मुंबई : महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. काही भागांत हलका ते मध्यम पाऊस होत असला, तरी जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. त्यामुळे अनेक भागांत पावसाची तूट निर्माण झाली असून शेतकरी आणि नागरिकांमध्ये चिंता आहे. गेल्या काही दिवसांत मध्य महाराष्ट्र, घाटमाथा आणि विदर्भातील काही भागांत पावसाने हजेरी लावली. मात्र, २६ ऑगस्ट रोजी राज्यातील बहुतांश भागांत हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज असून ४ भागांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. (Maharashatra Weather)
उत्तर महाराष्ट्रात वादळी पावसाची शक्यता
जळगाव, नाशिक आणि नाशिक घाटमाथा परिसरासाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागांत ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. धुळे आणि नंदुरबारमध्येही काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस आणि वादळी सरींची शक्यता आहे. (Rain Update)
पुणे घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज
पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. पुणे घाटमाथ्यासाठी यलो अलर्ट देण्यात आला असून काही ठिकाणी जोरदार ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. इतर भागांत मात्र पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता आहे. ( Ghatmatha Rain)
मराठवाड्यात पावसाची तूट कायम
छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिवमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी सरींचाही अंदाज आहे. मात्र, अपेक्षित जोरदार पाऊस न झाल्याने अनेक भागांत पावसाची तूट कायम आहे.
विदर्भात उष्ण आणि दमट हवामान
अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि वाशिम या जिल्ह्यांसाठी विशेष अलर्ट नाही. बहुतांश ठिकाणी पावसाने उघडीप घेतली असून दमट आणि उष्ण हवामान राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी हलक्या सरी पडू शकतात.
कोकणातही जोरदार पावसाची प्रतीक्षा
मुंबईसह कोकणातील बहुतांश भागांत सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे. पुढील काही दिवस हवामान दमट आणि उष्ण राहण्याची शक्यता असून काही ठिकाणी हलक्या सरी पडू शकतात. मात्र, जोरदार पावसाची शक्यता कमी आहे.
एकंदरीत, २६ ऑगस्टला जळगाव, नाशिक, नाशिक घाटमाथा आणि पुणे घाटमाथा या भागांना यलो अलर्ट असून राज्याच्या इतर भागांत हलका ते मध्यम पाऊस किंवा वादळी सरींची शक्यता आहे. मात्र, व्यापक आणि जोरदार पावसासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागू शकते.( Rain In Maharashtra)