Saturday, April 27, 2024
Homeमहत्वाची बातमीएक चैतन्यदायी व्यक्तिमत्त्व

एक चैतन्यदायी व्यक्तिमत्त्व

  • एकनाथ शिंदे मुख्यमंत्री

आपले पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांचा वाढदिवस आहे. सुरुवातीलाच मी त्यांना वाढदिवसानिमित्त आदरपूर्वक शुभेच्छा देतो, त्यांचे अभीष्टचिंतन करतो. आपण सर्वच मोदीजी यांच्या गुजरातचे मुख्यमंत्री ते भारताचे पंतप्रधान या प्रवासाचे, वाटचालीचे साक्षीदार आहोत. त्यांची ही वाटचाल विलक्षण आहे. यात त्यांनी अनेक स्थित्यंतरे अनुभवली आहेत. यातूनच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण झाली असावी, असे वाटते.

माझा आणि मोदीजी यांचा परिचय तसा जुना आहे. युतीच्या सुरुवातीच्या काळातही ते महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असत. त्यातही कधीमधी भेट होत असे. शिवसेनाप्रमुख हिंदुहृयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याशी त्यांचे स्नेहांचे संबंध होते. बाळासाहेब आजही त्यांना आदरस्थानी आहेत. त्यांच्याविषयी ते खूप भरभरून बोलतात, असा अनुभव आहे. मला त्यांचा गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून २००९मध्ये युतीच्या प्रचारार्थ केलेला महाराष्ट्र दौराही आजही चांगलाच आठवतो. त्यांची कार्यशैली, ऊर्जावान, चैतन्यदायी व्यक्तिमत्त्वाचा माझ्यावर चांगलाच प्रभाव आहे, असे म्हणावे लागेल. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब आणि माझे गुरू धर्मवीर आनंद दिघे आणि मोदी यांच्या व्यक्तित्त्वातील अनेक साम्यस्थळे मला जाणवत राहतात. या दोघांच्या कार्यशैलीची चुणूकही मला जाणवली आहे.

खरं तर आज बाळासाहेब असते, तर त्यांनी मोदीजी यांच्यावर कौतुकाचा वर्षावच केला असता. हिंदुत्व हे बाळासाहेबांनी कसोशीने जतन केले. अयोध्येतील राम मंदिराच्या मुद्द्यावरून तर बाळासाहेबांची प्रतिमा आणखी उजळून निघाली. राम मंदिर आज पूर्णत्वास जात आहे. त्यामागे मोदीजी यांची सर्वच क्षेत्रांतील धोरणी भूमिका, मुत्सदेगिरी आहे, हे बाळासाहेबांनीही मान्य केले असते. ‘मी जर पंतप्रधान झालो, तर कश्मीरमधील कलम ३७० रद्द करेन’ असे बाळासाहेब छातीठोकपणे म्हणत. आता तर हे कलम रद्द झालेही आहे. ते रद्द करण्याची किमयाही त्यांनी लीलया करून दाखवली. मग अशा या आपल्या पंतप्रधानांचे मुंबईतील स्वागत कसे झाले असते, कल्पना करा. त्यांच्या स्वागतासाठी बाळासाहेबांनी त्यांच्या खासियतनुसार अभिनंदन सोहळ्याची आणि कौतुकाची तोरणेच बांधली असती, असे राहून राहून वाटते.

मुख्यमंत्री म्हणून मोदीजी यांनी गुजरात राज्याच्या विकासाला दिशा दिली. गुजरातचे मुख्यमंत्री म्हणूनही त्यांनी आपल्या विकासदृष्टीचा परिचय करून दिला आहे. आजचा समृद्ध गुजरात दिसतो आहे, त्याच्या उभारणीत त्यांचा निश्चितच मोठा वाटा आहे. गुजरातचे विकासाचे मॉडेल हे त्यांचे म्हणजे मोदीजी यांचे मॉडेल म्हणून ओळखले जाते.

माणसाला आपल्या संघर्षशील प्रवासाची आपल्याहून मोठ्या व्यक्तिमत्त्वांच्या प्रवासाशी तुलना करण्याची सवय असते. मलाही मग माझा संघर्षशील प्रवास आणि मोदीजी यांचा प्रवास यातही मला साधर्म्य असल्याचे भासत राहते. यातूनच तेही कणखर आणि दुर्दम्य आशावादी बनले असावेत. माझ्याही बाबतीत आघात आणि संघर्षच वाट्याला आले. पण धर्मवीर दिघे यांनी माझ्या पाठीवर हात ठेवला आणि मीही डगमगलो नाही. बाळासाहेब काय, धर्मवीर काय आणि पंतप्रधान मोदीजी या सगळ्यांकडून मी प्रेरणा घेत आलो आहे. या सर्वांची नजर नेहमीच भव्य-दिव्य गोष्टींकडे लागून राहिलेली असते. पण पाय जमिनीवरच असतात, हे मी त्यांच्याकडून शिकलो. उदाहरणेच घेतली, तर अनेक सांगता येतील. आता हेच पाहा ना, अनेक मोठ्या प्रकल्पांची पायाभरणी असो किंवा प्रकल्प पूर्णत्वानंतरचे लोकार्पण. पंतप्रधान मोदींनी या प्रकल्पावर काम करणाऱ्या छोट्यात-छोट्या मजूर, कामगार-कष्टकऱ्यांची दखल घेतली. त्यांच्याशी संवाद साधला. त्यांना त्यांच्या कामाचं श्रेय दिले. त्यांनासोबत घेऊन त्यांचा सन्मानही केला. हे असं याआधी झालं नव्हतं. हेच मोदीजी यांचं वैशिष्ट्य आहे.

पंतप्रधान मोदी यांची अलीकडे त्यांची वारंवार भेट व्हावी असे योग जुळून आले. ते कशामुळे तेही नव्याने सांगण्याची गरज नाही. आता तर थेट मोदीजी यांचेच मार्गदर्शन मिळते आहे. सोबतीला तितक्याच धडाडीचे आणि राजकारणापासून, प्रशासनातील अनुभवी अशा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची साथ आहे. त्यामुळे आमच्या दोघांच्या चर्चांमधूनही पंतप्रधान मोदींजी यांना अपेक्षित असलेल्या देश, राज्य आणि एकूणच सर्वच क्षेत्रांतील विकासकामांची, प्रकल्पांची नेहमीच चर्चा होते. थेट त्यांच्यांशी झालेल्या काही मोजक्या क्षणातून, बातचित, चर्चांमधून त्यांच्या ठायी देश आणि तळागातील प्रत्येक घटकाविषयी असलेली तळमळ तीव्रतेनं जाणवत राहिली. त्यांच्या बोलण्यात देश आणि देशातील प्रत्येक गोष्टीचा विकास याचाच ध्यास हाच होता. विशेषतः विकासाचा हा रथ आपल्या सर्वांनी सांघिक प्रयत्नांतून पुढे न्यायचा आहे, असं आग्रही सांगणंही लक्षात राहिले.

या सगळ्यात मला भावते ती मोदीजी यांची कार्यशैली. मला नेहमीच पत्रकार आणि जवळची मंडळी विचारतात, तुम्ही रात्र-रात्र आणि पहाटेपर्यंत काम करता, त्यामागे रहस्य काय? तर यात पंतप्रधान मोदींजी यांच्या कार्यप्रवण, सदैव ऊर्जेने भारलेल्या कार्यशैलीची प्रेरणा हे एक कारण निश्चितच आहे, हे प्रांजळपणे सांगतो.

मोदीजी यांच्याकडे धडाडी तर आहेच. पण घेतलेल्या निर्णयावर ठाम राहण्याची दृढनिश्चयी वृत्तीही आहे. लंब्याचौड्या बैठका, आढावा यापेक्षा त्यांची भिस्त फलनिष्पत्ती होऊ शकणाऱ्या गोष्टींवर असते. त्यामुळे बैठका आणि चर्चा अघळपघळ न होता, त्यातून लगोलग निर्णय घेतले जातात. प्रभावी अशी अंमलबजावणी सुरू होते. या सगळ्या गोष्टीचं प्रतिबिंब आपण डिजिटल इंडिया, बुलेट ट्रेन, गंगा नदीची स्वच्छता अशा अनेक आणि कित्येक प्रकल्पांमध्ये पाहू शकतो. आत्मनिर्भर भारत असो की, आपल्या संरक्षण दलाची सज्जता, या सगळ्या आघाड्यांवर मोदीजी यांनी आपल्या नेतृत्वगुणाचा जगाला परिचय करून दिला आहे. जगभरातील अनेक बलाढ्य देशांना आणि त्यांच्या नेतृत्वाला, तेथील नागरिकांना मोदीजी यांच्याविषयी अप्रूप आहे, हे आपण पाहतोच.

एकविसाव्या शतकाच्या उदयाबरोबरच आपल्या देशाला नरेंद्र मोदी यांच्यासारखे नेतृत्व लाभले. हेच आपल्या सर्वांसाठी आणि खंडप्राय देशासाठी अत्यंत स्वर्णीम असा योग आहे. उत्तरोत्तर मोदीजी यांच्या नेतृत्वाच्या पैलूंनी देश, जगाचे क्षितीजही उजळून निघेल, असा विश्वास आहे. याच शब्दांसह आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उत्तम दीर्घायुरारोग्य लाभावे, अशी मनोकामना करतो, त्यांना वाढदिवसाच्या हृदयपूर्वक शुभेच्छा देतो.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -