Thursday, August 13, 2026

Apache Helicopter Accident : अमेरिकेच्या अत्याधुनिक AH-64 अपाचे हेलिकॉप्टरचा भीषण अपघातात दोन पायलट्सचा मृत्यू

Apache Helicopter Accident : अमेरिकेच्या अत्याधुनिक AH-64 अपाचे हेलिकॉप्टरचा भीषण अपघातात दोन पायलट्सचा मृत्यू

टेक्सास : अमेरिकेतील टेक्सास राज्यात अमेरिकन सैन्याच्या अत्याधुनिक AH-64 अपाचे अटॅक हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला. मध्य टेक्सासमधील फोर्ट हूड लष्करी तळाजवळ एका लष्करी मोहिमेदरम्यान हे हेलिकॉप्टर शेतात कोसळले. दुर्घटनेनंतर हेलिकॉप्टरला भीषण आग लागली. या अपघातात हेलिकॉप्टरमधील दोन्ही पायलट्सचा मृत्यू झाला. (Apache Helicopter Accident)

शेतात कोसळताच लागली भीषण आग :

हेलिकॉप्टर शेतात कोसळल्यानंतर मोठी आग भडकली आणि परिसरात धुराचे लोट पसरले. अपघाताची तीव्रता लक्षात घेता आसपासच्या घरांमधील काही नागरिकांना सुरक्षेच्या कारणास्तव सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. बेल काउंटी शेरीफ ऑफिसने दोन्ही पायलट्सच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे. हेलिकॉप्टर कोणत्याही निवासी घराला किंवा इमारतीला धडकले नसल्याने मोठी जीवितहानी टळली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले. (Apache Helicopter Accident)

अपघाताचे कारण अद्याप अस्पष्ट :

या दुर्घटनेमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. फोर्ट हूडच्या Criminal Investigation Division (CID) कडून अपघाताचा तपास सुरू आहे. मृत पायलट्सची ओळख आणि नावे प्रशासनाकडून अद्याप जाहीर करण्यात आलेली नाहीत. फोर्ट हूडचे कार्यवाहक कमांडिंग जनरल ब्रिगेडियर जनरल एथन डिवेन यांनी घटनास्थळ सुरक्षित करणे आणि मदतकार्य पूर्ण करणे ही प्राथमिकता असल्याचे सांगितले. तसेच मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांप्रती त्यांनी संवेदना व्यक्त केल्या. (Apache Helicopter Accident)

काय आहे AH-64 अपाचे हेलिकॉप्टर?

AH-64 अपाचे हे अमेरिकन सैन्याचे ट्विन-इंजिन अटॅक हेलिकॉप्टर आहे. शत्रूच्या जमिनीवरील लक्ष्यांवर हल्ला करणे, रणगाडे नष्ट करणे आणि क्लोज एअर सपोर्ट देणे यासाठी त्याचा वापर केला जातो. हे हेलिकॉप्टर ३० मिमी ऑटोमॅटिक कॅनन, रॉकेट्स आणि विविध क्षेपणास्त्रांनी सुसज्ज असते. अत्याधुनिक सेन्सर्स आणि शस्त्रास्त्र प्रणालीमुळे अपाचे हे जगातील प्रमुख अटॅक हेलिकॉप्टरपैकी एक मानले जाते. (Apache Helicopter Accident)

या भीषण अपघातानंतर अमेरिकन सैन्याने दुर्घटनेचा तपास सुरू केला असून, अपाचे हेलिकॉप्टरच्या दुर्घटनेमागील कारण शोधण्यासाठी संबंधित यंत्रणा काम करत आहेत. (Apache Helicopter Accident)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >