Saturday, July 4, 2026

बालपणातील शर्यत, की बालपणाचा प्रवास?

बालपणातील शर्यत,  की बालपणाचा प्रवास?
संस्कार,स्वाती जोशी

कधी काळी... घराच्या अंगणात पडलेली माती, पावसात भिजलेले कपडे, गुडघ्याला झालेली छोटीशी जखम आणि आजीच्या अविस्मरणीय गोष्टी… एवढं सुंदर होतं बालपणाचं विश्व. पण आजचं चित्र बदललं आहे. आपलं बाळ अजून नीट चालायला शिकलेलं नसतं, नुकतंच शब्द जुळवून बोलायला शिकत असतं… आणि आपण मात्र त्याच्या हातात खेळणी देण्याआधी, त्या खेळण्यात ते रमण्याआधीच, त्याला कोणत्या “प्री स्कूल”मध्ये प्रवेश मिळेल? याचा विचार करू लागतो. ॲडमिशन फॉर्म आणण्याची आणि भरून देण्याची घाई सुरू होते.

आजकाल अनेक पालकांना चिंता असते ती — “प्ले-स्कूलमध्ये सीट मिळेल का?”, “इंटरनॅशनल स्कूलमध्ये प्रवेश होईल का?”, “इतर मुलांपेक्षा आपलं मूल मागे तर राहणार नाही ना?”

पण याच वेळी एक महत्त्वाचा प्रश्न आपण विसरतो — आपलं बाळ मोकळेपणाने खेळतंय का? आनंदी आहे का? कल्पना करतंय का? संकल्पना समजून घेतेय का? या भीतीच्या बाजारात “प्ले-स्कूल” आणि “प्री स्कूल” ही गरज कमी आणि एक फॅड अधिक बनत चालली आहे. शाळेच्या नावापुढे “इंटरनॅशनल” पहिले की ती अधिक मोठी, अधिक आवश्यक वाटू लागते. लहान मुलांच्या नैसर्गिक वाढीला वेळ देण्याऐवजी आपण त्यांना एका कृत्रिम शर्यतीत उभं करतोय.

कालपर्यंत आईच्या कुशीत झोपणारं, अंगणात मातीशी खेळणारं, छोट्या छोट्या गोष्टींवर मनापासून हसणारं बाळ... आज अचानक “इंटरव्ह्यू”ला बसलेलं दिसतं. त्याला रंग, प्राणी ओळखता यायला हवेत, कविता म्हणता यायला हव्यात, इंग्रजी बोलता यायला हवं… नाही तर “अॅडमिशन मिळणं कठीण आहे” अशी भीती दाखवली जाते. असं वाटतंय की आता मुलं जन्माला येतानाच, पालकांच्या स्वप्नातील एक “करिअर प्लॅन” घेऊन येतात.

बालपण म्हणजे शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकासाचा, जडणघडणीचा काळ असतो. आपल्या मुलाला सिद्ध करण्याचा हा काळ नसतो. पण आपण इतक्या लवकर त्यांचा “परफॉर्मन्स रिपोर्ट” तयार करू लागलो आहोत की उद्या कदाचित नवजात बाळासाठीही “पहिल्या तीन महिन्यांत, कोणती कौशल्ये विकसित झाली?” असा अहवाल मागितला जाईल.

बाल मानसशास्त्र सांगतं की लहान वयात मुलांना गरज असते ती प्रेमाची, सुरक्षिततेची, खेळाची, कल्पनाशक्तीची, संकल्पना समजून घेण्याची आणि मोकळ्या वातावरणाची. मुलं खेळताना शिकतात, प्रश्न विचारताना शिकतात, निसर्ग अनुभवताना शिकतात आणि चुका करताना शिकतात. पण आपल्याला हवं आहे स्मार्टफोन, स्मार्टवॉचसारखं एक “स्मार्ट बेबी” — जे तीन वर्षांच्या आत परकीय भाषा इंग्रजी बोलेल, कविता म्हणेल, स्क्रीनवर ॲप चालवेल आणि पाहुण्यांसमोर छान “परफॉर्म” करेल. कधी काळी दोन वर्षांच्या मुलाच्या हातात बाहुली, गाडी किंवा मातीचा गोळा असायचा…, आज त्याच्या हातात फ्लॅश कार्ड, वर्कशीट आणि ॲक्टिव्हिटी बुक दिसतं. आपण मुलांना घडवत आहोत की त्यांना एका साच्यात बसवत आहोत? हेच कळत नाही.

कधी कधी वाटतं, आपण मुलांना झाडासारखं डौलदार वाढू देण्याऐवजी त्यांचं “बोन्साय” करत आहोत. बोन्साय सुंदर दिसतो… स्वप्नवत... पण तो मोठा वृक्ष होऊ शकत नाही. त्याची वाढ आपल्या इच्छेनुसार मर्यादित केलेली असते. तसंच आपणही मुलांच्या नैसर्गिक कुतूहलाला, कल्पनाशक्तीला, जिज्ञासू वृत्तीला आणि मोकळ्या खेळाला सतत “योग्य”, “उपयोगी” आणि “भविष्यासाठी आवश्यक” या नावाखाली छाटत आहोत. मुलांना अजून चिखलात पाय घालायचे असतात, पावसात भिजायचं असतं, पक्ष्यांचा आवाज ऐकायचा असतो, निसर्गाशी समरस व्हायचे असते, आजी-आजोबांकडून गोष्टी ऐकायच्या असतात.

पण आपण त्यांना “अल्फाबेट”, “रायटिंग प्रॅक्टिस”, “स्पीकिंग स्किल्स” आणि “परफॉर्मन्स” यांच्या नावाखाली सतत एका शर्यतीत ढकलतो. पळवतो. सगळ्यात गंमत म्हणजे — मोठी माणसं कामाच्या ताणामुळे सुट्टी शोधतात, वीएंडची वाट पाहतात, आरामासाठी वेळ काढतात… ब्रेक घेतात. पण ज्यांचं खरं कामच खेळणं आहे, त्या मुलांना आपण रोजच्या वेळापत्रकात बांधून ठेवतो. त्यांच्या आयुष्यात इतके टास्क भरतो की त्यांना कंटाळा करायलाही वेळ उरत नाही. पण हाच कंटाळा तर त्यांच्या कल्पनाशक्तीचा जन्म असतो. रिकाम्या वेळेतच मुलांना प्रश्न पडतात, जिज्ञासा, उत्कंठा निर्माण होतात, मुलं स्वतःचे खेळ तयार करतात, स्वतःच्या गोष्टी बनवतात आणि स्वतःचं एक सुंदर जग निर्माण करतात.

आपण सतत म्हणतो — “आपल्या मुलांनी पुढे जावं.” पण पुढे जाण्याच्या या स्पर्धात्मक घाईत आपण विसरतो की बालपण आयुष्यात एकदाच मिळतं. कोणतीही मोठी शाळा, महागडा क्लास किंवा यशाची मोठी पदवी गमावलेलं बालपण परत देऊ शकत नाही. शाळा वाईट नाही, प्रगत शिक्षण चुकीचं नाही… पण प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. रोपट्याला वाढण्यासाठी आधी माती, पाणी आणि सूर्यप्रकाश लागतो. रोज त्याला ओढून उंच करण्याचा प्रयत्न केला तर ते वाढत नाही… उलट कुठेतरी तुटतं. कधी कधी थांबून स्वतःला एक प्रश्न विचारायला हवा….आपण मुलांना खरंच “पुढे” नेत आहोत का? की त्याला शर्यतीत पुढे पळवताना त्याच्या बालपणीची मानसिक गरज, निरागस जगण्याचा हक्क अधिकार, त्याचा निर्मळ आनंद मागे सोडतोय?

कारण बालपण ही शर्यत नाही… ती एका सुंदर प्रवासाची सुरुवात आहे. मुलांना उंच उडायला शिकवूया… पण त्याआधी त्यांना आकाशाकडे व्यवस्थित पाहू देऊया. ते आकाश मनभर साठवू देऊया. स्पर्धात्मक यशाची शिडी देण्याआधी, आनंदाने धावण्यासाठी त्यांना मोकळं मैदान देऊया. कारण मजबूत झाडं घाईघाईने वाढवली जात नाहीत… मुळं घट्ट रुजण्यासाठी त्यांना वेळ द्यावा लागतो. आपल्या मुलांना परिपूर्ण बनवण्याच्या नादात, त्यांना जिवंत राहू देणं, जीवन जगू देणं... विसरू नका.

कारण शेवटी जगाला आणखी एक कमाऊ “परफेक्ट” व्यक्ती नको आहे…. जगाला गरज आहे अशा संवेदनशील माणसांची, ज्यांनी कधी तरी मनापासून बालपण जगलं आहे. शेवटी निर्णय आपलाच आहे — आपल्याला फक्त भौतिक गरजा भागवणारा आर्थिकदृष्ट्या यशस्वी माणूस घडवायचा आहे की, आनंदी बालपण जगलेला सजग, सुजाण, सर्जनशील आणि संवेदनशील माणूस? हा निर्णय आपणच घ्यायचा आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा