Tuesday, June 2, 2026

Dhule Crime : 13.75 कोटींच्या गैरव्यवहारप्रकरणी 'या' बँकेच्या तत्कालीन व्यवस्थापकास अटक

Dhule Crime : 13.75 कोटींच्या गैरव्यवहारप्रकरणी 'या' बँकेच्या तत्कालीन व्यवस्थापकास अटक

Dhule Crime : धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे असलेल्या दि शिरपूर मर्चंट को-ऑप बँकेत तब्बल १३ कोटी ७५ लाख ७६ हजार २५३ रुपयांचा अपहार झाल्याचे समोर आले. या प्रकरणी धुळे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुन्ह्यातील मुख्य संशयित म्हणून बँकेचे तत्कालीन व्यवस्थापक संजय कुलकर्णी (Sanjay Kulkarni ) याला अखेर अटक केली आहे.  गुन्हा दाखल झाल्यानंतर तो फरार झाला होता.

नेमकं प्रकरण काय ?

२५ मे २०२५ रोजी दि. शिरपूर मर्चंट को-ऑप बँक लि. शिरपूरचे लेखापरीक्षक यांनी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आणि तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, बँकेचे एकूण ४६ अधिकारी, कर्मचारी, चेअरमन आणि कर्जदार यांनी संगनमत करून तब्बल १३ कोटी ७५ लाख ७६ हजार २५३ रुपयांचा अपहार केल्याचा आरोप आहे. (Dhule Crime News )

अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

या गैरव्यवहारामुळे बँकेचे सभासद आणि ठेवीदार यांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. गुन्हा दाखल होताच संबंधित संशयित फरार झाले होते. दरम्यान, या प्रकरणातील संशयितांनी अटक टाळण्यासाठी धुळे जिल्हा व सत्र न्यायालय तसेच उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केले होते. मात्र दोन्ही न्यायालयांनी त्यांचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावले आहेत.

शिरपूर येथून कुलकर्णी ताब्यात

आर्थिक गुन्हे शाखेचे पथक संशयितांचा शोध घेत असताना सोमवारी या गुन्ह्यातील मुख्य संशयित संजय केशवराव कुलकर्णी याला शिरपूर येथून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. कुलकर्णी हा दि. शिरपूर मर्चंट को-ऑप बँक लि. शिरपूर येथे व्यवस्थापक म्हणून कार्यरत होता.

इतर संशयितांचा शोध सुरू

दरम्यान, या बहुचर्चित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातील इतर संशयितांचा शोध सुरू असून, अपहार झालेल्या रकमेचा मागोवा घेण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडून सखोल तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या कारवाईमुळे बँकेचे सभासद, ठेवीदार आणि नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून, प्रकरणातील इतर संशयितांवरही लवकरच कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >