Thursday, July 2, 2026

Day Care Center Viral Video : डेकेअर सेंटरमध्ये चिमुकल्यांवरील अत्याचाराचा आरोप; व्हायरल व्हिडिओनंतर ५ जणांवर गुन्हा दाखल

Day Care Center Viral Video : डेकेअर सेंटरमध्ये चिमुकल्यांवरील अत्याचाराचा आरोप; व्हायरल व्हिडिओनंतर ५ जणांवर गुन्हा दाखल

बंगळुरूमधील धक्कादायक घटना, डेकेअर सेंटरमध्ये चिमुकल्यांना बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल 

बंगळुरू : बंगळुरूमधील (Bengaluru) एका डेकेअर सेंटरमधून (Day Care Center) समोर आलेल्या धक्कादायक प्रकारामुळे पालकांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या काही व्हिडिओंमध्ये लहान मुलांशी अमानवीय वागणूक दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी पाच महिला केअरगिव्हर्सविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

ही घटना बंगळुरूतील एचएएल परिसरातील एका आयटी कंपनीच्या कॅम्पसमधील डेकेअर सेंटरमध्ये घडल्याचा दावा केला जात आहे. तक्रारीनुसार, २ ते ३ वर्षे वयोगटातील मुलांना रडल्यास किंवा गोंधळ घातल्यास घाबरवण्यासाठी आणि गप्प बसवण्यासाठी अत्यंत धक्कादायक पद्धती वापरण्यात आल्या.

व्हायरल व्हिडिओमध्ये काही मुलांना फ्रंट-लोडिंग वॉशिंग मशीनच्या ड्रममध्ये बसवण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच काही मुलांच्या तोंडात टॉयलेट जेट स्प्रेमधून पाणी सोडल्याचा आणि त्यांना बाथरूममध्ये कोंडून धमकावल्याचाही दावा करण्यात आला आहे. या कथित प्रकारामुळे संताप व्यक्त केला जात आहे.

घटनेची माहिती चाइल्ड हेल्पलाइनला मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर अनेक पालकांनी आपल्या मुलांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे.

दरम्यान, सोशल मीडियावरही या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी अनेकांनी केली आहे. काहींनी संबंधित डेकेअर सेंटरमधील कर्मचारी नियुक्ती आणि पडताळणी प्रक्रियेवरही प्रश्न उपस्थित केले आहेत.

पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून व्हायरल व्हिडिओंची सत्यता, त्यामागील परिस्थिती आणि संबंधित कर्मचाऱ्यांची भूमिका तपासली जात आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >