नवी दिल्ली : भारतीय वंशाचे जॅझ संगीतकार प्रितेश वालिया यांची अमेरिकेत ICEच्या ताब्यात तब्बल 14 दिवस राहिल्यानंतर जामिनावर सुटका झाली आहे. 2 ऑगस्ट रोजी लॉस एंजेलिसला परतल्यानंतर त्यांना अमेरिकेच्या इमिग्रेशन अँड कस्टम्स एन्फोर्समेंटने (ICE) ताब्यात घेतले होते. सुटका झाल्यानंतर वालिया यांनी या काळात मानसिकदृष्ट्या खूप कठीण परिस्थितीचा सामना करावा लागल्याचे सांगितले.
वालिया हे त्यांच्या मैत्रीण लिसासोबत लॉस एंजेलिसला परतले होते. विमानतळावर परतल्यानंतर त्यांना अचानक ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्यांना कॅलिफोर्नियातील अॅडेलँटो ICE प्रोसेसिंग सेंटरमध्ये नेण्यात आले. ताब्यात घेतल्यानंतर त्यांचा फोन आणि इतर वैयक्तिक वस्तूही जप्त करण्यात आल्याने त्यांना बाहेरील जगाशी संपर्क साधता आला नाही.
झारखंड : झारखंडमध्ये तब्बल 24 दिवसांपासून सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला अखेर यश मिळाले आहे. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी सोमवारी झालेल्या विशेष ...
वालिया यांची मैत्रीण लिसाने त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करत चाहत्यांना या घटनेची माहिती दिली होती. वालिया यांच्या कुटुंबीयांसह वकिलांकडून त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू असल्याचे तिने सांगितले होते. दरम्यान, ICEकडून त्यांच्या ताब्याबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. त्यांच्या व्हिसाच्या स्थितीबाबतही वालिया यांनी सार्वजनिकपणे कोणतीही सविस्तर माहिती दिलेली नाही.
सुटकेनंतर वालिया यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर केली. अटकेत असताना अनेक वेळा आपण पूर्णपणे खचून गेल्यासारखे वाटले आणि पुढे काय होईल याची चिंता होती, असे त्यांनी सांगितले. मात्र कुटुंबीय, मित्र, वकील आणि जॅझ संगीत क्षेत्रातील सहकाऱ्यांकडून मिळालेल्या पाठिंब्यामुळे त्यांना या कठीण काळातून बाहेर पडण्याचे बळ मिळाले.
प्रितेश वालिया यांचा जन्म नवी दिल्ली येथे झाला. वयाच्या 13 व्या वर्षी त्यांनी भारतीय शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली. पुढील शिक्षणासाठी ते अमेरिकेत गेले आणि तेथे संगीत क्षेत्रातील शिक्षण घेतले. सोशल मीडियावरही त्यांचा मोठा चाहतावर्ग असून इंस्टाग्रामवर त्यांना 57 हजारांहून अधिक लोक फॉलो करतात.
सुटकेनंतर सध्या काही काळ प्रसिद्धीपासून दूर राहून कुटुंबासोबत वेळ घालवण्याचा आणि विश्रांती घेण्याचा निर्णय वालिया यांनी घेतला आहे. त्यांच्या सुटकेनंतर त्यांच्या चाहत्यांनीही सोशल मीडियावर आनंद व्यक्त केला आहे.





