Friday, August 7, 2026

Lock Upp : 'लॉक अप सीझन २'ची विजेती श्रेया कालराचा मोठा निर्णय; १ कोटींच्या प्राइझ मनीबाबत केली मोठी घोषणा

Lock Upp : 'लॉक अप सीझन २'ची विजेती श्रेया कालराचा मोठा निर्णय; १ कोटींच्या प्राइझ मनीबाबत केली मोठी घोषणा

ओटीटीवरील लोकप्रिय आणि वादग्रस्त रिॲलिटी शो 'लॉक अप सीझन २'चा नुकताच ग्रँड फिनाले पार पडला आहे. बुधवारी झालेल्या या अंतिम सोहळ्यात सोशल मीडिया स्टार श्रेया कालराने चमकदार ट्रॉफी उंचावत विजेतेपद आपल्या नावावर केले. या विजयासोबतच तिला १ कोटी रुपयांची घसघशीत रोख रक्कम देखील बक्षीस म्हणून मिळाली आहे. विशेष म्हणजे, ही मोठी रक्कम मिळाल्यानंतर २९ वर्षीय श्रेया कालराने याबाबत एक अत्यंत दिलदार आणि कौतुकास्पद निर्णय घेतला आहे, ज्यामुळे तिची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.

विजेतेपद पटकावल्यानंतर मीडियाशी संवाद साधताना श्रेयाने आपल्या भविष्यातील प्लॅन्स आणि बक्षिसाच्या रकमेच्या वापराबद्दल उघडपणे भाष्य केले. आपल्याला मिळालेल्या या पैशांचा नेमका कसा वापर करणार, हे स्पष्ट करताना तिने सांगितले की, तिला विनाकारण पैसे उडवण्याची किंवा महागड्या गाड्या खरेदी करण्याची अजिबात आवड नाही. तिचे राहणीमान अतिशय साधे आहे.

शिल्पा शिंदेच्या शेल्टर होमला मदत करणार

आपल्या विजयामागची भूमिका मांडताना श्रेयाने अभिनेत्री शिल्पा शिंदे हिच्याशी असलेल्या जिव्हाळ्याच्या संबंधांचा उल्लेख केला. ती म्हणाली की, "मी या जिंकलेल्या रक्कमेतील काही भाग शिल्पाजींच्या शेल्टर होममध्ये गुंतवणार आहे. त्यांना ज्या प्रकारे शक्य होईल, तशी मदत करण्याची माझी तीव्र इच्छा आहे."

विशेष म्हणजे, अभिनेत्री शिल्पा शिंदे महाराष्ट्रातील कर्जत येथे गरजू, वृद्ध आणि बेघर महिलांसाठी एक विशेष शेल्टर होम चालवते. शो दरम्यानही शिल्पाने सांगितले होते की, जर ती या शोची विजेती ठरली, तर बक्षिसाची सर्व रक्कम ती आपल्या कर्जतमधील शेल्टर होमसाठी खर्च करेल. शोमध्ये श्रेया आणि शिल्पा यांनी एकमेकींना प्रत्येक संकटात मोठी साथ दिली होती. आता शो संपल्यानंतर श्रेयाने त्या मैत्रीची पावती देत घेतलेल्या या निर्णयावर चाहत्यांकडून आणि सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

मालमत्तेत गुंतवणूक करण्याचा वडिलांचा सल्ला

याशिवाय, पैशांच्या नियोजनाबद्दल बोलताना श्रेयाने सांगितले की, तिच्या वडिलांनी तिला काही कर्ज काढून एखाद्या सुरक्षित मालमत्तेमध्ये (प्रॉपर्टी) गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे सध्या तिच्या डोक्यात या दोनच गोष्टी प्रामुख्याने सुरू आहेत.

सह-स्पर्धकांच्या वागणुकीबद्दल व्यक्त केली खंत

एकतर्फी विजयानंतर आनंद व्यक्त करतानाच श्रेयाने सह-स्पर्धकांच्या वर्तणुकीवर आपली खंतही व्यक्त केली. ती म्हणाली की, विजयानंतर तिला भेटण्यासाठी केवळ शिल्पा शिंदे, माधुरीजी आणि पामेला आल्या होत्या. तर अभिनेते राम कपूर यांनी केवळ औपचारिकता म्हणून तिला साईड-हग केले. याशिवाय घरातील इतर एकाही स्पर्धकाने तिचे अभिनंदन केले नाही किंवा तिचा हा आनंद साजरा केला नाही. एका टप्प्यावर या गोष्टीचे तिला खूप वाईट वाटले होते. हा शेवटी एक खेळ होता आणि खेळातील विजेत्याप्रती इतरांनी थोडे स्पोर्ट्समन स्पिरिट दाखवणे गरजेचे होते, अशी भावना तिने व्यक्त केली.

अनेक आव्हानांचा सामना करत आणि प्रेक्षकांची मने जिंकत 'लॉक अप सीझन २'चा मुकुट आपल्या सिरजावून घेणारी श्रेया कालरा आता तिच्या या दिलदार निर्णयामुळे पुन्हा एकदा चाहत्यांच्या आणि प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >