Saturday, August 29, 2026

Manoj Bajpayee : अभिनेता मनोज बाजपेयीनं महाराष्ट्रात कुठे आणि किती जमीन खरेदी केली ?

Manoj Bajpayee : अभिनेता मनोज बाजपेयीनं महाराष्ट्रात कुठे आणि किती जमीन खरेदी केली ?

मुंबई : मुंबई का किंग कौन भिक्खू म्हात्रे या सत्या चित्रपटातील डायलॉगमुळे १९९८ मध्ये अभिनेता मनोज बाजपेयी प्रचंड लोकप्रिय झाला. यानंतर त्याने अनेक चित्रपटांतून आणि वेबसीरिजमधून काम केले. पण मुंबई का किंग ही त्याची ओळख चाहत्यांच्या मनात आजही घर करून आहे. चाहत्यांच्या लाडक्या असलेल्या या अभिनेत्यानं महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात स्थावर मालमत्तेत मोठी गुंतवणूक केली आहे. त्याने मुळशी तालुक्यात जमीन खरेदी केली आहे.

मनोज बाजपेयीनं लोणावळ्याजवळील मुळशी तालुक्यात ४.४५ एकर म्हणजेच १.८० हेक्टर शेतजमीन खरेदी केली आहे. या व्यवहाराची अधिकृत नोंदणी झाली आहे. प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन डॉक्युमेंटनुसार, मनोज बाजपेयीसोबत मोठ्या जमिनीसाठी मोठ्या रकमेचा व्यवहार झाला आहे.

पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात तैल बैल गावात मनोज बाजपेयीने खरेदी केलेल्या जमिनीची नोंदणी २५ ऑगस्ट २०२६ रोजी झाली आहे. मनोज बाजपेयीने जमिनीच्या खरेदीसाठी ६.८६ लाख रुपयांची स्टॅम्प ड्युटी आणि ३० हजार रुपयांची रजिस्ट्रेशन फी भरली आहे. त्याने विमलचंद खिमराज जैन यांच्याकडून एक कोटी ३७ लाख ३१ हजार रुपयांना जमिनीची खरेदी केली आहे. याआधी त्याने मुंबईतील ओशिवराच्या वीरा देसाई मार्ग येथे सिग्नेचर बिल्डिंगमध्ये ३२ कोटी रुपये खर्चून चार व्यावसायिक ऑफिसच्या जागा खरेदी केल्या होत्या. या व्यवहारासाठी त्याने १.८६ कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटी दिली होती.

मुळशी हा तालुका निसर्गसौंदर्य आणि मुळशी धरणासाठी प्रसिद्ध आहे. या भागात अनेकजण फार्महाऊस आणि वीकेंड होम्ससाठी गुंतवणूक करतात. शहरात राहणारे अनेक उच्च मध्यमवर्गीय आणि श्रीमंत नागरिक निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी मुळशी तालुक्यात गुंतवणूक करत आहेत. आता मनोज बाजपेयीनेही मुळशी तालुक्यात गुंतवणूक केली आहे.

अभिनेता मनोज बाजपेयी मागील तीन दशकांहून अधिक काळ चित्रपटांतून आणि वेबसीरिजमधून काम करत आहे. 'सत्या', 'गँग्स ऑफ वासेपूर', 'अलीगढ', 'गव्हर्नर' आणि लोकप्रिय वेब सिरीज 'द फॅमिली मॅन'मधून त्याने स्वतःची ओळख निर्माण केली आहे. अभिनय क्षेत्रात चमकत असलेल्या मनोज बाजपेयीनं आता स्थावर मालमत्तेच्या क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात गुंतवणूक सुरू केली आहे. त्याची महत्त्वाची भूमिका असलेला 'लास्ट मॅन इन टॉवर' हा चित्रपट ११ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >