Sunday, July 5, 2026

Mumbai Rain Update : मुंबईसह राज्यात पावसाचा कहर; अनेक भाग जलमय, धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ

Mumbai Rain Update : मुंबईसह राज्यात पावसाचा कहर; अनेक भाग जलमय, धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ

मुंबई : मुंबई, ठाण्यासह महाराष्ट्रात मान्सूनचा जोर वाढला असून पुढचे चार दिवस ही स्थिती अशीच राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे ७ तारखेपर्यंत राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा हाहाकार सुरू राहणार आहे. हवामान विभागाने पुढच्या तीन दिवसांसाठी मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, पुणे, सातारा जिल्ह्यांसाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला असून अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. काही ठिकाणी ताशी ६० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.(Mumbai Rain Update)

दरम्यान मुंबईत अनेक ठिकाणी झाडे पडण्याच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाल्याची माहिती समोर येत आहे. दादरमधील शिवसेना भवन समोरील मार्गावर झाडं पडले. तसेच वांद्रे येथे उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या वाहनांच्या ताफ्यासमोर झाड पडले. त्यामुळे काही काळ ताफा थांबवावा लागला. कालांतराने रस्ता मोकळा झाल्यावर ताफा पुढे मार्गस्थ झाला.मुंबई उपनगरातील कुर्ला कमानी येथील गोम्स टाऊन इमारतीजवळ असणा-या दुकानावर झाड पडून त्यात युनुस कुंडावाला, वय ६३ वर्षे यांचा मृत्यू झाल्याचे फौजिया रुग्णालयातून कळविण्या‍त आले आहे.मुंबईतील पावसामुळे रेल्वे मंत्रालयाने बुलेट ट्रेनच्या बोगदा खोदण्याच्या कामाचा औपचारिक शुभारंभ पुढे ढकलला आहे. हवामानामुळे रेल्वे मंत्रालयाने बुलेट ट्रेनच्या बोगदा खोदकामाच्या शुभारंभास विलंब केला आहे, परंतु प्रकल्पाला होणारा विलंब टाळण्यासाठी तातडीने काम सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.

अतिमुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचल्याने अनेक मार्ग बंद झाले होते. ज्यात अंधेरीमध्ये अंधेरी सब वे, वीरा देसाई मार्ग आणि स्वामी विवेकानंद मार्ग बंद झाले होते. चेंबूर येथील नूर ए इलाही सर्विस रोडवर पाणी साचले होते. विक्रोळीत हुमा मॉल जंक्शन आणि गांधीनगर जंक्शन, यासारख्या अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक खोळंबली होती. एकूणच अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र दिसत आहे.(Mumbai Rain Update)

मुंबईत कुठे किती पाऊस?

विक्रोळी : १६४ मिमी

राम मंदिर, जोगेश्वरी : १४८.५ मिमी

सांताक्रूझ : १२६.९ मिमी

विद्याविहार : १०२.० मिमी

वांद्रे : ७२.५ मिमी

शीव : ६३.५ मिमी

कुलाबा : ५३.४ मिमी

दुसरीकडे, पश्चिम महाराष्ट्र आणि घाट माथ्यावरही वरुणराजाची कृपा बरसते आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या ९ जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. या डोंगराळ आणि निसर्गरम्य भागात मुसळधार पावसाचा अंदाज असल्याने, विकेंडला बाहेर पडणाऱ्या पर्यटकांनी आणि घाटातून प्रवास करणाऱ्या चालकांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला असून, येथे विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.(Mumbai Rain Update)

पावसाशी संबंधित दुर्घटनांमध्ये राज्यात आतापर्यंत ५ जणांचा मृत्यू झाला आहे. यात मुंबईत ३, पुणे आणि ठाण्यात प्रत्येकी १ व्यक्तीचा समावेश आहे. ३० जूनला मुंबईत एक पिंपळाचे झाड स्कूल बसवर कोसळल्याने एका ११ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला होता. २ जुलैला साकीनाका येथील खैराणी रोडवर ५५ वर्षीय व्यक्ती कंत्राटदारांनी नालेसफाईसाठी मॅनहोलचे झाकण उघडे ठेवल्याने त्यात पडून वाहून गेली. मीरा-भाईंदरमध्ये अंगावर झाड कोसळल्याने आणखी एका पादचाऱ्याचा मृत्यू झाला.

महाराष्ट्राच्या किनारपट्टीपासून ते कर्नाटक किनारपट्टीपर्यंत समुद्रात हवेचा एक कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. हा पट्टा या संपूर्ण आठवड्यात असाच सक्रिय राहणार असल्यामुळे समुद्राकडून येणारे पावसाचे ढग महाराष्ट्राकडे खेचले जात आहेत. बंगालच्या उपसागराच्या वायव्य भागात हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. पुढील दोन दिवसांत हे क्षेत्र अधिक मजबूत आणि सक्रिय होणार आहे. यामुळे मान्सूनच्या वाऱ्यांचा वेग वाढून जास्त पाऊस पडत आहे.या हवामान बदलांमुळे संपूर्ण कोकणपट्टी आणि मध्य महाराष्ट्राच्या मुंबई, पुणे, सातारा, नाशिक परिसरात बहुतांश ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार, तर काही ठिकाणी अत्यंत तीव्र स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. विदर्भात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.राज्यातील धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ होत असली तरी अद्याप समाधानकारक स्थिती निर्माण झालेली नाही. राज्यातील 3 हजार 28 मोठे, मध्यम आणि लघु प्रकल्पांमध्ये एकूण 10 हजार 443 दशलक्ष घनमीटर इतका उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. तो एकूण क्षमतेच्या 25.56 टक्के आहे.(Mumbai Rain Update)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >