Saturday, June 27, 2026

महापालिकेच्यावतीने पाणी आणि अन्नाची शुद्धता तपासणी

महापालिकेच्यावतीने पाणी आणि अन्नाची शुद्धता तपासणी

अहवाल आता व्हॉट्सअॅप, ईमेलवर प्राप्त होणार

मुंबई : पाणी आणि अन्न हे आपल्या रोजच्या जगण्यातील अविभाज्य घटक आहेत. नागरिकांना या दोन्ही बाबी शुद्ध व गुणवत्तापूर्ण पद्धतीने मिळत असल्याचे सुनिश्चित करण्यासाठी महानगरपालिकेकडून विश्लेषक प्रयोगशाळा कार्यरत आहे. दादर येथील ‘जी उत्तर’ कार्यालयातील महानगरपालिका विश्लेषक प्रयोगशाळेत दरवर्षी सुमारे ७० हजारांहून अधिक पाणी आणि अन्नाचे नमुने तपासण्यात येतात. अत्यंत अल्प दरात तसेच अवघ्या २४ तासांत पाणी तपासणी अहवाल वापरकर्त्याच्या मोबाईल आणि ईमेलवर उपलब्ध करून देण्याची सुविधा प्रयोगशाळेच्या माध्यमातून देण्यात येते. तरीही पाणी आणि अन्नाची शुद्धता तपासण्यासाठी महानगरपालिकेच्या विश्लेषक प्रयोगशाळेचा (Laboratory) नागरिक, व्यावसायिक आस्थापनांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त प्राजक्ता लवंगारे यांनी केले आहे.महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याच्या अखत्यारितील महानगरपालिका विश्लेषक प्रयोगशाळा ही सुमारे १२३ वर्षे जुनी प्रयोगशाळा असून तेव्हापासून अविरतपणे मुंबईकरांच्या सेवेत आहे. वर्ष १९०३ रोजी सुरू झालेल्या प्रयोगशाळेत काळानुरूप अद्ययावतीकरण करण्यात आले आहे. गत दहा वर्षांच्या कालावधीत सुमारे ७ लाखांहून अधिक पाणी आणि अन्नाचे नमुने या प्रयोगशाळेत तपासण्यात आले आहेत. महानगरपालिकेची अन्न आणि पाण्याचे नमुने तपासण्यासाठी ही एकमेव प्रयोगशाळा दादर येथे कार्यरत आहे.

या प्रयोगशाळेत महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत ( municipal corporation) वितरित केल्या जाणाऱ्या पाण्याचे दैनंदिन नमुने, खाऊगल्ल्यातील फास्टफूड, बर्फाचे नमुने, बांधकामाला वापरले जाणारे पाणी, तसेच जलतरण तलावासाठी वापरले जाणारे पाणी आदींची नियमितपणे तपासणी आणि विश्लेषण केले जाते. त्यामुळे, संबंधित पाण्याची गुणवत्ता आणि शुद्धता जाणून घेऊन त्यावर वेळीच आवश्यक त्या उपाययोजना करता येणे शक्य होते. नमुने तपासण्यासाठी या प्रयोगशाळेत विश्लेषणासाठी अद्ययावत उपकरणे आणि तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येतो. वर्षभरात सुमारे ४५ हजारांहून अधिक पाण्याचे नमुने प्रयोगशाळेमार्फत तपासण्यात येतात. महत्वाचे म्हणजे, अवघ्या २४ तासांमध्ये पाण्याच्या नमुन्यांचा तपासणी अहवाल उपलब्ध होतो. आस्थापनांसाठी संकेतस्थळावर आणि नागरिकांना ईमेल व व्हॉट्सअॅपवर अहवाल उपलब्ध करून देण्यात येतो.

महापालिका विश्लेषक प्रयोगशाळेत मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि कोकण रेल्वेमार्फत अन्न व पाण्याचे नमुनेदेखील तपासणीसाठी येत असतात. त्याशिवाय, शाळेत देण्यात येणाऱ्या मध्यान्ह भोजनाचे, मुंबईतील विविध पोलीस ठाण्यामार्फत पाठवण्यात येणाऱ्या प्रतिबंधित पदार्थांचे नमुने, गुटखा, सुगंधी सुपारी व सुगंधी तंबाखू यासारखे नमुने तपासण्यात येतात. अशा प्रकारचे सुमारे ८ हजार नमुने वर्षभराच्या कालावधीत या प्रयोगशाळेत तपासले जातात.या प्रयोगशाळेतील अत्याधुनिक उपकरणे व तंत्रज्ञानाचा वापर यामुळे या प्रयोगशाळेला राज्यस्तरीय अन्न प्रयोगशाळेचा दर्जा भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण यांच्यामार्फत देण्यात आला आहे. मुंबईकरांच्या सुरक्षित आणि दर्जेदार आरोग्य सुविधांसाठी मुंबई महानगरपालिकेच्या प्रयोगशाळेच्या माध्यमातून अधिक तपशीलवार विश्लेषण आणि अधिक चाचण्यांसाठी प्रयोगशाळा अद्ययावतीकरण प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.
अतिरिक्त आयुक्त (शहर) प्राजक्ता लवंगारे यांनी या अनुषंगाने सांगितले की, मुंबईकरांच्या आरोग्याच्या दृष्टीने अन्न आणि पाणी या दोन्ही बाबी दर्जेदार स्वरूपात उपलब्ध होणे गरजेचे आहे. त्यासाठी अधिक विश्लेषणात्मक आणि सविस्तर चाचण्यांसाठी प्रयोगशाळेचे अद्ययावतीकरण होणेही आवश्यक आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाची मानके आणि चाचण्यांची क्षमता असणारी प्रयोगशाळा मुंबईकरांच्या सेवेत अविरतपणे उपलब्ध राहावी, ही यामागील भूमिका आहे. प्रयोगशाळेत अन्न व पाण्याच्या तपासणीची सुविधा अत्यल्प दरात उपलब्ध आहे. नागरिक, गृहसंस्था, खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या आस्थापना तसेच अन्य व्यावसायिक आस्थापनांनी या सुविधेचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा. जेणेकरुन, आपल्याकडील अन्न व पाण्याची गुणवत्ता सुनिश्चित होईल, असे आवाहन देखील प्राजक्ता लवंगारे यांनी केले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >