Thursday, August 13, 2026

Nagpur Accident News : नागपुरात भीषण अपघात; ट्रकची कारला धडक, 11वीच्या दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू

Nagpur Accident News : नागपुरात भीषण अपघात; ट्रकची कारला धडक, 11वीच्या दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू
नागपूर : नागपूरच्या कलमाना परिसरात पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात 11वीत शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला, तर त्यांचा एक मित्र गंभीर जखमी झाला आहे. तिघेही मित्र एका मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी बाहेर पडले होते. पवनगाव-भरतवाडा वाय पॉईंट मार्गावर बुधवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास हा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, तिघे मित्र इलेक्ट्रिक कारमधून प्रवास करत होते. भरधाव वेगात असलेल्या कारवरील नियंत्रण सुटल्याने ती आधी फूटपाथला धडकली आणि त्यानंतर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकच्या मागील बाजूवर आदळली. धडक एवढी जोरदार होती की कारच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले आणि अपघातानंतर कार उलटली.
या अपघातात वर्धा रोड परिसरातील 16 वर्षीय भौमिक अमोल लारोकर आणि परडी परिसरातील 17 वर्षीय सागर संजय मेलवानी यांचा मृत्यू झाला. तर सुभान नगर येथील 17 वर्षीय मिहिर आनंद बेहार गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिघेही 11वीत शिकत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मित्र जयचा वाढदिवस साजरा करण्यासाठी तिघांनी त्याला सरप्राईज देण्याचे ठरवले होते. जयची वाट पाहत असताना तिघांनी काही वेळ कारमधून फिरण्याचे ठरवले. त्यावेळी मिहिर कार चालवत होता. मात्र, वेग वाढल्यानंतर एका वळणावर त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार ट्रकवर जाऊन आदळली. अपघाताचा मोठा आवाज ऐकून स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत पोलिसांना माहिती दिली. कलमाना पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि तिन्ही विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी भौमिक आणि सागर यांना मृत घोषित केले. दरम्यान, अल्पवयीन मुलाला वाहन चालवण्यास दिल्याप्रकरणी मिहिरच्या वडिलांवरही कारवाई होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. सध्या पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >