Saturday, August 22, 2026

आधी बीज एकले...

आधी बीज एकले...
संवाद - गुरुनाथ तेंडुलकर

ही गोष्ट तुम्ही कदाचित पूर्वी ऐकली-वाचली असेल. तरीही पुन्हा सांगतो.

एका गावातला विठोबा नावाचा एक तरुण कुंभार त्याच्या घराच्या आवारात काम करीत होता. आदल्या दिवशी आणून कुटलेली माती त्याने दोन तीन वेळ वेगवेगळ्या चाळणीतून चाळली. चाळलेल्या मातीत हात घालून ती मळण्याएवढी मऊ असल्याची त्याने खात्री करून घेतली आणि एका भल्यामोठ्या घमेल्यात ती माती घालून पाणी ओतून कालवायला सुरुवात केली...

तब्बल दोन तास विठोबा त्या मातीत थोडं थोडं पाणी मिसळून ती माती मळत होता. डोक्यात विचार येत होता. अलीकडे कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलांमध्ये धुम्रपानाचं प्रमाण वाढलंय. विड्या, सिगारेट तर सर्रास फुंकतात पण काही श्रीमंत कुटुंबातली पोरं चिलीम ओढतात. मागच्या आठवड्यात बाजारात शंकरशेट त्याला म्हणाले होते, विठोबा, पुढच्या बाजारात तू चिलिमी विकायला आण. पन्नास-शंभर जेवढे नग आणशील ते सगळेच्या सगळे खपतील. नाही खपले तर मी स्वतः विकत घेईन. अलीकडे चांगल्या प्रतीच्या चिलिमींना फार मागणी येतेय.’

माती मळून विठोबाने चिलिमी बनवायला सुरुवात केली. शंकूच्या आकाराच्या काठीवर मळलेली माती हातांनी थापून एक एक चिलीम बनवायला सुरुवात झाली. डोक्यात विचार सुरू होते. या मातीच्या साधारण किती चिलिमी बनतील, त्यावर नक्षी कोणती काढायची. त्या किती रुपयांना विकायच्या आणि त्यातून आपल्याला किती फायदा होईल... आपली बायको गर्भार आहे. तिच्या बाळंतपणाचा खर्च... बाळासाठी नवे कपडे...

तेवढ्यातच त्याची बायको चहाचा कप घेऊन बाहेर आली. कप टेबलावर ठेवनाना नवऱ्याकडे पाहून नेहमीसारखं गोड हसली. विठोबाचे दोन्ही हात मातीनं माखले होते.

‘मी कसा पिऊ चहा? तूच पाज मला.’ विठोबा थट्टेच्या स्वरात म्हणाला. ती किंचित लाजली आणि कप उचलून विठोबाच्या ओठांजवळ नेला. बायकोच्या हातून चहा पिऊन विठोबा खूश झाला होता.

‘काय बनवताय?’ रिकामा कप घेऊन आत जाता जाता तिनं विठोबाला विचारलं.

‘अग आज चिलीम बनवायला घेतल्याहेत. शंकरशेटची मोठी ऑर्डर आहे. अलीकडे चिलिमींना खूप डिमांड आहे म्हणतात.’

‘शी चिलीम, ती कशाला...? चिलीम नको.’

‘मग काय बनवू? पूर्वीसारखी मातीची खेळणी बनवू? अलीकडे मातीची खेळणी नाही खपतं गं.’

‘खेळणी कशाला? या खेपेला तुम्ही चांगल्या सुरया बनवा की. उन्हाळ्याचे दिवस आहेत. सुरयांनासुद्धा चांगलं गिन्हाईक भेटेलच की. मी करते तुम्हाला मदत.’ बोलता बोलता ती पुन्हा गोड हसली.

बायकोचं ते गोड हसणं बघून विठोबा विरघळला आणि त्याने चिलीम बनवायचा विचार सोडून दिला आणि बनवलेल्या चिलिमी मोडून, सुरया बनवण्यासाठी माती पुन्हा मळायला सुरुवात केली. सुरया बनवून पूर्ण झाल्या आणि त्या रात्री विठोबाच्या स्वप्नात एक वयस्कर बाई आली.

‘विठोबा, औक्षवंत हो रे बाबा.’ बोलता बोलता त्या बाईनं विठोबाच्या चेहऱ्याभोवती दोनही हात फिरवून बोटं स्वतःच्या कानशिलांजवळ मोडली.

‘कोण गं तू? मी ओळखलं नाही.’ विठोबानं आश्चर्यानं विचारलं.

‘अरे मी माती. जी माती तू काल मळलीस आणि त्यातून सुरया बनवल्यास ती मी माती.’

‘अं...’ विठोबा चक्रावला.

‘अरे मी तुला धन्यवाद द्यायला आले रे बाबा. तुझे खूप उपकार झालेत माझ्यावर.’

‘तुझ्यावर उपकार झाले? माझे? मी नाही समजलो. विठोबा अधिकच बावचळला.

ती म्हातारी हसली आणि म्हणाली, ‘विठोबा, अरे तू काल माती मळून चिलीम बनवत होतास. बायकोने सांगितलं आणि तू सुरया बनवायला घेतल्यास.

‘हो तिचं म्हणणं मला मोडता आलं नाही. मी माझा विचार बदलला.’

होय रे बाबा, तू तुझा विचार बदललास पण माझं अख्खं आयुष्यच बदललं की. तू जर चिलीम बनवली असतीस, तर लोकांनी माझ्यात आग भरली असती. मी स्वतःही जळले असते आणि ओढणाऱ्यांनासुद्धा जाळलं असतं. पण तू सुरई बनवलीस आणि आता लोक माझ्यात पाणी भरतील. मी स्वतःही थंड राहीन आणि लोकांनादेखील तृप्त थंड करीन. तुला उदंड आयुष्य लाभू दे रे पुता.’ बोलता बोलता म्हातारीनं विठोबाला आशीर्वाद दिला.

विठोबा कुंभाराने चिलीम बनवायचा विचार सोडून सुरया बनवल्या आणि त्या मातीचं भाग्य बदललं. मातीचंच कशाला, स्वतः विठोबाचं देखील भाग्य बदललंच की. सुरईतून थंडगार पाणी पिऊन तृप्त झालेल्या लोकांचे अनाम आशीर्वाद त्याला लाभतील. पण जर त्याने चिलिमी बनवल्या असत्या, तर लोकांच्या तोंडात आग ओतली असती.

विचार बदलला की त्यानुसार माणसाची कृती बदलते. कृती बदलली की त्याचे परिणाम बदलतात. परिणाम बदलले की आयुष्याची दिशा बदलते. हळूहळू आयुष्य बदलत जातं.त्यासाठी महत्त्वाचा असतो तो विचार आणि त्या विचारानुरूप केलेली कृती.

आपल्या आजूबाजूला जी माणसं यशस्वी झालेली पाहतो, त्यांच्या आयुष्याचा पट नीट उलगडून पाहिला तर एक समान धागा आढळेल आणि तो म्हणजे सकारात्मक विचार. मी अमूक एक गोष्ट करू शकतो याबद्दल त्यांच्या मनात ठाम विश्वास असतो आणि तो विश्वासच आगळंवेगळं बळ देतो.

याच्याच विरुद्ध म्हणजे अपयशी माणसं मुळातच ‘हे काम खूप कठीण आहे. आपल्याला जमेल की नाही?’ ही शंका मनात धरूनच कामाला आरंभ करतात. काम करताना जराशी अडचण आली की लागलीच त्यांच्या मनात विचार येतो. ‘मला ठाऊकच होतं हे शक्य नाही.’

आणि मग... मग काय?

‘शक्य नाही.’ असा विचार करून केलेल्या कामात यश मिळत नाही. यश न मिळाल्यामुळे मन अधिकच खच्ची होतं. विचार अधिकच नकारात्मक होतात आणि एकदा असे नकारात्मक विचार करण्याची सवय जडली की पुढे अख्खं आयुष्य नकारात्मकच होतं.

भगवद्‌गीतेत एक श्लोक आहे.

उद्धरेत आत्मआत्मानम् न आत्मानम् अवसादयेत । आत्मैव ही आत्मनो बंधुः आत्मैव रिपु आत्मनः ।।

अर्थ : माणसाने आपला उद्धार आपण स्वतःच करून घ्यावा; परंतु स्वतःच अधोगतीस जाऊ नये. कारण आपणच आपले बांधव बनू शकतो आणि आपण स्वत:च आपले शत्रूदेखील बनू शकतो.

इथे आपणच आपले मित्र असतो आणि आपणच आपले शत्रू ठरतो. या वाक्यातील आपण म्हणजे इतर कुणीही नसून आपण म्हणजे आपले विचारच असतात. भविष्यात होणाऱ्या सगळ्या बऱ्यावाईट परिणामांचं बीज या विचारातच असतं. हे विचारच पुढे सर्व काही घडवून आणतात. म्हणूनच माणसाचं जीवन म्हणजे आधी त्याचा विचार आणि त्यानंतर त्या विचाराबरहुकूम केलेली कृती असंच म्हणावं लागेल. माणसाच्या मनातले विचार हे पुढे घडणाऱ्या कृतीचं आणि त्यानंतर घडणाऱ्या परिणामाचं एक छोटसं बीज असतं. ते बीज कोणतं आहे यावर त्या बीजापासून भविष्यात कोणता वृक्ष निर्माण होणार हे अवलंबून असतं. म्हणूनच विचारांचं हे बीज महत्वाचं.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा