Monday, July 27, 2026

Ladoo : राष्ट्रीय पुरस्कार विजेते शैलेंद्र सिंग यांचं मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण; सत्य घटनेवर आधारित 'लाडू' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Ladoo : राष्ट्रीय पुरस्कार विजेते शैलेंद्र सिंग यांचं मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण; सत्य घटनेवर आधारित 'लाडू' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई: भारतीय चित्रपटसृष्टीत तब्बल २५ वर्षांचा सुवर्णकाळ गाजवणारे, ७२ वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटांची निर्मिती करणारे आणि १२ राष्ट्रीय पुरस्कारांचे मानकरी ठरलेले शैलेंद्र सिंग आता मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवत आहेत. 'लाडू' या चित्रपटाच्या माध्यमातून ते पहिल्यांदाच एका मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. 'बॉस एंटरटेनमेंट' आणि 'ब्रेडविनर प्रोडक्शन्स' प्रस्तुत हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित असून सध्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये(Film festival)  प्रचंड गाजत आहे.

चित्रपटाची वैशिष्ट्ये: ९ अस्सल मराठी गाणी या चित्रपटात एकूण ९ गाणी असून ती या चित्रपटाच्या भावनिक प्रवासाचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहेत. लवकरच या गाण्यांचा औपचारिक लाँच सोहळा पार पडणार आहे.

‘कांचीवरम’, ‘हनुमान’, ‘कॉर्पोरेट’ आणि ‘डोर’ यांसारख्या सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या चित्रपटांची निर्मिती करणारे, तसेच भारतातील पहिली पाकिस्तानी चित्रपटसृष्टीतील कलाकृती भारतात प्रदर्शित करणारे शैलेंद्र सिंग(Shailendr singh) आपल्या या पहिल्या मराठी दिग्दर्शकीय प्रवासाविषयी म्हणतात, “मी ७२ चित्रपटांची निर्मिती केली आहे आणि यापूर्वी काही चित्रपट दिग्दर्शितही केले आहेत, पण दिग्दर्शक म्हणून मी केलेला हा पहिलाच मराठी चित्रपट आहे. हा चित्रपट माझ्या हृदयाच्या अत्यंत जवळ राहील आणि तो माझ्यासोबत कायम राहील.

अभिनेते प्रदीप गोगटे खरोखरच विलक्षण आहेत – ते आपल्या निःशब्द अभिनयातून एका माणसाचं संपूर्ण आयुष्य या पडद्यावर उभं करतात.” या चित्रपटाची निर्मिती ‘बॉस एंटरटेनमेंट’ आणि ‘ब्रेडविनर प्रोडक्शन्स’ सह-निर्माती सोनिया नासेरी कोल यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली आहे.

मुंबई, ठाणे आणि कर्जतच्या मातीवर कृष्ण-धवल (Black & White) स्वरूपात चित्रित झालेला हा १०३ मिनिटांचा मराठी चित्रपट मानवी संघर्षाची अत्यंत भावनिक आणि वास्तवावादी गाथा मांडतो. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित असून सध्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये पाठवला जात आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >