Thursday, August 13, 2026

Devendra Fadnavis : विरोधक पळपुटे, संसदेत चर्चा करायची त्यांच्यात हिम्मत नाही!

Devendra Fadnavis : विरोधक पळपुटे, संसदेत चर्चा करायची त्यांच्यात हिम्मत नाही!

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल; चर्चा होऊ दिली असती तर त्यांचे पितळ उघडे पडले असते

मुंबई : "विरोधी पक्षातील नेत्यांमध्ये संसदेत समोरासमोर चर्चा करण्याची हिंमत नाही. ते पळपुटे आहेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर जर विरोधकांचा खरोखरच विश्वास असता, तर त्यांनी गोंधळ घालण्याऐवजी संसदेत चर्चा करून दाखवली असती", असा हल्लाबोल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी गुरुवारी केला. संसदेत चर्चा झाली असती तर विरोधकांचे पितळ उघडे पडले असते, म्हणूनच त्यांनी जाणीवपूर्वक चर्चेपासून पळ काढल्याचा टोलाही त्यांनी या वेळी लगावला. (Devendra Fadnavis)

मुंबईत माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री (Devendra Fadnavis) म्हणाले की, विरोधक सातत्याने संविधानाचा आणि लोकशाहीचा दाखला देत असतात; मात्र संविधानाने निर्माण केलेल्या लोकशाही व्यवस्थेतील सर्वात सर्वोच्च आणि महत्त्वाचे व्यासपीठ हे संसद आहे. संसदेतील अर्थपूर्ण चर्चा हे लोकशाहीचे प्रमुख अंग आहे. परंतु, विरोधक या चर्चेला घाबरत आहेत, कारण संसदेत चर्चा झाल्यास त्यांचा दुटप्पी आणि दुहेरी चेहरा संपूर्ण देशाच्या जनतेसमोर येईल, अशी भीती त्यांना सतावत आहे. संसदेत चर्चा झाली, तर झारखंडचा मुद्दा उपस्थित होईल. तेथे त्यांनी घेतलेल्या भूमिकेचे आणि केलेल्या कृत्यांचे उत्तर त्यांना जनतेला द्यावे लागेल. या प्रश्नांची उत्तरे देणे टाळण्यासाठीच विरोधकांनी संसदेतून पळ काढण्याची भूमिका घेतली," असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

सुरुवातीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) हे या विषयावर उत्तर देत नसल्याचे कारण पुढे करत विरोधकांनी चर्चेला नकार दिला होता. मात्र, स्वतः गृहमंत्री अमितभाई शहा यांनी संसदेत उत्तर देण्यास आपण तयार असल्याचे स्पष्ट केल्यानंतरही हे पळपुटे मागे हटले. हा संविधानाचा आणि लोकशाहीचा अपमान आहे. विरोधकांना देशातील तरुणांशी, त्यांच्या रोजगाराशी आणि शिक्षणाशी काहीही देणेघेणे राहिलेले नाही. त्यांना संसदेत गोंधळ घालायचा आहे आणि टीव्हीसमोर चमकून प्रसिद्धी मिळवायची आहे. लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिराचा असा राजकीय वापर करण्यापेक्षा दुसरे मोठे दुर्दैव असू शकत नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी (Devendra Fadnavis) विरोधी पक्षांचा समाचार घेतला.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >