Thursday, July 16, 2026

Transformation of railway stations : पंतप्रधान मोदी उद्या ७५ स्थानके राष्ट्राला करणार समर्पित; 'अमृत भारत' योजनेचा वेग वाढला

Transformation of railway stations : पंतप्रधान मोदी उद्या ७५ स्थानके राष्ट्राला करणार समर्पित; 'अमृत भारत' योजनेचा वेग वाढला

मुंबई: रेल्वे प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा मिळाव्यात आणि स्थानकांचे रूप पालटावे, या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या ‘अमृत भारत स्टेशन योजने’चा पुढील टप्पा उद्या, १७ जुलै २०२६ रोजी पूर्ण होत आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशातील नूतनीकरण केलेल्या ७५ रेल्वे स्थानकांचे लोकार्पण करणार आहेत. यात मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील जुन्नारदेव स्थानकाचाही समावेश आहे.

जुन्नारदेव स्थानकाचा नवा अवतार

मध्य प्रदेशातील जुन्नारदेव रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासासाठी २५.४० कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. हे स्थानक पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे असून, तामिया हिल्स, पातालकोट व्हॅली आणि करंजी धबधबा यांसारख्या पर्यटन स्थळांना जोडणारे हे एक प्रमुख प्रवेशद्वार आहे. आधुनिक स्थानक इमारत, वातानुकूलित प्रतीक्षा कक्ष, दिव्यांग-स्नेही सुविधा आणि विस्तारित शेड यामुळे या स्थानकाचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलला आहे. दररोज सुमारे २,८६७ प्रवाशांना या आधुनिक सुविधांचा लाभ मिळणार आहे.

महाराष्ट्रातही विकासाचा वेग

देशातील एकूण १३३७ स्थानकांच्या पुनर्विकासाचे लक्ष्य ‘अमृत भारत स्टेशन योजने’द्वारे ठेवण्यात आले आहे. महाराष्ट्रातही या योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू असून, राज्यातील १३२ स्थानके या योजनेत निवडली गेली आहेत. यापैकी आतापर्यंत १५ स्थानकांचे काम पूर्ण झाले असून, ती राष्ट्राला समर्पित करण्यात आली आहेत.

पूर्ण झालेली महत्त्वाची स्थानके:

  • मुंबई विभाग: चिंचपोकळी, परळ, वडाळा रोड, माटुंगा, शहाड.

  • पुणे विभाग: केडगाव, लोणंद.

  • भुसावळ विभाग: लासलगाव, देवळाली, सावदा, धुळे, मूर्तिजापूर.

  • नागपूर विभाग (द.पू.म. रेल्वे): चांदा फोर्ट, इतवारी, आमगाव.

भविष्यासाठी सज्ज रेल्वे स्थानके

या योजनेचा मुख्य उद्देश प्रवाशांचा प्रवास सुखकर करणे आणि स्थानकांना स्थानिक वारशाची ओळख देणे हा आहे. आधुनिक तंत्रज्ञान, उत्तम स्वच्छता आणि सुलभ प्रवेशावर (दिव्यांग-स्नेही सुविधा) या योजनेद्वारे विशेष भर दिला जात आहे. उर्वरित स्थानकांच्या पुनर्विकासाचे काम युद्धपातळीवर सुरू असून, भारतीय रेल्वे आधुनिक भारताच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावत आहे, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील निला यांनी दिली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >