एका शेतात बाजूबाजूला दोन बिया असतात. पाऊस पडतो. पहिल्या पावसात दोघी खूप भिजतात. पहिली म्हणते, “हा पाऊस बघ. मला भिजवलं. माझी माती खराब करून टाकली. किती त्रास दिला देवाने.” दुसरी बी म्हणते,“अगं वेडी हा पाऊस आपल्यासाठीच आला आहे. मी तर या पावसाच्या पाण्याने मोठी होईन. झाड बनेन. फुलं, फळं देईन.” काही दिवसांनी पहिली बी जी नकारात्मक होती जिने तक्रार केली ती कुजून गेली आणि दुसऱ्या बीपासून मोठा वृक्ष तयार झाला. ही आहे कृतज्ञता. परिस्थिती सारखी असली तरी आपण त्याकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो हे महत्त्वाचं आहे. सुख देणाऱ्यास सुख मिळतेच. पण केलेल्या उपकारांची जाणीव कधीच विसरू नये. देवाने, आई-वडिलांनी, आपल्या मित्र-मैत्रिणींनी आपल्याला जे काही दिलं आहे, त्याबद्दल आपण नेहमी त्यांचे आभार मानले पाहिजेत. अडचणीच्या वेळी कुणाचा मदतीचा हात पुढे आला तरी थँक्यू म्हटलं पाहिजे. आयुष्य तक्रार करण्यात घालवण्यापेक्षा, आभार मानण्यामध्ये घालवा. हीच देवाविषयी कृतज्ञता. ज्याला आपण म्हणतो ग्रॅटीट्यूड.
पुढील सद्गुण आहे... दातृत्व! देण्याचा आनंद हा घेण्याच्या आनंदापेक्षा कैकपटीने मोठा असतो. एकदा एक राजा आपल्या राज्यात फिरत होता. सवारी निघाली. खूप लांबवर गेल्यावर राजाला लागली भूक. वाटेत भिकारी भेटला. भिकाऱ्याकडे फक्त दोन भाकऱ्या होत्या. राजाने विचारले, बाबा मला भूक लागली. मला भाकरी देशील का तू? भिकाऱ्याने भाकरी राजाला दिली. राजा खूश झाला. विचारलं तुला या बदल्यात मी काय देऊ? भिकारी म्हणाला, “महाराज तुमच्या चेहऱ्यावरचे समाधान पाहून त्यानेच माझं पोट भरलं.” राजा पुढे गेला. संध्याकाळी परत येताना त्याने भिकाऱ्याला दहा सुवर्ण मुद्रा दिल्या. भिकारी रडू लागला. राजाने विचारलं, काय रे काय झालं? आनंद नाही का झाला? महाराज, तुम्ही मला दहा सोन्याच्या मोहरा दिल्यात, मी तर साधी एक भाकरी दिली होती. राजा म्हणाला,“ मी राजा आहे तरी तू मला जेवायला दिलं. माझं पोट भरलं. आज माझ्याकडे सगळं होतं. पण मला त्या वेळेला तू तुझ्यातलं खायला दिलं. तुझ्या दोनपैकी एक भाकरी मला देऊन तू स्वतः उपाशी अर्धपोटी राहिलास. म्हणून तू खरा दानशूर आहेस.”
दानशूरपणा म्हणजे किती दिलं हे मोजमाप नाही, तर आपण कोणत्या वेळी गरजवंताची भूक भागवली. तहान भागवली, तर ते दातृत्व फार मोठं असतं. देणाऱ्याचा हात कधीच रिकामा राहत नाही. दिल्याने वाढतं, मग ते पैसा, ज्ञान, वेळ, प्रेम काहीही असो आपल्याकडे येतं. पुण्य मिळतं. आपले पूर्वज पोटाला चिमटा काढून आपल्या मुलाबाळांसाठी पै पै जमा करून ठेवत असत. आपल्या कमाईतील थोडासा तरी हिस्सा दातृत्वाकडे जावा, हे सगळ्यांसाठी महत्त्वाचे आहे. या निसर्गाकडून दातृत्व शिकले पाहिजे. सर्व पोटात घेणारा अथांग समुद्र. उत्तुंग पर्वत. सातत्याने वाहणारी नदी. समतेने सर्वांची तहान भागवते. झाड समतेने सर्वांना प्राणवायू, हवा, फुलं, फळं, अन्नधान्यं, औषधे कायम देतच असतात. फुलं विविधरंगी विविध सुवासिक असतात. त्यांना कुठे माहीत असतं आज ती देव्हाऱ्यात जाणार की कुणाच्या प्रेतावर. तरी ती फुलतातच. काट्यातूनही फुलणाऱ्या गुलाबाकडे पाहा, चिखलात उमलणाऱ्या कमळाकडे पाहा. हेच आपल्याला सांगतात, की देत राहा.
सहृदयता. संत तुकोबाराय देहू गावात राहायचे. त्यांच्या घरी एका रात्री चोर शिरला. बघितलं तर घरात काहीच नाही मिळाले. चोराला जुने फाटके कपडे, लुगडी, मडकी आणि अभंगाची वही. चोर निराश होऊन परत जायला निघाला. तितक्यात संत तुकोबाराय उठले. त्यांची झोप उडाली आणि त्यांनी चोराला हसून म्हटलं, अरे बाबा काही न घेता का जातोय! थांब!! चोराची भंबेरी उडाली. तुकोबांनी आपली जुनी धोतरे चोराच्या हाती दिली. घे रे बाबा, हे तरी आता इतकंच आहे. रिकामी हाती नको जाऊस! तुमच्या घरात द्यायला काहीच नाही आणि तरी तुम्ही मला हे देता. मी पापी आहे. महाराज मला माफ करा. चुकलो मी. तुम्ही पुण्यवान आहात. मी आजपासून पुन्हा असं काही करणार नाही असे म्हणत त्याने कपडे परत केले. तो चोर माफी मागून तेव्हा तिथून निघून गेला. आपला शत्रूही सेवेमुळे मित्र होतो. संत तुकोबारायांनी त्या चोराची मानसिकता बदलली आणि चांगुलपणाच्या सामर्थ्यावर चोराला सत्संगामध्ये सामील करून घेतले.
सेवा... संत एकनाथ महाराज पैठणमध्ये राहायचे. रोज सकाळी ते गोदावरीला स्नानासाठी जात. त्यांच्या वाटेत जाण्या-येण्याच्या रस्त्यावर एक माणूस दररोज त्यांना शिव्या देत असे. त्यांच्यावर थुंकत असे. दगड मारीत असे. लोक म्हणायचे. महाराज तुम्ही काहीच का नाही बोलत? यांना किती सहन करायचं? महाराज म्हणाले जाऊ दे. बाबांनो. तो माझा गुरू आहे. माझी परीक्षा बघतोय. माझ्या सहनशीलतेची परीक्षा, बघू दे. त्याला काय करायचं ते करू दे! महाराजांना त्रास देणारा हाच माणूस एके दिवशी खूप आजारी पडला. तापाने फणफणत होता. त्याला कसलेच भान नव्हते. सर्व काही जागेवरच सुरू होते. घरातली लोकं त्याच्याकडे दुर्लक्ष करत. तो एकटाच खीतपत पडलेला असायचा. एके दिवशी एकनाथ महाराज त्याला भेटायला गेले. त्यांनी आपल्या स्वतःच्या हातांनी त्याची सेवा केली. त्याचे कपडे, घाण केलेली धुवून त्याला स्वच्छ केले. त्याला जेऊखाऊ घातले. स्वतःच्या हाताने त्याची सेवा केली. तेव्हा त्याचे डोळे उघडले. काही दिवसांनी तो माफी मागतो. एकनाथ महाराजांना म्हणतो की मला क्षमा करा. आजपासून मी तुमचा भक्त आहे. कारण माझ्या आजारपणात तुम्ही माझी खूप सेवा केली. दवा औषधे केली आणि आता माझा पुनर्जन्म झाला. म्हणजेच शुद्ध मनाने केलेली कर्म माणसाचे मत आणि मन परिवर्तन करतात. आपली कर्मं चांगली आणि हेतू व मन स्वच्छ असेल तर देव आपल्याला प्रसन्न होतो. म्हणून केलेल्या उपकारांची जाणीव ठेवा. परोपकार करा, दातृत्व करा आणि सेवा करा.






