मुंबई : कुर्ल्यातील चिराग नगर परिसरातील गौशिया चाळीजवळ मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या भूस्खलनाच्या दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेची विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. बचावकार्य अद्याप सुरू असून ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकले असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; भरती परीक्षापद्धतीत सुधारणांसाठी राज्यात उच्चस्तरीय समिती मुंबई : महाराष्ट्रात विविध सेवाभरतींसाठी होणार्या ...
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, मुंबई महापालिका आणि स्थानिक प्रशासनाच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. अहिर यांनी घटनास्थळी पाहणी करत बचावकार्याचा आढावा घेतला. त्यांच्या उपस्थितीत एका व्यक्तीला ढिगाऱ्याखालून सुरक्षित बाहेर काढण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच आणखी 2 जण ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले.
या दुर्घटनेनंतर प्रशासनाने मदतकार्याला वेग दिला आहे. मृतांच्या कुटुंबीयांना दिलासा देण्यासाठी त्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी 4 लाख रुपयांची मदत जमा करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती सचिन अहिर यांनी दिली. याशिवाय मुख्यमंत्री मदत निधीतूनही पीडित कुटुंबांना अतिरिक्त आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कुर्ल्यातील रहिवाशांना सुरक्षित आणि कायमस्वरूपी निवारा मिळणे आवश्यक असल्याचे अहिर यांनी स्पष्ट केले. या परिसरातील नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे. यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या भागातील पुनर्वसनाचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाला पुन्हा गती देण्याची मागणीही केली जाणार आहे. भविष्यात भूस्खलनासारख्या दुर्घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणे आणि धोकादायक ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवणे गरजेचे असल्याचे अहिर यांनी म्हटले.
दरम्यान, दुर्घटनेनंतर परिसरात मदत आणि बचावकार्य सुरू असून प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे.






