· महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात संवाद कार्यक्रम
· पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार संबोधित
मुंबई : हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त २९ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात येतो. या राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त २७ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित विशेष कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी आभासी माध्यमातून ' युवा कनेक्ट ' कार्यक्रमांतर्गत देशभरातील १,६०० ठिकाणांवरील ८ लाखांहून अधिक युवकांना संबोधित करणार आहेत. युवा सहभाग, क्रीडा विकास आणि राष्ट्रनिर्माणावर भर देणाऱ्या या उपक्रमामुळे विविध भागांतील युवक एका समान राष्ट्रीय व्यासपीठावर जोडले जाणार आहेत, अशी माहिती मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत केंद्र शासनाच्या क्रीडा व युवक तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत असलेल्या माय भारत - महाराष्ट्र विभागाचे राज्य संचालक अमित पुंडे यांनी दिली.
यावेळी महाराष्ट्रचे राज्य संचालक अमित पुंडे, माय भारत, मुंबईचे उपसंचालक अनूप इंगोले, भारतीय क्रीडा प्राधिकरण (स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया - SAI) चे उपसंचालक माधव कांबळे उपस्थित होते.
अमित पुंडे म्हणाले, महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच मुंबई येथे आयआयटी, पवई येथे केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. पुणे येथे केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे भुसावळ (जि. जळगाव) उपस्थित असतील.
- मंत्री नितेश राणे यांनी घेतली केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांची भेट - गेटवे ऑफ इंडियावरील प्रवासी शुल्क तर्कसंगत करण्याचीही विनंती मुंबई : ...
माय भारत, भारतीय क्रीडा प्राधिकरण आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या सहकार्याने देशभरात खेलो इंडिया संवाद आयोजित करण्यात येत आहे. भारतातील युवक, खेळाडू आणि क्रीडा व्यावसायिकांना एकत्र आणणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. देशातील प्रत्येक जिल्ह्यातील दोन महाविद्यालयांमध्ये युवा कनेक्ट आयोजित करण्यात येणार आहे. आयआयटी पवई, सिम्बॉयसिस आणि एम्स नागपूर यांसारख्या संस्थांमध्येही हा उपक्रम राबविण्यात येईल.
कार्यक्रमात युवकांना खेळाडू, खासदार, आमदार, मंत्री आणि स्थानिक नेत्यांशी थेट संवाद साधता येणार आहे. तसेच भारतीय क्रीडा क्षेत्राच्या भविष्यासाठी आपले विचार आणि आकांक्षा मांडण्याची संधी मिळणार आहे. गेल्या १२ वर्षांतील भारताच्या क्रीडा परिसंस्थेतील परिवर्तनाचा प्रवास अधोरेखित करणे आणि युवकांच्या आकांक्षा जाणून घेणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.
सहभागी युवकांना संकेत सरगर, स्वप्नील कुसाळे, रुझा भोसले, प्रीतम साळवे, फाल्गुनी पिल्लई आणि पूर्वा जाधव यांच्यासह नामांकित खेळाडूंशी संवाद साधता येणार आहे. या चर्चेत खेळाडूंचा क्रीडा प्रवास तसेच भारतीय क्रीडा पायाभूत सुविधा आणि क्रीडा परिसंस्थेत झालेल्या परिवर्तनावर चर्चा केली जाईल, असेही यावेळी पुंडे यांनी सांगितले.
युवा संवादात क्रीडा परिसंस्था मजबूत करणे, २०३६ ऑलिम्पिकसाठी वैज्ञानिक पद्धतीने प्रतिभा ओळखून खेळाडू विकसित करणे, युवा नेतृत्वाला शासन प्रक्रियेत अर्थपूर्ण सहभागासाठी प्रोत्साहन देणे आणि विकसित भारतासाठी युवकांना आवश्यक कौशल्ये, स्वयंसेवा व राष्ट्रनिर्माणाच्या संधींशी जोडणे या चार प्रमुख विषयांवर विचारमंथन होणार आहे, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.
युवकांच्या सूचना क्यूआर कोडद्वारे संकलित करून त्यांच्या कल्पना आणि विचारांची नोंद केली जाईल. सहभागींना कार्यक्रमस्थळी व्हीबीवायएलडी क्विझ मध्ये सहभागी होण्यासाठीही प्रोत्साहित करण्यात येणार आहे.





