Saturday, August 1, 2026

छंद देई आनंद...

छंद देई आनंद...

- मनस्विनी; पूर्णिमा शिंदे

माणूस हा समाजशील प्राणी आहे. समाजात राहणारा, इतरांशी नाती जपणारा आणि परस्परावलंबी असणारा हा एकमेव प्राणी आहे. आयुष्यात सुख-दुःखाचे अनेक प्रसंग येतात; मात्र मानसिक, शारीरिक आणि कौटुंबिक स्वास्थ्य टिकवून ठेवण्यासाठी आनंदी मन आवश्यक असते. घर, कुटुंब, नातेवाईक, मित्र-मैत्रिणी आणि स्नेही यांच्या सहवासातून माणसाचे जीवन समृद्ध होत असते. त्याचबरोबर प्रत्येक व्यक्तीमध्ये एखादा छंद, कला किंवा सृजनशील गुण दडलेला असतो. तो जन्मजात असू शकतो किंवा प्रयत्नांनी विकसित केलेला असू शकतो. हीच आवड, अभिरुची किंवा कला माणसाच्या जीवनात आनंद निर्माण करते. ज्यांच्या आयुष्यात कोणताही विधायक छंद नसतो, त्यांचे जीवन अनेकदा एकसुरी बनते. नवीन काही शिकण्याची, करण्याची किंवा निर्माण करण्याची प्रेरणा हरवते. म्हणूनच प्रत्येकाने स्वतःतील सुप्त गुण ओळखून त्यांचा विकास करणे आवश्यक आहे. आपल्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा उपयोग समाजासाठी झाला, तर त्यातून मिळणारा आनंद अधिक मोठा असतो.

संत ज्ञानेश्वरांनी अवघ्या सोळाव्या वर्षी भावार्थदीपिका (ज्ञानेश्वरी) हा महान ग्रंथ लिहून समाजाला अमूल्य ज्ञानसंपदा दिली. त्यांच्या पसायदानमध्ये व्यक्त झालेली विश्वकल्याणाची भावना आजही प्रत्येकाला प्रेरणा देते. आपल्या अंगी असलेल्या गुण, कला आणि कौशल्यांचा विकास करून ते समाजाच्या हितासाठी वापरणे, हाच खऱ्या अर्थाने आनंदाचा मार्ग आहे.

प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या आवडीचे एक क्षेत्र असते. कोणाला लेखनाची, कोणाला संगीताची, कोणाला चित्रकलेची, तर कोणाला क्रीडा खेळण्याची आवड असते. मला स्वतःला लेखन, वाचन, वक्तृत्व आणि अभिव्यक्ती यात आनंद मिळतो. शब्द हे केवळ संवादाचे साधन नसून समाजप्रबोधनाचे प्रभावी माध्यम आहे. आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी, विचार मांडण्यासाठी आणि सामाजिक प्रश्नांवर प्रकाश टाकण्यासाठी शब्दांची ताकद अतुलनीय आहे. मात्र प्रभावी लेखन किंवा वक्तृत्वासाठी सातत्यपूर्ण वाचन, चिंतन आणि अभ्यास आवश्यक असतो. कोणतीही कला आत्मसात करण्यासाठी साधना, संयम आणि सातत्य यांना पर्याय नसतो. इतिहासात आणि वर्तमानकाळात अनेक व्यक्तींनी आपल्या कलेच्या जोरावर जगभरात नावलौकिक मिळवला आहे. क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर, गायनात भारतरत्न लता मंगेशकर आणि पंडित भीमसेन जोशी, चित्रकलेत मकबूल फिदा हुसेन, नृत्यकलेत सुधा चंद्रन आणि मायकल जॅक्सन यांची उदाहरणे प्रेरणादायी आहेत. ग्रामीण भागातील वारली चित्रकला, रांगोळी, हस्तकला, शिल्पकला, भरतकाम, कृत्रिम फुले तयार करणे किंवा पाककला या सर्व कलाही तितक्याच महत्त्वाच्या आहेत. सुगरणींच्या हातचा स्वादिष्ट स्वयंपाक, आकर्षक केक, कुकीज किंवा पारंपरिक पदार्थ तयार करण्यामागेही एक सुंदर कलादृष्टी आणि जिव्हाळा असतो.

अनेकांना कथा, कादंबऱ्या, कविता, ललित लेख किंवा वृत्तपत्रीय लेखनाची आवड असते. वाचनातून ज्ञान, माहिती, मनोरंजन आणि विचारांची समृद्धी मिळते. विविध विषयांवर स्वतःचे मत मांडण्याची क्षमता विकसित होते. अशा छंदामुळे जीवन अधिक अर्थपूर्ण आणि समृद्ध बनते. आपले जगणे केवळ स्वतःपुरते मर्यादित न ठेवता ते इतरांसाठीही उपयोगी कसे ठरेल, याचा विचार प्रत्येकाने करायला हवा. समाजात विविध स्वभावाची माणसे भेटतात; परंतु चांगुलपणा, नैतिकता आणि संवेदनशीलता जपणे हेच आपले खरे कर्तव्य आहे.

वाचनाचा आणखी एक महत्त्वाचा लाभ म्हणजे विचारांचे संकलन. एखादे पुस्तक वाचल्यानंतर त्यातील महत्त्वाचे मुद्दे, सुविचार किंवा स्वतःची निरीक्षणे टिपून ठेवण्याची सवय लावली पाहिजे. भविष्यात व्याख्यान, लेखन किंवा चर्चांमध्ये हे संदर्भ उपयोगी पडतात. उदाहरणे, दृष्टांत, अभंग, श्लोक, सुवचने, काव्यपंक्ती आणि प्रेरणादायी प्रसंग यांची नोंद ठेवल्यास आपले शब्दभांडार समृद्ध होते.

लिहिणे म्हणजे विचारांची पेरणी करणे होय. आपण आज लिहिलेला विचार उद्या कोणाच्या तरी जीवनाला दिशा देऊ शकतो. म्हणूनच चांगले विचार जतन करणे, त्यांचे मनन करणे आणि योग्य वेळी इतरांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. एखाद्या वर्तमानपत्रात किंवा पुस्तकात वाचलेला प्रेरणादायी विचार केवळ वाचून विसरू नये; तो आपल्या वहीत किंवा डायरीत नोंदवावा. त्यामुळे विचारांची श्रीमंती वाढते आणि अभिव्यक्ती अधिक प्रभावी बनते.

ग्रंथ हे ज्ञान, प्रेरणा आणि जीवनाला दिशा देणारे श्रेष्ठ मित्र आहेत. ते आपल्याला इतिहासाची ओळख करून देतात, वर्तमान समजून घेण्याची दृष्टी देतात आणि भविष्याची स्वप्ने पाहण्याचे धैर्य देतात. म्हणून प्रत्येकाने किमान एक तरी छंद जोपासावा, एखादी कला आत्मसात करावी आणि सातत्याने स्वतःचा विकास करावा. छंद माणसाला केवळ विरंगुळाच देत नाही, तर आत्मविश्वास, कौशल्य, नावलौकिक आणि जीवनाचा खरा आनंदही देतो.

खरंच, छंद जोपासणारा माणूस कधीच एकटा नसतो; कारण त्याचा छंदच त्याचा आनंद, प्रेरणा आणि आयुष्यभराचा सहप्रवासी बनतो.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा