Friday, July 31, 2026

Jalgaon : ...अन् मदतीला जणू देवच आला, अमळनेरमध्ये पुरात अडकलेल्या एक महिन्याच्या बाळासह कुटुंबाची थरारक सुटका

Jalgaon : ...अन् मदतीला जणू देवच आला, अमळनेरमध्ये पुरात अडकलेल्या एक महिन्याच्या बाळासह कुटुंबाची थरारक सुटका

Jalgaon : भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यभरात पावसानं धुव्वाधार बॅटिंग केली असून यात अनेक जिल्ह्यांना अक्षरशः झोडपून काढलं आहे. हवामान विभागाने आज राज्याच्या विविध भागांमध्ये मुसळधार पावसाचा (Maharashtra Rain) अंदाज वर्तवला आहे. जळगावसाठीही आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यानुसार जळगावमध्ये गुरुवारपासून सुरू असलेल्या संततधार आणि जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. (Jalgaon Rain Update)

मुसळधार पावसामुळे जळगाव जिल्ह्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. अशातच जिल्ह्यातील अमळनेर शहरात मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरात गुरुकृपा कॉलनीतील एका घरात अवघ्या एक महिन्याच्या बाळासह संपूर्ण कुटुंब अडकून पडले होते. घरात वेगाने पाणी शिरल्याने कुटुंबीय जीव वाचवण्यासाठी धडपड करत होते. दरम्यान,अमळनेर नगरपालिकेच्या आरोग्य विभाग आणि अग्निशमन दलाच्या धाडसी बचावकार्यामुळे सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.  (Jalgaon Rain Update)

...अन् मदतीला जणू देवच आला

अमळनेर शहरातील भालेराव नगर येथील गुरुकृपा कॉलनीत नाल्याला पूर आल्याने छातीएवढे पाणी साचले होते. घरामध्ये एक महिन्याचे बाळ, त्याची आई, तीन महिला, तीन लहान मुले आणि इतर कुटुंबीय अडकले होते. घरात पाणी शिरल्याने सर्वजण उंच जागेवर उभे राहून मदतीची वाट पाहत होते. घटनेची माहिती मिळताच मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्या निर्देशानुसार आरोग्य निरीक्षक किरण कंडारे, गोल्डी बिऱ्हाडे तसेच अग्निशमन दलाचे फारुख शेख, दिनेश बिऱ्हाडे, भिका सदानंदशीव आणि पवन बिऱ्हाडे यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पाण्याचा प्रवाह प्रचंड असल्याने दोर, लाइफ जॅकेट आणि मानवी साखळीच्या मदतीने तब्बल दोन तासांच्या प्रयत्नांनंतर पथकाने कुटुंबापर्यंत पोहोचण्यात यश मिळवले. (Jalgaon Rain Update)

एक महिन्याच्या बाळाला सुरक्षित बाहेर काढले

बचावकार्यादरम्यान एक महिन्याच्या बाळाला प्लास्टिकच्या टबमध्ये सुरक्षित ठेवून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर बाळासह सर्व कुटुंबीयांना जवळील इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. या धाडसी बचावकार्याबद्दल आरोग्य विभाग आणि अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.  (Jalgaon Rain Update)

‘हतनूर’ धरणाचे सर्व ४१ दरवाजे उघडले

दरम्यान, जळगावमध्ये (Jalgaon) गुरुवारपासून सुरू असलेल्या संततधार आणि जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. धरणक्षेत्रात आणि जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाने हतनूर धरणाचे (Hatnur Dam) सर्व ४१ दरवाजे उघडले आहे. जिल्हाधिकारी रोहन घुगे (District Collector Rohan Ghuge) यांनी या धरणाची पाहणी करुन संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. 

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >