Wednesday, June 10, 2026

अवकाळी पावसाने बाधित फळपिकांचे पंचनामे पूर्ण करा, कृषिमंत्र्यांचे निर्देश

अवकाळी पावसाने बाधित फळपिकांचे पंचनामे पूर्ण करा, कृषिमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : 'राज्यात मे आणि जून २०२६ या कालावधीत अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे बाधित झालेल्या फळपिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने आणि काटेकोरपणे पूर्ण करण्यात यावेत. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घेऊन नुकसानभरपाईची प्रक्रिया अधिक गतिमान करावी', असे निर्देश कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बुधावरी दिले आहेत. मंत्रालयातील दालनात आयोजित फळपीक नुकसान आढावा बैठकीत ते बोलत होते.

बैठकीला पाणीपुरवठा मंत्री तथा जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, फलोत्पादन मंत्री भरत गोगावले (व्ही.सी.द्वारे), आमदार चंद्रकात पाटील, आमदार अमोल जावळे, कृषी विभागाचे सचिव परिमल सिंह, कृषी आयुक्त सूरज मांढरे (व्ही.सी.द्वारे) आणि भारतीय कृषी विमा कंपनीचे मुख्य प्रबंधक अजित कुमार यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मे आणि जून २०२६ मधील नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यातील २७ जिल्ह्यांमध्ये एकूण ६१ हजार ४ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. यामध्ये सर्वाधिक फटका केळी पिकाला बसला असून, तब्बल १८ हजार १२१ हेक्टर क्षेत्र केळीच्या पिकाखालील आहे. क्षेत्रीय स्तरावर सर्वेक्षण आणि पंचनाम्यांची प्रक्रिया सुरू असून, ६ जून रोजी झालेल्या तीव्र पावसामुळे झालेल्या नुकसानीचे अचूक मूल्यमापन करण्याचे निर्देश देण्यात आले. जिल्हानिहाय आढावा घेतला असता जळगाव, बुलडाणा, सोलापूर, पुणे, अकोला आणि अमरावती या जिल्ह्यांमध्ये फळपिकांची मोठी हानी झाली. विशेषतः जळगाव जिल्ह्यात ७ हजार ५९४ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून, त्यापैकी ७ हजार २१६ हेक्टर क्षेत्र हे एकट्या केळीचे आहे. या पार्श्वभूमीवर, भारतीय कृषी विमा कंपनीकडून सर्वेक्षण सुरू असून पुढील १० दिवसांत सर्व पंचनामे पूर्ण करण्याचे आदेश कृषिमंत्र्यांनी दिले आहे. तसेच, ४ जून आणि त्यानंतर झालेल्या नुकसानीचे पंचनामे विमा कंपनीने काटेकोरपणे करावेत. यात विमाधारक आणि विमा नसलेल्या (विमाविहीन) अशा दोन्ही प्रकारच्या शेतकऱ्यांच्या नुकसानीची अचूक नोंद घेतली जाईल. आवश्यकतेनुसार सर्वेक्षणासाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात यावा, असेही त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment