Saturday, July 25, 2026

पर्यावरण

पर्यावरण

जीवनगंध-पूनम राणे मुसळधार पाऊस कोसळत होता. सगळीकडे अंधारल्यासारखे झाले होते. सोसाट्याचा वाराही सुटला होता. मध्येच विजांचा कडकडाट सुरू होता. सोसाट्याच्या सुटलेल्या वाऱ्यामुळे कित्येक वर्षांचे जुने वडाचे झाड कोलमडून पडले होते. त्याच्या फांद्या चोहीकडे विखुरल्या होत्या. दोन दिवसांपूर्वीच वटपौर्णिमेला या वटवृक्षाची पूजा करून अनेक महिलांनी प्रदक्षिणाही घातलेल्या होत्या.अनेक वाटसरूंचे गाईगुरांचे ते आश्रयाचे ठिकाण झालेले होते. कित्येक वर्षं या वटवृक्षाखाली गाई, म्हशी यांनी विसावा घेतला होता.शाळा ही नुकतीच सुटली होती. अनेक विद्यार्थी रेनकोट, छत्री घेऊन त्या झाडाच्या खालून कित्येक वेळा गेले होते. काल रात्री नुकतेच हे झाड कोसळल्याने अनेकांना माहीतही नव्हते. विद्यार्थी ते दृश्य पाहत होते. कित्येक दिवस त्या झाडावर विसरणारी चिमणी पाखरे वटवृक्षाची ती अवस्था पाहून कातर स्वरात अडवत होते. अनेक वर्षांचे त्या वटवृक्षाचे आणि त्या पक्ष्यांचे नाते जडलेले होते.महानगरपालिकेची माणसे येऊन त्या वटवृक्षाला करवतीने कापत होते. त्याचे छोटे छोटे ओंडके तयार करत होते. पाहणाऱ्यांच्या मनाला वेदना होत होत्या. महिलांना अश्रू अनावर होत होते.सौरभ आणि त्याचे आजोबा रोज सायंकाळी या झाडाखाली बसून गप्पागोष्टी करत असायचे. आजोबा सौरभला गोष्टी ऐकवायचे.

सौरभला ही गोष्ट कळतात त्याला अतिशय वाईट वाटले. त्यांनी पळत जाऊन आपल्या आजोबांना ही गोष्ट सांगितली. आजोबांना खूपच वाईट वाटले. ते म्हणाले ,“सौरभ, पर्यावरणाचे संरक्षण करणारा हा वटवृक्ष समस्त मानव जातीला खूप मोठा धडा शिकवून गेला. प्राणवायूच्या रूपाने आपण सर्वजण श्वास घेतो. हे सर्व या निसर्गामुळे घडते. मात्र या बदल्यात आपण या निसर्गाला काही देत नाही. या वटवृक्षाची आठवण म्हणून आपण ही संकल्प करूया,” या पावसाळ्यामध्ये प्रत्येकाने एक नवीन झाड लावू. त्याला नियमित पाणी घालून त्याची काळजी घेऊ. पर्यावरणाचे संरक्षण करू.कोणत्याही प्रकारे निसर्ग चक्रात मानवाने बाधा आणता कामा नये याची पुरेपूर काळजी आपण घेऊ.यानंतर जनजागृती मोहिमेचे आयोजन करायचे आजोबांनी ठरवले. दुसऱ्या दिवशी आजोबा सौरभच्या शाळेत गेले. तेथील मुख्याध्यापकांची परवानगी घेऊन, इयत्ता सहावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना सोबत घेऊन ते कोसळलेल्या वटवृक्षापाशी आले. विद्यार्थ्यांना त्यांनी या वटवृक्षाची हकीकत सांगितली आणि त्या वटवृक्षाच्या जागी विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्याचे महत्त्वाचे काम आजोबांनी करून घेतले.विद्यार्थ्यांनी केलेल्या वृक्ष लागवडीमुळे पुन्हा एकदा वटवृक्षाचा परिसर हिरवागार झाला. निसर्ग चक्राचा आपण एक भाग आहोत. याची प्रचिती सर्व विद्यार्थ्यांना आली.मुख्याध्यापकांनी आपल्या शालेय विद्यार्थ्यांना या उपक्रमात सहभागी करून घेतल्याबद्दल आजोबांचे आभार मानले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा