Thursday, July 23, 2026

Bengaluru Triple Murder : AIच्या मदतीने रचला 3 खुनांचा कट; बंगळुरू ट्रिपल मर्डरप्रकरणात धक्कादायक माहिती समोर

Bengaluru Triple Murder : AIच्या मदतीने रचला 3 खुनांचा कट; बंगळुरू ट्रिपल मर्डरप्रकरणात धक्कादायक माहिती समोर

बंगळुरू : बंगळुरूमधील चर्चेत असलेल्या तिहेरी हत्याकांडाच्या (Triple Murder Case) तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुख्य आरोपीने गुन्हा करण्यापूर्वी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित चॅटबॉटचा वापर करून विविध प्रकारची माहिती शोधल्याचा दावा पोलिस तपासातून करण्यात आला आहे. या घटनेनंतर AI चा गैरवापर आणि त्यावरील नियंत्रणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. (Bengaluru Triple Murder)

जून महिन्यात बंगळुरूच्या के.आर. पुरम परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये 55 वर्षीय व्यक्ती, त्यांच्या 48 वर्षीय पत्नी आणि 20 वर्षीय मुलीची हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर मृत दाम्पत्याची मोठी मुलगी श्वेता आणि तिचा लिव्ह-इन पार्टनर केनेथ हे दोघे बेपत्ता झाल्याने त्यांच्यावर संशय व्यक्त करण्यात आला होता. नंतर पोलिसांनी दोघांना पुदुच्चेरी येथून ताब्यात घेतले. (Crime)

तपासादरम्यान आरोपी केनेथच्या ऑनलाइन शोधांची माहिती समोर आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, त्याने AI ला थेट "हत्या कशी करावी" किंवा "पुरावे कसे नष्ट करावेत" असे प्रश्न विचारले नव्हते. मात्र, घरातघुसखोरावर हल्ला करण्याची सगळ्यात प्रभावी पद्धत कोणती, कोणती साधने प्रभावी ठरू शकतात, एखाद्या व्यक्तीला निष्प्रभ करण्याच्या पद्धती यांसारख्या अप्रत्यक्ष स्वरूपातील प्रश्न विचारून माहिती मिळवण्याचा प्रयत्न केल्याचा दावा तपास यंत्रणांनी केला आहे. (Karnatak News)

तपासात आणखी एक बाब समोर आली आहे. आरोपीने यापूर्वी क्लाऊड किचन सुरू करण्याच्या नावाखाली लोखंडाची भट्टी खरेदी केली होती. सुरुवातीला मृतदेहांची विल्हेवाट लावण्यासाठी तिचा वापर करण्याचा विचार होता. मात्र ते शक्य नसल्याचे लक्षात आल्यानंतर हा विचार त्याने सोडून दिल्याचे तपासात समोर आले आहे. (Crime News)

पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, या हत्येमागे आर्थिक कारण असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. कुटुंबाकडून होणारा आर्थिक दबाव संपावा, या उद्देशाने आरोपीने हा कट रचल्याचा तपास यंत्रणांचा दावा आहे. दरम्यान, या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून न्यायालयीन प्रक्रियेनंतरच सर्व आरोपांची सत्यता स्पष्ट होणार आहे. (Triple Murder Case)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >