Wednesday, August 5, 2026

MHADA Lottery : म्हाडाच्या दोन हजार ६४० सदनिकांसाठी निघणार सोडत, ७५ हजार १२७ अर्जदारांचे लक्ष

MHADA Lottery : म्हाडाच्या दोन हजार ६४० सदनिकांसाठी निघणार सोडत, ७५ हजार १२७ अर्जदारांचे लक्ष

मुंबई : म्हाडा मुंबई (MHADA Mumbai) मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील २,६४० सदनिकांच्या विक्रीसाठी संगणकीय सोडत (MHADA Lottery) उद्या गुरुवारी ६ ऑगस्ट, २०२६ रोजी मुंबईतील रंगशारदा सभागृह, वांद्रे (पश्चिम) येथे आयोजित करण्यात आली आहे. २,६४० सदनिकांच्या विक्रीसाठी आयोजित संगणकीय सोडतीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. सोडतीसाठी ७५,१२७ अर्ज प्राप्त झाले असून प्रती सदनिका सरासरी २८.५४ अर्ज प्राप्त झाले आहेत, अशी माहिती म्हाडामार्फत देण्यात आली.

कौशल्य ,रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगराचे सह पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या प्रमुख उपस्थितीत व इलेक्ट्रोनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सांस्कृतिक कार्यमंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमामध्ये गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांच्या हस्ते सोडत काढण्यात येणार आहे. त्याचबरोबर मुंबईच्या महापौर रितू तावडे व खासदार वर्षा गायकवाड उपस्थित राहणार आहेत. तसेच गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव असीम कुमार गुप्ता व 'म्हाडा'चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल, मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर तसेच अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सोडतीचे थेट प्रक्षेपण गुरुवार सहा ऑगस्ट २०२६ रोजी म्हाडाचे अधिकृत यूट्यूब चॅनल @mhadaofficial आणि फेसबुक पेजवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सोडतीचा निकालही तात्काळ म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे म्हाडातर्फे सांगण्यात आले आहे.

यंदाच्या सोडतीत मुंबईतील विविध ठिकाणी असलेल्या सदनिकांचा (Flats) समावेश आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS), कमी उत्पन्न गट (LIG), मध्यम उत्पन्न गट (MIG) आणि उच्च उत्पन्न गट (HIG) यांसारख्या विविध उत्पन्न गटांतील खरेदीदारांना घराचं स्वप्न पूर्ण करण्याची संधी सोडतीच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. विक्रोळी, गोरेगाव, मालाड, पवई, अंधेरी, वडाळा, सायन, ताडदेव तसेच MMR क्षेत्रातील घरांचा समावेश सोडतीत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >