Saturday, July 25, 2026

Pune Metro : IT कर्मचाऱ्यांची ट्रॅफिकमधून सुटका! हिंजवडी मेट्रोला अखेर 'ग्रीन सिग्नल'; माण ते बालेवाडी प्रवासी सेवेचा मार्ग मोकळा

Pune Metro : IT कर्मचाऱ्यांची ट्रॅफिकमधून सुटका! हिंजवडी मेट्रोला अखेर 'ग्रीन सिग्नल'; माण ते बालेवाडी प्रवासी सेवेचा मार्ग मोकळा

पुणे : पुण्यातील वाहतूक कोंडीची डोकेदुखी ठरलेल्या हिंजवडी IT पार्कच्या प्रवाशांसाठी अत्यंत दिलासादायक आणि मोठी बातमी समोर आली आहे. हिंजवडीला शहराच्या मुख्य भागाशी जोडणाऱ्या 'पुणे मेट्रो मार्गिका-३' (हिंजवडी ते शिवाजीनगर) या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील प्रवासी वाहतुकीला अधिकृत मंजुरी मिळाली आहे. मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी (CMRS) माण स्थानक ते आर. के. लक्ष्मण म्युझियम (बालेवाडी) या १२ स्थानकांच्या टप्प्यावर प्रवासी सेवा सुरू करण्यासाठी २३ जुलै २०२६ रोजी 'तात्पुरते प्राधिकरण' (Provisional Authorization) मंजूर केले आहे. या हिरव्या कंदिलामुळे आता बालेवाडी ते हिंजवडीदरम्यान मेट्रो ताशी ८० किलोमीटरच्या वेगाने धावणार आहे.

सुरक्षा तपासणी आणि तांत्रिक चाचण्या पूर्ण

सुमारे १३ किलोमीटर लांबीचा हा दुहेरी मार्ग ७५० व्होल्ट डीसी 'थर्ड रेल ट्रॅक्शन' प्रणालीवर चालणार आहे. मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या पथकाने ५ ते ८ जुलै २०२६ दरम्यान 'पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड' (PITCMRL) च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत या संपूर्ण मार्गाची प्रत्यक्ष पाहणी केली होती. या पाहणीदरम्यान आयुक्तांनी उपस्थित केलेल्या सर्व तांत्रिक आणि सुरक्षिततेच्या मुद्द्यांची कंपनीने यशस्वी पूर्तता केली. सीबीटीसी (CBTC) सिग्नलिंग प्रणालीअंतर्गत 'एटीपी' मोडवर मेट्रोची चाचणी घेण्यात आली असून सर्व सुरक्षा मानके पूर्ण झाल्यानंतरच ही मंजुरी देण्यात आली आहे.

सर्वच परवानग्यांचे 'ना-हरकत' प्रमाणपत्र

प्रवासी वाहतूक सुरू करण्यापूर्वी सुरक्षा आयुक्तांनी सर्व महत्त्वाच्या तांत्रिक विभागांची पडताळणी केली. यामध्ये आयएसए (ISA) प्रमाणपत्र, मुख्य विद्युत निरीक्षकांचे (CEIG) ना-हरकत प्रमाणपत्र, दूरसंचार विभागाचा (DoT) परवाना, तसेच सर्व १२ स्थानकांसाठी लागणारी अग्निशमन दलाची ना-हरकत प्रमाणपत्रे (NOC) तपासण्यात आली. याशिवाय ट्रॅक, सिग्नलिंग, स्थापत्य आणि रोलिंग स्टॉक प्रणालींची काटेकोर चाचणी पूर्ण झाल्याने मेट्रोच्या प्रवासाला पूर्ण सुरक्षा कवच मिळाले आहे.

प्रकल्पातील ऐतिहासिक टप्पा : प्रशासनाचा दावा

या यशाबद्दल बोलताना 'पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड'चे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल कुमार सैनी यांनी ही सुरक्षा मंजुरी म्हणजे प्रकल्पातील एक ऐतिहासिक टप्पा असल्याचे सांगितले. पुणेकरांच्या सेवेत उच्च दर्जाची, सुरक्षित आणि शाश्वत वाहतूक व्यवस्था आणण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत, असे ते म्हणाले. दुसरीकडे, पीएमआरडीए (PMRDA) प्रशासनानेदेखील या मंजुरीमुळे उर्वरित प्रक्रिया वेगाने पूर्ण करून ही सेवा लवकरात लवकर नागरिकांसाठी खुली करण्याचे आश्वासन दिले आहे. या मेट्रोमुळे हिंजवडी परिसरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >