इस्लामाबाद : वैद्यकीय क्षेत्राला हादरवून सोडणाऱ्या आणि संवेदनशील मनांना चटका लावून जाणाऱ्या दोन अत्यंत दुर्दैवी घटना समोर आल्या आहेत. पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद आणि महाराष्ट्रातील अमरावती येथील सरकारी रुग्णालयांमध्ये लागलेल्या भीषण आगीत एकूण १८ नवजात बालकांनी आपला जीव गमावला आहे. दोन्ही ठिकाणी घडलेल्या या दुर्घटनांमुळे रुग्णालयांमधील सुरक्षितता आणि अग्निरोधक यंत्रणांच्या अंमलबजावणीवर पुन्हा एकदा मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
इस्लामाबादमधील 'पिम्स' रुग्णालयात अग्नितांडव: १५ नवजात अर्भकांचा होरपळून मृत्यू
At least 15 infants killed in hospital fire in Pakistan's capital, Islamabad
Follow: https://t.co/RuQCIFWYoj pic.twitter.com/xISCbRzj8H — PressTV Extra (@PresstvExtra) August 26, 2026
पाकिस्तानच्या इस्लामाबाद शहरातील 'पाकिस्तान इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस' (PIMS) या नामांकित रुग्णालयाच्या स्त्रीरोग व बालसंगोपन (गायनेकोलॉजी) वॉर्डमध्ये बुधवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. प्राथमिक अंदाजानुसार, विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे ही दुर्घटना घडल्याचे समोर आले आहे. आग लागली त्या वेळी या विशेष वॉर्डमध्ये एकूण १६ नवजात बाळे उपचारासाठी दाखल होती. आगीचे रौद्ररुप पाहून उपस्थित वैद्यकीय कर्मचाऱ्यांची एकच धांदल उडाली. डॉक्टरांनी प्राणांची शर्थ करत अवघ्या एकाच बाळाला सुरक्षित बाहेर काढण्यात यश मिळवले, तर उर्वरित १५ चिमुकल्यांचा या आगीत अत्यंत वेदनादायक मृत्यू झाला. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ६ गाड्या आणि ४ रुग्णवाहिकांनी तातडीने पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवले. रुग्णालयाच्या प्रवक्त्या डॉ. अनीजा जलील यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या आदल्या रात्री काही बालकांना डिस्चार्ज देण्यात आला होता, त्यामुळे वॉर्डातील मुलांच्या नेमक्या संख्येची पुन्हा पडताळणी केली जात आहे. या दुर्घटनेच्या सखोल चौकशीसाठी जिल्हा प्रशासनाने अतिरिक्त डेप्युटी कमिशनर यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष तपास समिती गठीत केली आहे.
मुंबई : ‘भुलेश्वरचा राजा’ गणेशमूर्ती दुर्घटनेच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. २२ फूट उंचीची भव्य गणेशमूर्ती आगमन सोहळ्यादरम्यान क्रेनवरून ...
अमरावतीत व्हेंटिलेटरच्या स्फोटाने ३ बाळांचा घेतला बळी; परिचारिकांचे शौर्य
दुसरीकडे, महाराष्ट्रातील अमरावती येथील जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशू कक्षात (SNCU) सोमवारी पहाटे साडेतीन वाजता असाच एक धक्कादायक प्रकार घडला. कक्षातील एका व्हेंटिलेटरचा अचानक स्फोट झाल्याने भीषण आग लागली आणि संपूर्ण वॉर्डात दाट धूर पसरला. या कक्षात एकूण ९ बालके उपचार घेत होती. आगीची तीव्रता जास्त असतानाही तेथे कार्यरत असलेल्या दोन परिचारिकांनी स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता प्रसंगावधान दाखवले. धुराचे साम्राज्य पसरलेले असतानाही या परिचारिकांनी पेटीतील ६ बालकांना तातडीने बाहेर काढून त्यांचे प्राण वाचवले. या धाडसी बचावा दरम्यान दोन्ही परिचारिकांचे हात भाजले आहेत. मात्र, धुरामुळे दृश्यमानता अत्यंत कमी झाल्याने उर्वरित ३ बालकांना वाचवण्यात यश आले नाही आणि त्यांचा होरपळून मृत्यू झाला.
भंडारा दुर्घटनेच्या आठवणी ताज्या
अमरावतीतील या दुर्घटनेने ९ जानेवारी २०२१ रोजी भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील सिक न्यूबॉर्न केअर युनिटमध्ये लागलेल्या आगीच्या भीषण आठवणी पुन्हा ताज्या केल्या आहेत. अशा वारंवार घडणाऱ्या दुर्घटनांमुळे शासकीय रुग्णालयांमधील अग्निसुरक्षा ऑडिट आणि तांत्रिक उपकरणांच्या देखभाल-दुरुस्तीबाबत प्रशासन खरोखरच गंभीर आहे का, असा संतप्त सवाल नागरिक आणि बालकांच्या नातेवाईकांकडून विचारला जात आहे.






