Thursday, August 27, 2026

Nepal Flash Flood China : नेपाळमधील महापुरामागे ‘मेड इन चायना’चा हात? शी जिनपिंग यांच्या धोरणांवर गंभीर आरोप

Nepal Flash Flood China : नेपाळमधील महापुरामागे ‘मेड इन चायना’चा हात? शी जिनपिंग यांच्या धोरणांवर गंभीर आरोप

काठमांडू : नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात २६ ऑगस्ट रोजी आलेल्या भीषण फ्लॅश फ्लडने मोठी हानी झाली. तिबेटच्या दिशेने वाहणाऱ्या भोटेकोशी नदीच्या पाण्याने अचानक रौद्र रूप धारण केल्याने तिमुरे आणि स्याप्रुबेसी परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. रस्ते आणि वाहने पाण्यात वाहून गेली, तर अनेक भागांत माती आणि ढिगाऱ्यांचे साम्राज्य पसरले. (Nepal Flash Flood China)

या दुर्घटनेनंतर आता या महापुरामागील कारणांवरून नवा वाद सुरू झाला आहे. काही नेपाळी पत्रकार आणि तज्ज्ञांनी चीनकडून तिबेटमध्ये सुरू असलेल्या मोठ्या बांधकाम प्रकल्पांवर आणि पर्यावरणीय हस्तक्षेपावर प्रश्न उपस्थित केले आहेत. मात्र, चीनच्या बांधकामांचा या दुर्घटनेशी थेट संबंध असल्याचा दावा सर्व तज्ज्ञ मान्य करत नाहीत. (Nepal Flash Flood China)

चीनच्या बांधकामांवर गंभीर आरोप :

नेपाळमधील काही पत्रकारांच्या गटाने रसुवा जिल्ह्यातील दुर्घटनेचा संबंध तिबेट सीमेवरील चीनच्या मोठ्या प्रमाणावरील बांधकामांशी जोडला आहे. हिमालयीन प्रदेशातील संवेदनशील पर्यावरणाचा ऱ्हास, डोंगर कापणे आणि नदीच्या नैसर्गिक प्रवाहात बदल केल्यामुळे भूस्खलन आणि अचानक पूर येण्याचा धोका वाढल्याचा आरोप करण्यात आला आहे. तिबेटमधील केरुंग परिसरातील बांधकामांवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तसेच चीन-नेपाळ सीमेवरील उंच आणि हिमनदीच्या भागात करण्यात येणाऱ्या बांधकामांमुळे हिमालयीन परिसंस्थेवर परिणाम होत असल्याचा दावा काही नेपाळी पत्रकारांनी केला आहे. (Nepal Flash Flood China)

केरुंग पोर्टच्या बांधकामावरही प्रश्न :

रसुवा सीमेच्या जवळील केरुंग परिसरात दोन नद्यांच्या संगमाजवळ करण्यात आलेल्या बांधकामांमुळे पाण्याचा प्रवाह नेपाळच्या दिशेने वेगाने येतो, असा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे अचानक पूरस्थिती निर्माण झाल्यास त्याची तीव्रता वाढू शकते, असा दावा करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नेपाळ सरकारने चीनसमोर पर्यावरण आणि सीमावर्ती भागातील आपत्तीच्या धोक्याचा मुद्दा ठामपणे मांडावा, अशी मागणी काही पत्रकार गटांकडून करण्यात आली आहे. (Nepal Flash Flood China)

चीनने ‘अर्ली वॉर्निंग’ का दिली नाही?

या दुर्घटनेनंतर चीनकडून संभाव्य आपत्तीची पूर्वसूचना देण्यात आली होती का, यावरही प्रश्न उपस्थित झाले आहेत. नेपाळचे वरिष्ठ पत्रकार परशुराम काफ्ले यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर चीनकडून वेळेवर ‘अर्ली वॉर्निंग’ का देण्यात आली नाही, असा सवाल केला. त्यांच्या मते, तिबेटच्या दिशेने मोठा जलप्रलयाचा धोका निर्माण झाला असल्यास नेपाळला वेळेवर माहिती मिळणे आवश्यक होते. त्यामुळे भविष्यात सीमापार नैसर्गिक आपत्तींबाबत दोन्ही देशांमध्ये प्रभावी पूर्वसूचना यंत्रणा असण्याची गरज अधोरेखित झाली आहे. (Nepal Flash Flood China)

तज्ज्ञांचा वेगळा दावा :

मात्र, चीनच्या बांधकामांना या दुर्घटनेचे थेट कारण मानण्याबाबत काही तज्ज्ञ सावध भूमिका घेत आहेत. ऑस्ट्रेलियन पॉलिसी इन्स्टिट्यूटचे विश्लेषक नाथन रूजर यांनी सॅटेलाइट छायाचित्रांच्या आधारे वेगळा दावा केला आहे. त्यांच्या मते, दुर्घटनेनंतरच्या सॅटेलाइट प्रतिमांवरून भूस्खलनाची सुरुवात नेपाळच्या हद्दीतील लांगटांग लिरुंगच्या उतारांवरून झाल्याचे दिसते. त्यामुळे या दुर्घटनेचा थेट संबंध तिबेटमधील चिनी वसाहती किंवा बांधकामांशी जोडणे योग्य ठरणार नाही, असे त्यांचे मत आहे. (Nepal Flash Flood China)

नेपाळ-चीन संबंधांवर परिणाम होणार?

रसुवा येथील भीषण पुरानंतर चीनच्या विकास प्रकल्पांबाबत नेपाळमध्ये चर्चा सुरू झाली आहे. हिमालयीन प्रदेशातील पर्यावरणीय समतोल, सीमापार आपत्ती आणि आपत्तीपूर्व सूचना यंत्रणा हे मुद्दे आता अधिक महत्त्वाचे ठरत आहेत. मात्र, नेपाळमधील फ्लॅश फ्लडसाठी चीनला थेट जबाबदार ठरवणारे आरोप अद्याप निश्चितपणे सिद्ध झालेले नाहीत. त्यामुळे या दुर्घटनेमागील नेमकी कारणे स्पष्ट करण्यासाठी वैज्ञानिक तपासणी आणि अधिकृत अहवाल महत्त्वाचे ठरणार आहेत. (Nepal Flash Flood China)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >