मुंबई : राज्यात काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) आज, 1 ऑगस्ट रोजी राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. विशेषतः उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, उत्तर कोकणातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडू शकतो. या काळात ताशी 50 ते 60 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरातही अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून, वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मराठवाड्यातही अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज असून ताशी 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहू शकतात. दक्षिण कोकण आणि गोवा परिसरातही पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. (Maharashtra Rain)
महिलांना आता मिळणार ४० टक्के अनुदान; जुन्या लाभार्थ्यांनाही वाढीव सवलतीचा फायदा मुंबई : राज्यातील महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत ...
'या' जिल्ह्यांता ऑरेंज अलर्ट जारी
रायगड, नाशिक घाट परिसर आणि पुणे घाट परिसरासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर ठाणे, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नंदुरबार, कोल्हापूर घाट परिसर, सातारा घाट परिसर तसेच विदर्भातील चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. घाट भागात सततच्या पावसामुळे दरडी कोसळण्याचा आणि वाहतुकीवर परिणाम होण्याचा धोका वाढला आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक असेल तेव्हाच प्रवास करावा, असा सल्ला प्रशासनाने दिला आहे. (Yellow Alert)
नाशिककरांना सावधानतेचा इशारा
नाशिक जिल्ह्यात रेड अलर्ट घोषित करण्यात आल्याने मालेगाव, नांदगाव, बागलाण, इगतपुरी, कळवण, त्र्यंबकेश्वर, पेठ आणि सुरगाणा तालुक्यातील शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच आठवडी बाजार, जत्रा, मेळावे आणि गर्दीचे कार्यक्रम पुढे ढकलण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
नंदुरबार जिल्ह्यातही रेड अलर्ट जारी करण्यात आला असून, सुरक्षिततेच्या कारणास्तव सर्व अंगणवाड्या, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
मुंबई शहरात रिमझिम
दरम्यान, मुंबई शहर आणि उपनगरात आज दिवसभर ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे. शहरात ताशी 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहू शकतात. समुद्रही खवळलेला राहण्याची शक्यता असल्याने डहाणू ते श्रीवर्धनदरम्यानच्या बंदरांवर स्थानिक सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. (Monsoon)






