Wednesday, July 15, 2026

Shrirampur : आकाश दुबैय्या हत्या प्रकरण : माझा कोणताही संबंध नाही; सिद्ध झाल्यास गुन्हा दाखल करा - सागर बेग

Shrirampur : आकाश दुबैय्या हत्या प्रकरण : माझा कोणताही संबंध नाही; सिद्ध झाल्यास गुन्हा दाखल करा - सागर बेग

Shrirampur : आकाश दुबैय्या हत्या प्रकरणानंतर श्रीरामपूरमधील (Shrirampur) राजकीय वातावरण अधिकच तापले असून आरोप-प्रत्यारोपांना नवे वळण मिळाले आहे. राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष तथा शिवसेना (शिंदे गट)चे नेते सागर बेग यांनी पत्रकार परिषद घेत आमदार हेमंत ओगले यांच्यावर जोरदार टीका केली. हत्या प्रकरणाशी आपला कोणताही संबंध नसल्याचा ठाम दावा करत, संबंध सिद्ध झाल्यास स्वतःवर गुन्हा दाखल करण्याचे खुले आव्हान त्यांनी दिले. तसेच विनाकारण बदनामी करणाऱ्यांविरोधात मानहानीचा दावा दाखल करण्याचा इशाराही त्यांनी दिला. (Aakash Dubaiaya Murder Case)

राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष तथा शिवसेना (शिंदेगट)चे नेते सागर बेग (Sagar Beg) यांनी पत्रकार परिषद घेत आमदार हेमंत ओगले (MLA Hemant Ogle) यांच्यावर थेट निशाणा साधला. हत्या प्रकरणाशी आपला कोणताही संबंध नसल्याचा दावा करत, संबंध सिद्ध झाल्यास स्वतःवर गुन्हा दाखल करावा, असे आव्हान त्यांनी दिले. तसेच विनाकारण बदनामी केल्याप्रकरणी संबंधितांविरोधात मानहानीचा दावा दाखल करण्याचा इशाराही दिला. (Aakash Dubaiaya Murder Case)

संशयाचा आधार घेत राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न

बेग म्हणाले की, शनिवार ( ११ जुलै ) रोजी घटना घडत असताना हॉटेल व्यावसायिक शेखर दुबैय्या (Shekhar Dubaiaya) यांचा सर्वप्रथम आपल्याला फोन आला. हॉटेलमध्ये मुंबईहून आलेल्या काही व्यक्तींकडून मुलांना मारहाण होत असल्याची माहिती त्यांनी दिल्यानंतर आपण तातडीने पोलिस उपअधीक्षकांना संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली. आमदार ओगले यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना, "या प्रकरणामागे एखादा 'आका' असल्याचे सांगितले जात आहे; मात्र त्याचे नाव का जाहीर केले जात नाही? केवळ संशयाचे वातावरण निर्माण करून राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न सुरू आहे," असा आरोप त्यांनी केला. (Aakash Dubaiaya Murder Case)

दुबैय्या कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभा

आकाश दुबैय्या यांच्या हत्येबद्दल दुःख व्यक्त करताना बेग म्हणाले, "दुबैय्या कुटुंबाच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत. त्या कुटुंबावर आमचे नाव घेण्यासाठी दबाव आणला जात आहे. घटना घडल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम मलाच संपर्क केला होता. इतर कोणत्याही स्थानिक नेत्याला त्यांनी फोन केला नव्हता. शहर बंद आंदोलनात सहभागी न झाल्याबाबत त्यांनी, "मी शहराबाहेर असल्याने उपस्थित राहू शकलो नाही; अन्यथा नक्की सहभागी झालो असतो," असे स्पष्ट केले. (Aakash Dubaiaya Murder Case)

'मोका'तील गुन्हेगारांबाबत आमदार मौन का ?

बेग यांनी काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वावरही टीका केली. शहरातील गोळीबार, नायगाव हत्या प्रकरण (Naigaon murder case) तसेच 'मोका'तील गुन्हेगारांबाबत आमदार मौन का बाळगतात, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. नागरिकांना दबाव टाकून दुकाने बंद करण्यास प्रवृत्त केल्याचाही आरोप त्यांनी केला.सरस्वती कॉलनीतील सोनू बेग यांच्या घरावरील पोलिस झडतीवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सरकारी पंचांशिवाय कारवाई करण्यात आली आणि संपूर्ण कारवाईचे चित्रीकरणही नव्हते, असा दावा करत या कारवाईमागे काही प्रभावशाली राजकीय व्यक्तींचा हात असल्याचा आरोप त्यांनी केला.

खोटे आरोप करणाऱ्यांना न्यायालयात खेचणार

आमच्या कुटुंबाचा कोणत्याही बेकायदेशीर व्यवसायाशी संबंध नाही. माझा या हत्या प्रकरणातील आरोपींशी संबंध असल्याचे कोणी सिद्ध केले तर माझ्यावर गुन्हा दाखल करावा. मात्र, खोटे आरोप करणाऱ्यांना न्यायालयात उत्तर द्यावे लागेल, असे बेग यांनी स्पष्ट केले. राजकारणात वाढत असलेल्या जनाधारामुळे आपल्याला जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात असल्याचा आरोप करत त्यांनी माध्यमांनाही आवाहन केले. कोणतीही बातमी प्रसिद्ध करण्यापूर्वी वस्तुस्थितीची शहानिशा करूनच ती प्रसिद्ध करावी, असे आवाहन सागर बेग यांनी यावेळी केले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >