Wednesday, August 26, 2026

Sunetra Pawar : चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे निर्देश

Sunetra Pawar : चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे निर्देश

पुणे : चाकण परिसरातील अनेक समस्या वर्षानुवर्षे प्रलंबित असून, त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सर्व संबंधित शासकीय यंत्रणा आणि संस्थांनी समन्वयाने काम करण्याची गरज आहे. चाकणच्या विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीने तयार केलेल्या रोडमॅपनुसार कामाला गती देण्यात यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार (Sunetra Pawar) यांनी दिले.

शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी चाकण परिसरातील रस्ते, वाहतूक कोंडी, पार्किंग, कचरा व्यवस्थापन, अतिक्रमण आणि सुरक्षाव्यवस्थेसह विविध प्रश्नांचा आढावा घेतला.

३१ ऑगस्टपर्यंत खड्डे बुजवण्याचे निर्देश :

चाकण परिसरातील रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न तातडीने सोडवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ३१ ऑगस्टपर्यंत रस्त्यांवरील खड्डे आणि साईडपट्ट्यांची दुरुस्ती पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत. कामात दिरंगाई झाल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. वाहतूक कोंडीची ठिकाणे निश्चित करून त्यावर तातडीने तसेच दीर्घकालीन उपाययोजना करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

वाहतूक व्यवस्थेसाठी १०० जवानांची नियुक्ती :

चाकणचा औद्योगिक विस्तार आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता सुरक्षाव्यवस्था अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात येणार आहे. वाहतूक नियंत्रणासाठी महाराष्ट्र सुरक्षा दलाचे १०० अतिरिक्त जवान पुढील आठवड्यापासून तैनात करण्यात येणार आहेत. आवश्यकतेनुसार नवीन पोलीस ठाणी उभारण्याबाबतही कार्यवाही सुरू असल्याचे सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी सांगितले. दर शुक्रवारी संबंधित विभागांची बैठक घेऊन सुरू असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात येणार आहे.

पार्किंग आणि जड वाहनांवरही उपाययोजना :

चाकण परिसरातील पार्किंगचा प्रश्न सोडवण्यासाठी उपलब्ध जागांचा योग्य वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. एमआयडीसी परिसरातील पार्किंगच्या जागा एका आठवड्यात सुरू करून रस्त्यावर उभे राहणारे ट्रक या ठिकाणी हलवण्यात येणार आहेत. गर्दीच्या वेळेत जड वाहनांवर निर्बंध आणण्यासोबतच औद्योगिक कंपन्यांच्या शिफ्टच्या वेळांमध्ये बदल करण्याबाबतही सूचना देण्यात आल्या आहेत. (Sunetra Pawar)

अतिक्रमणांवर महिनाभरात कारवाई :

चाकण परिसरातील अतिक्रमणांचा प्रश्नही प्राधान्याने हाती घेण्यात येणार आहे. रस्त्यांवरील अतिक्रमणे हटवण्याची कारवाई येत्या शुक्रवारपासून सुरू करून ती महिनाभरात पूर्ण करण्याचे नियोजन आहे. अतिक्रमण काढताना कोणाचीही गय केली जाणार नाही. मात्र, स्थानिक नागरिक, उद्योजक, संस्था आणि लोकप्रतिनिधींनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन सुनेत्रा पवार यांनी केले. (Sunetra Pawar)

कचरा व्यवस्थापनासाठी प्रक्रिया प्रकल्प :

चाकणमध्ये येताना रस्त्यांच्या कडेला मोठ्या प्रमाणात कचरा आणि प्लास्टिक दिसणे ही चिंतेची बाब असल्याचे सुनेत्रा पवार यांनी सांगितले. कचरा व्यवस्थापनासाठी एमआयडीसीशी चर्चा करण्यात आली असून १९ गावे आणि एमआयडीसी क्षेत्रासाठी कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याची कार्यवाही सुरू आहे. प्लास्टिक कचऱ्यावरही तातडीने उपाययोजना करण्यात येणार आहेत. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी वॉकवे आणि सुरक्षित रस्त्यांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले. (Sunetra Pawar)

वाहतूक कोंडीसाठी 'ॲक्शन प्लॅन' :

पुणे-चाकण औद्योगिक पट्ट्यातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी विविध विभागांच्या समन्वयातून अल्प, मध्यम आणि दीर्घकालीन उपाययोजनांचा ‘ॲक्शन प्लॅन’ तयार करण्यात आला आहे.

चाकणमधील रस्ते, वाहतूक, कचरा व्यवस्थापन, पार्किंग, सुरक्षा, अतिक्रमण, गृहनिर्माण सोसायट्या आणि शाळांशी संबंधित प्रश्नांवर टप्प्याटप्प्याने कार्यवाही करण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनीही औद्योगिक पट्ट्यातील वाढते नागरिकीकरण आणि वाहतुकीचे प्रमाण लक्षात घेऊन वाहतूक व्यवस्थापनावर अधिक लक्ष केंद्रित करण्यात येत असल्याचे सांगितले. (Sunetra Pawar)

बैठकीला खेड-आळंदीचे आमदार बाबाजी काळे, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव डॉ. राजेश देशमुख, पीएमआरडीए आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांच्यासह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी, उद्योजक आणि स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. (Sunetra Pawar)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >