुजरात १८ गुणांसह अव्वल स्थानावर आहे; परंतु आणखी एका विजयामुळे अव्वल २ मध्ये त्यांचे स्थान पक्के होईल. ज्यामुळे कोणताही संघ त्यांना टॉप २ मधून बाहेर काढू शकणार नाही. टॉप २ मध्ये स्थान मिळवणे म्हणजे त्या संघाला अंतिम फेरीत जाण्याची अतिरिक्त संधी मिळेल.

गत सामन्यात गुजरातने या मोसमात पदार्पण करणाऱ्या लखनऊ सुपर जायंट्सचा ६२ धावांनी पराभव केला होता आणि यासह त्यांनी प्लेऑफमध्येही स्थान निश्चित केले होते, तर सीएसकेला गत सामन्यात मुंबई इंडियन्सकडून ५ विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला होता.

पुनरागमन करणे गुजरातचे सर्वात मोठे वैशिष्ट्य असून गुजरातच्या गौरवशाली वाटचालीत सर्वात मोठे योगदान सलामीवीर शुबमन गिल, कर्णधार हार्दिक, डेव्हिड मिलर, वृद्धिमान साहा आणि राहुल तेवतिया यांचे आहे, जे शानदार फलंदाजी करत आहेत. कठीण परिस्थितीतही पुनरागमन करणे हा टायटन्सचा सर्वात मोठा गुण आहे. मात्र गेल्या काही सामन्यांमध्ये पांड्या, मिलर आणि तेवतिया यांची लय काहीशी हरवलेली दिसत आहे. गुजरातची मजबूत बाजू म्हणजे त्याचे गोलंदाजी आक्रमण, ज्यात मोहम्मद शमी, लॉकी फर्ग्युसन आणि रशीद खान सारखे जागतिक दर्जाचे गोलंदाज आहेत. शमीने आतापर्यंत १६ बळी घेतले आहेत आणि तो गुजरातचा सर्वात यशस्वी गोलंदाज आहे.

आयपीएलच्या इतिहासातील आतापर्यंतचा दुसरा सर्वात यशस्वी संघ असलेल्या चेन्नईबद्दल सांगायचे तर, स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच अनेक गोष्टी त्यांच्या विरोधात गेल्या. टूर्नामेंट सुरू होण्यापूर्वी धोनीने रवींद्र जडेजाकडे कर्णधारपद सोपवले, ते चुकीचे ठरले. स्पर्धेच्या मध्यावर येता येता जाडेजाने कर्णधारपद सोडत पुन्हा धोनीवर ही जबाबदारी सोपवली.

ठिकाण : वानखेडे स्टेडियम वेळ : दुपारी ३.३० वाजता

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -