Wednesday, July 15, 2026

Srirampur : श्रीरामपूरात विराट एल्गार ‘महा मोर्चा’, आकाश दुबय्या हत्याप्रकरणी प्रशासनाकडे केल्या 'या' मागण्या

Srirampur : श्रीरामपूरात विराट एल्गार ‘महा मोर्चा’, आकाश दुबय्या हत्याप्रकरणी प्रशासनाकडे केल्या 'या' मागण्या

Srirampur : श्रीरामपूर शहरात मागील काही दिवसांपासून घडत असलेल्या गंभीर गुन्हेगारी घटनांच्या निषेधार्थ बुधवारी नागरिकांनी अभूतपूर्व एकजूट दाखवत शहरात विराट ‘महामोर्चा’ काढला. व्यापारी, विविध सामाजिक संघटना, सर्वपक्षीय पदाधिकारी, शैक्षणिक संस्था, युवक, महिला तसेच हजारो नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण शहरात जनआक्रोशाचे चित्र पाहायला मिळाले. वाढती गुन्हेगारी रोखण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याचा आरोप करत आंदोलकांनी गुन्हेगारांवर कठोर कारवाईची मागणी केली. (Shrirampur Crime News)

आकाश दुबय्या यांच्या हत्येने शहर हादरले

गेल्या अकरा दिवसांत श्रीरामपूर शहरात घडलेल्या सलग गंभीर घटनांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. शहरात फायरिंगच्या घटना, कोयत्याने करण्यात आलेले हल्ले, अवैध शस्त्रांचा वाढता वापर आणि त्यातच व्यावसायिक आकाश दुबय्या यांच्या निर्घृण हत्येने संपूर्ण शहर हादरले आहे. या घटनेनंतर व्यापारी वर्गासह सर्वसामान्य नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून गुन्हेगारीविरोधात एकत्र येण्याचा निर्धार करण्यात आला. त्याचाच परिपाक म्हणून आजचा विराट मोर्चा काढण्यात आला. (Shrirampur Crime News)

मोर्चाची सुरुवात रेल्वे स्टेशन परिसरातील हनुमान मंदिर येथून करण्यात आली. त्यानंतर मेन रोड, छत्रपती शिवाजी महाराज रोड मार्गे शिस्तबद्ध पद्धतीने मोर्चा पुढे सरकत छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे सांगता झाली. संपूर्ण मार्गावर आंदोलकांनी "गुन्हेगारी बंद करा, आकाश दुबय्या यांना न्याय द्या,शहर सुरक्षित करा, गुंडगिरीचा बंदोबस्त करा अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. शहरातील प्रमुख मार्गांवर नागरिकांची मोठी गर्दी झाल्याने काही काळ वाहतुकीवरही परिणाम झाला. या मोर्चाचे नेतृत्व आमदार हेमंत ओगले आणि नगराध्यक्ष करण ससाणे यांनी केले. यावेळी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी, सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. (Shrirampur Crime News)

गुनेहगारीवर कायमचा आळा घाला

पक्षीय राजकारण बाजूला ठेवून शहराच्या सुरक्षेसाठी सर्वजण एका व्यासपीठावर आल्याचे चित्र या मोर्चात पाहायला मिळाले.मोर्चा दरम्यान उपस्थित नेत्यांनी आणि नागरिकांनी प्रशासनावर तीव्र शब्दांत टीका केली. शहरात सातत्याने वाढत असलेल्या गुन्हेगारी घटनांमुळे सर्वसामान्य नागरिक भयभीत झाले असून व्यापाऱ्यांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाल्याचे त्यांनी नमूद केले. केवळ गुन्हे दाखल करून चालणार नाही, तर गुन्हेगारीला कायमचा आळा घालण्यासाठी प्रभावी आणि कठोर उपाययोजना करणे आवश्यक असल्याची भूमिका आंदोलकांनी मांडली. (Shrirampur Crime News)

आकाश दुबय्या हत्याप्रकरणातील आरोपींवर कठोर कलमांखाली कारवाई करण्यात यावी, शहरातील सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात, अवैध शस्त्र विरोधात विशेष मोहीम हाती घ्यावी, रात्रीची पोलीस गस्त वाढवावी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी ठोस कृती आराखडा जाहीर करावा, अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी अधिक प्रभावी भूमिका बजावावी, अशीही अपेक्षा व्यक्त करण्यात आली. (Shrirampur Crime News)

शहरात बंदची हाक

दरम्यान, आकाश दुबय्या हत्येच्या निषेधार्थ व्यापारी वर्गाने गेल्या तीन दिवसांपासून स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा दिला होता. शहरातील अनेक व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद राहिल्याने व्यापाऱ्यांनी आपल्या आर्थिक हितापेक्षा शहराच्या सुरक्षेला प्राधान्य दिल्याचे चित्र दिसून आले. या बंदला विविध व्यापारी संघटना, सामाजिक संस्था आणि नागरिकांचाही मोठा प्रतिसाद मिळाला.आजच्या विराट मोर्चामुळे श्रीरामपुरातील गुन्हेगारी विरोधात जनआंदोलनाला अधिक व्यापक स्वरूप प्राप्त झाले आहे. शहरातील प्रत्येक घटकाने एकत्र येत कायदा-सुव्यवस्था मजबूत करण्याची मागणी लावून धरली असून प्रशासनाने आता तातडीने ठोस आणि परिणामकारक पावले उचलावीत, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. (Shrirampur Crime News)

इतिहासात पहिल्यांदाच मोठा जनसागर रस्त्यावर

श्रीरामपूरच्या इतिहासात गुन्हेगारीविरोधात इतक्या मोठ्या प्रमाणावर नागरिक रस्त्यावर उतरल्याची ही महत्त्वाची घटना मानली जात असून, या आंदोलनानंतर प्रशासन कोणते निर्णय घेते आणि शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना राबवते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. नागरिकांनी व्यक्त केलेला रोष आणि सुरक्षित शहराची मागणी ही केवळ एका घटनेपुरती मर्यादित नसून भविष्यात श्रीरामपूरमध्ये कायदा-सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी हा मोर्चा महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याची भावना यावेळी अनेकांनी व्यक्त केली.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >