Thursday, August 13, 2026

Crime News : धुळे जिल्हा परिषदेचा फिटर खासगी एजंटसह जळगाव एसीबीच्या जाळ्यात

Crime News : धुळे जिल्हा परिषदेचा फिटर खासगी एजंटसह जळगाव एसीबीच्या जाळ्यात

Crime News : जळगाव एसीबीकडून एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. सुरक्षा रक्षकांची सुरक्षा रक्षक मंडळात नोंदणी करण्यासह शिफारसपत्र देण्याच्या मोबदल्यात तब्बल ४ लाख ८० हजार रुपयांची लाच स्वीकारताना धुळे जिल्हा परिषदेचा फिटर आणि त्याच्या खासगी एजंटला जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) (Anti-Corruption Bureau) पथकाने रंगेहात पकडले आहे. या कारवाईने एकच खळबळ उडाली आहे.

नेमकं प्रकरण काय ?

आरोपानुसार, तक्रारदारासह इतर पाच सुरक्षा रक्षक गेल्या काही दिवसांपासून धुळे जिल्हा परिषदेत तात्पुरत्या स्वरूपात सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत आहेत. ६० दिवस सलग सेवा पूर्ण केल्यानंतर सुरक्षा रक्षक मंडळात नोंदणीची प्रक्रिया केली जाते असा नियम आहे. मात्र या ठिकाणी संशियितांनी संधी शोधली. आणि या नोंदणीसह शिफारसपत्र मिळवून देण्यासाठी संशयितांनी प्रत्येक सुरक्षा रक्षकाकडून १ लाख ५० हजार रुपये याप्रमाणे एकूण ७ लाख ५० हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराने यापूर्वी १ लाख रुपये दिले होते. मात्र, त्यानंतरही संबंधित काम न झाल्याने त्यांनी संशयितांकडे विचारणा केली. त्यावेळी उर्वरित ६ लाख ५० हजार रुपयांची मागणी करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. पुढे लाचेची रक्कम ५ लाख ८० हजार रुपयांवर निश्चित करण्यात आली.

एसीबीच्या जाळयात संशयित रंगेहात

अखेर वैतागलेल्या तक्रारदाराने ११ ऑगस्ट रोजी जळगाव एसीबीकडे याबाबत तक्रार केली. तक्रारीची दखल घेत एसीबीच्या पथकाने ११ आणि १२ ऑगस्ट रोजी मागणीची पडताळणी केली. त्यावेळी ५ लाख ८० हजार रुपयांवर तडजोड झाल्याचे निष्पन्न झाले. यापूर्वी दिलेले १ लाख रुपये वजा करून उर्वरित ४ लाख ८० हजार रुपये स्वीकारण्याची तयारी संशयितांनी दर्शवली. ठरल्याप्रमाणे एसीबीच्या पथकाने पारोळा येथील हॉटेल ग्रीन पार्क येथे सापळा रचला. यावेळी बारकू पाटील याने पुरुषोत्तम वाघ यांच्या सांगण्यावरून तक्रारदाराकडून पंचांसमक्ष ४ लाख ८० हजार रुपयांची रक्कम स्वीकारली. त्याच क्षणी दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने पाटील याला रंगेहात पकडले.

संशयितांची नावे

पुरुषोत्तम मंगाजी वाघ (५०, फिटर, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, धुळे आणि बारकू काळू पाटील (६०, सिक्युरिटी एजन्सी सुपरवायझर, देवपूर, धुळे), अशी पावणेपाच लाखांची स्वीकारल्याचा आरोप असलेल्या संशयितांची नावे आहेत. या प्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात दोन्ही संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील कायदेशीर कारवाई केली जात आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >