Monday, June 15, 2026

Nashik : ‘रिक्षाचालकांची अरेरावी’च्या चर्चेत प्रामाणिकपणाचे उदाहरण; ६३४ ग्रॅम सोनं कुटुंबाला परत

Nashik : ‘रिक्षाचालकांची अरेरावी’च्या चर्चेत प्रामाणिकपणाचे उदाहरण; ६३४ ग्रॅम सोनं कुटुंबाला परत

Nashik News : गेल्या काही महिन्यांत नाशिकमध्ये अनेक रिक्षाचालक अरेरावी करत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. पण याच रिक्षाचालकांच्या अरेरावीची तक्रारींमध्ये एक प्रामाणिक रिक्षाचालकांची चर्चा सध्या शहरात रंगली आहे. रिक्षाचालकाने कौतुक शहरात कौतुक होत आहे. आणि ते होणेही महत्त्वाचे कारण रिक्षाचालकाचे कामही तसेच आहे. कारण रिक्षाचालकाने दाखवलेल्या प्रामाणिकपणामुळे आणि पोलिसांच्या तत्परतेमुळे रायपूरहून आलेल्या एका कुटुंबाला आयुष्यभर लक्षात राहील असा सुखद अनुभव मिळाला आहे.

नेमकं काय घडलं ?

छत्तीसगडमधील रायपूर येथील एक कुटुंब नाशिकमध्ये देवदर्शनसाठी आले होते. कुटुंबातील सोने-चांदीचे व्यापारी असलेले प्रवीण संपतलाल सोनी (वय ४३) हे आपल्या वयोवृद्ध आई, पत्नी आणि मुलीसह अधिक मासानिमित्त शहरात देवदर्शनासाठी आले होते. गोदास्नानाचे पुण्य लाभावे या भावनेने कुटुंबीय रामकुंड परिसरात पोहोचले. परिसराची माहिती नसल्याने आणि शहरात मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामे सुरू असल्याने त्यांनी आपली चारचाकी एका ठिकाणी उभी करून रिक्षाने रामकुंड पर्यंतचा प्रवास केला.

देविदास देशमुख यांची कौतुकास्पद भूमिका

गोदास्नान करून धार्मिक विधी पूर्ण झाल्यानंतर अचानक सोनी कुटुंबाच्या पायाखालची जमीन सरकली. कारण सोबत आणलेली महत्त्वाची पिशवी रिक्षातच राहिल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्या पिशवीत केवळ कपडे नव्हते, तर ४३ हजार रुपयांची रोख रक्कम आणि ६३४ ग्रॅम सोन्याच्या दोन लगड्या होत्या. एकीकडे सोनी कुटुंब चिंतेत असताना, दुसरीकडे त्या रिक्षाचे चालक देविदास शिवदास देशमुख (वय ६०) यांनी प्रामाणिकपणाचा आदर्श घालून दिला. रिक्षात विसरलेली पिशवी स्वतःजवळ ठेवण्याऐवजी त्यांनी थेट सरकारवाडा पोलीस ठाणे गाठत ती पोलिसांच्या स्वाधीन केली.

पोलिसांनी पिशवीची तपासणी केली. त्यावेळी पिशवीत पोलिसांना मोठ्या प्रमाणात सोनं, रोख रक्कम आणि संबंधित पावत्या आढळून आल्या. पावतीवरील क्रमांकावर पोलिसांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न झाला, मात्र तो प्रयत्न अयशस्वी ठरला. त्यानंतर पोलिसांनी तातडीने हालचाली करत आयुक्तालयातील विविध व्हॉट्सॲप गटांवर “बेवारस पिशवीबाबत कोणी तक्रार घेऊन आल्यास सरकारवाडा पोलीस ठाण्यात (Sarkarwada Police Station) पाठवावे,” असा मेसेज पाठवला.

कुटुंबीयांच्या डोळ्यांत तरळले आनंदाश्रू

दरम्यान, पिशवी हरवल्याने घाबरलेले व्यापारी प्रवीण सोनी हे तक्रार नोंदवण्यासाठी पंचवटी पोलीस ठाण्यात (Panchavati Police Station) पोहोचले. तेथून त्यांना सरकारवाडा पोलीस ठाण्यात पाठवण्यात आले. पोलिसांनी आवश्यक पडताळणी करून खात्री पटवल्यानंतर सोनं, रोख रक्कम आणि इतर सामानासह संपूर्ण पिशवी त्यांच्या स्वाधीन केली. एवढ्या मोठ्या किमतीचे सोने आणि रोकड अवघ्या काही तासांत सुरक्षितपणे परत मिळाल्याने सोनी कुटुंब अक्षरशः भारावून गेले. कुटुंबीयांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.

नाशिकमधून परतताना ‘वाईट अनुभव’ घेऊन जाण्याऐवजी त्यांनी रिक्षाचालक देविदास देशमुख आणि नाशिक पोलिसांचे मनापासून आभार मानत प्रामाणिकपणाचे कौतुक केले. या संपूर्ण कारवाईत पोलीस हवालदार चंदर दळवी, पोलीस अंमलदार संदीप उघडे आणि महिला पोलीस अंमलदार आव्हाड यांनी महत्त्वाची भूमिका बजावत तत्परता दाखवली. एका प्रामाणिक रिक्षाचालकामुळे आणि सजग पोलिसांमुळे नाशिक पोलिसांच्या कामाची एक सकारात्मक बाजू पुन्हा एकदा समोर आली आहे. 

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >