Agriculture Minister Dattatray Bharne : शेतकरी कर्जमाफी योजनेची १० दिवसांत अंमलबजावणी - कृषिमंत्री दत्तात्रय भरणे
June 8, 2026 03:33 PM
Dattatray Bharne
- ५६ लाख शेतकऱ्यांना लाभ, राज्याच्या तिजोरीवर ३६ हजार कोटी रुपयांचा भार पडणार
मुंबई : सततचा अवकाळी पाऊस, दुष्काळ, महापूर आणि बाजारभावातील चढउतारामुळे कर्जबाजारी झालेल्या राज्यातील सुमारे ५६ लाख शेतकऱ्यांना दिलासा देणारी घोषणा राज्य सरकारने अलीकडेच केली आहे. त्यानुसार, 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजने'ची प्रत्यक्ष अंमलबजावणी पुढील १० दिवसांत सुरू केली जाईल, अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे (Agriculture Minister Dattatray Bharne) यांनी सोमवारी दिली आहे.
कर्जमाफीच्या प्रक्रियेविषयी बोलताना कृषिमंत्री भरणे यांनी स्पष्ट केले की, ही योजना सर्वसमावेशक करण्यात आली आहे. केवळ थकबाकीदारांचेच कर्ज माफ होणार नाही, तर प्रामाणिकपणे आणि नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये म्हणून त्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार आहे. यापूर्वीच्या कर्जमाफी योजनांमधील त्रुटी दूर करण्यासाठी आणि अधिकाधिक गरजू शेतकऱ्यांना या कक्षेत आणण्यासाठी उच्चस्तरीय समितीच्या शिफारशींनुसार निकषांमध्ये काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत, जेणेकरून राज्यातील एकही पात्र शेतकरी या लाभापासून वंचित राहणार नाही, असेही त्यांनी सांगितले. (Agriculture Minister Dattatray Bharne)