नॉस्टॅल्जिया - श्रीनिवास बेलसरे
कधी कधी माणूस अगदी निराश होतो. जगण्यात काही अर्थ नाही असे त्याला वाटू लागते. नशिबाने आपली घोर फसवणूक केली असे वाटून तो देवालाच विनंती करू लागतो, “देवा, आता बस! आता मला सहन होत नाही. तू दिलेले हे तुझे जीवन परत घेऊन टाक, बाबा!”
याच भावना व्यक्त केल्या होत्या शकील बदायुनी यांनी. सिनेमा होता १९५३ साली आलेला ‘दिल-ए-नादान’. एकेकाळी कमालीच्या लोकप्रिय झालेल्या या गाण्याचे गायक होते तलत मेहमूद. संगीतकार होते गुलाम महम्मद.
निर्माते निर्देशक ए. आर. करदार यांनी सिनेमासाठी प्रेमाचा त्रिकोण असलेली कथा निवडली होती. त्यात प्रथमच तलत मेहमूद यांनी अभिनयही केला आणि गाणीही गायली. त्यांच्या नावाची ‘सिंगिंग स्टार’ अशी जाहिरातही केली गेली होती. एका अतिशय सभ्य आणि संयमी तरुणाची भूमिका समरसून करतानाचा त्यांचा अभिनयही पाहण्यासारखा होता. अभिनेत्री श्यामाचाही हा पहिलाच चित्रपट. इतर कलाकार होते पीस कंवल, दिवान शरार, रमेश, एस. एन. बॅनर्जी, श्यामकुमार, मास्टर रोमी, ए. एल. रमेश, आगा मिराज आणि मिस फिरोझा. चित्रपट फारसा चालला नाही पण गाणी चांगलीच लोकप्रिय झाली.
संगीतकार व्हायचे म्हणून शहरात आलेल्या मोहनला (तलत) सेठ हिराचंद सहारा देतात. त्यांच्या दोन्ही मुली, आशा (श्यामा) आणि कामिनी (पीस कंवल) मोहनच्या प्रेमात पडतात.
कामिनीला जेव्हा कळते की धाकटी बहीण आशाचेही मोहनवर प्रेम आहे तेव्हा ती स्वत: होऊन बाजूला होते आणि मोहनवर भावनिक दबाव टाकून त्याचे आशाशी लग्न लावून देते. तिच्या वडिलांची इच्छा कामिनी आणि मोहनचेच लग्न व्हावे अशी असते. मात्र कामिनी बहिणीसाठी त्याग करण्याच्या हट्टाला पेटल्याने त्यांचा नाईलाज होतो. शेवटी अशा विचित्र परिस्थितीत झालेल्या लग्नात मोहनचे आशाशी फारसे मधुर संबंध निर्माण होऊ शकत नाहीत. पुढे पुढे तर मोहनच्या संगीतप्रेमामुळे स्वत:ला दुर्लक्षित समजणारी आशा संगीताचाच राग करू लागते.
एक दिवस आशाला मोहन आणि कामिनीच्या पूर्वीच्या प्रेमाबद्दल कळते आणि काहीही समजावून न घेता ती त्या दोघांवर चिडते. कामिनीशी विनाकारण भांडताना राग अनावर होऊन गर्भवती आशा जिना उतरताना मध्येच कोसळते. तशातच मुलाला जन्म देते आणि तिचा मृत्यू होतो. (आठवा - ‘हम आपके हैं कौन’) नंतर कामिनी प्रेमाने बहिणीच्या मुलाचा सांभाळ करते. कालांतराने मोहन आणि कामिनीला मुलाच्या हट्टामुळे एकत्र यावे लागते अशी ही काहीशी सुखांतिका! कामिनीवर असलेल्या प्रेमापोटी स्वत:च्या स्वप्नांचा बळी दिलेला आणि वर आशाच्या तिरस्काराचा धनी झालेला बिचारा मोहन मनातून कमालीचा उदास असतो. त्याला रोज ‘माझ्याकडे लक्ष दे, तुझे ते नतद्रष्ट संगीत सोड’ असे सांगून सतत त्याचा अपमान करणारी आशा सर्वांच्या मनातून उतरते.
सगळे जगणेच असह्य झालेल्या मोहनची विमनस्क, निराश मन:स्थिती शकीलसाहेबांनी हळुवारपणे शब्दबद्ध केली होती. त्यातून नकळत, अनेक पिढ्यातील असंख्य दु:खी, मूक, सहनशील हृदयांच्या जखमेवर कवीने हळूच फुंकर घातली होती. हे गाणे सिनेमातील एका हरलेल्या नायकाचे गाणे राहिलेच नाही. ते हिंदी येणाऱ्या अगणित संवेदनशील लोकांनी देवाकडे केलेले एक करूण निवेदन, एक गाऱ्हाणे, एक सामूहिक प्रार्थनाच होऊन बसले. शकीलसाहेबांचे शब्द होते -
‘ज़िंदगी देनेवाले सुन,
तेरी दुनियासे दिल भर गया,
मैं यहाँ जीते जी मर गया.
ज़िंदगी देनेवाले सुन...’
‘परमेश्वरा, बस झाले! आता मनात कोणतीही इच्छा शिल्लक नाही. तुझे जग तुला लखलाभ असो. माझी सहनशक्ती संपली. मी जिवंतपणीच संपलो आहे रे!’
माणूस जेव्हा हरलेला असतो, त्याला जीवलग व्यक्तीचा विरह कायमचा पचवावा लागणार हे दिसते त्यावेळी त्याचे मन गोठून जाते. ते गतकाळातील सुखद आठवणीत कायमचे अडकून पडते. दुसरा कोणताच विचार मनात टिकत नाही, सतत हुरहूर आणि निराशा अस्वस्थ करते. जणू काळ त्या वेदनादायी क्षणात थांबून राहिलेला असतो. वेळ जाता जात नाही. म्हणून शकीलसाहेब मोहनच्या निराश मनाची वेदना व्यक्त करताना म्हणतात, ‘माझी रात्र काय, दिवस काय, संपता संपत नाही. हृदयाला झालेली खोल जखम थोडीही भरून येत नाही. मनात आशेची हिरवळ शिल्लक नाही, त्याचे रखरखीत वाळवंट झाले आहे. जीवनातला सगळा आनंद जणू कुणीतरी चेटूक करून घेऊन गेले.
‘रात कटती नहीं, दिन गुज़रता नहीं,
ज़ख़्म ऐसा दिया है के भरता नहीं,
आँख वीरान है, दिल परेशान है,
ग़मका सामान है,
जैसे जादू कोई कर गया.
ज़िंदगी देनेवाले सुन...’
कवी म्हणतो, देवा, माझी काहीही चूक नसताना तू मला किती कठोर शिक्षा दिलीस. जीवनातला उरलासुरला आनंदही हिरावून घेतलास. मला जणू मरणच जगायला सोडून दिलेस! जेव्हा माझे हृदय मरणयातना भोगते आहे तेव्हा मी तुझ्यावर कुठवर विश्वास ठेवू? मनाला तर ओरडून सांगावेसे वाटते आहे की, ‘हे जन्मदात्या, तूच माझ्या सुखाने व्यथित झाला का? तूच जीवन दिलेस आणि तूच असे जिवंतपणाचे मरणही भोगायला लावतोस?’
‘बेख़ता तूने मुझसे खुशी छीन ली,
ज़िंदा रखा मगर ज़िंदगी छीन ली,
कर दिया दिलका खून, चुप कहाँतक रहूँ?
साफ़ क्यूँ ना कहूँ?
तू खुशीसे मेरी डर गया! ज़िंदगी देनेवाले सुन...’
खरी कलाकृती तीच असते जी एखाद्या काल्पनिक पात्राचे दु:ख चित्रित करताना वास्तवातल्या असंख्य दु:खी मनांना दिलासा देते. आपण एकटेच नाही, जगात अनेक दुर्दैवी, निरपराध लोक आपल्यासारखेच दु:ख भोगत आहेत हे सांगून त्या स्थितीतही जगण्याचे बळ देते तीच कलाकृती दीर्घायू होते. आज इतकी दशके लोटली तरी जुनी गाणी लोकांच्या हृदयात आणि ओठावर अजून रेंगाळतात त्याचे हेच कारण आहे. या बाबतीत जुन्या चित्रपटांच्या कथा, त्यातले भावुक संवाद, आशयघन गाणी, कर्णमधुर संगीत आणि ते आपल्यासाठी निर्माण करणाऱ्या कलाकारांना पर्याय नाही हेच खरे!






