Saturday, August 22, 2026

Jamkhed : नान्नज प्राथमिक आरोग्य केंद्र बॉम्बने उडविण्याची धमकी; डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांना शिवीगाळ

Jamkhed : नान्नज प्राथमिक आरोग्य केंद्र बॉम्बने उडविण्याची धमकी; डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांना शिवीगाळ

जामखेड : नान्नज येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांशी वाद घालत एका व्यक्तीने शिवीगाळ करून दवाखाना बॉम्बने उडवून देण्याची तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना शुक्रवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. या प्रकारामुळे आरोग्य केंद्रातील कर्मचारी आणि रुग्णांमध्ये काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. याप्रकरणी वैद्यकीय अधिकारी यांच्या फिर्यादीवरून कृष्णा प्रकाशसिंग राजपुत (रा. नान्नज, ता. जामखेड) याच्याविरुद्ध जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Jamkhed)

पोलिसांत दाखल केलेल्या तपशीलानुसार, घटनेच्या वेळी नान्नज प्राथमिक आरोग्य केंद्रातील ओपीडीमध्ये रुग्णांवर उपचार सुरू होते. परिचारिका रुग्णांना सलाईन लावत असताना कृष्णा राजपुत आरोग्य केंद्रात आला. ‘खोटा रिपोर्ट का देता?’ असे म्हणत त्याने आरोग्य कर्मचाऱ्यांशी वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने मोठमोठ्याने शिवीगाळ केल्याने ओपीडीमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

परिस्थिती लक्षात घेऊन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला इतर रुग्णांना त्रास होत असल्याने बाहेर थांबण्यास सांगितले. मात्र, याचा राग आल्याने राजपुत याने वैद्यकीय अधिकारी आणि परिचारिकेला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. तसेच ‘बॉम्ब टाकून दवाखाना उडवून टाकीन,’ अशी धमकी देत आरडाओरड केली. त्यानंतर तो आरोग्य कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून येत दमदाटी केल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. (Jamkhed)

हा प्रकार रुग्णांसमोर घडल्याने काही काळ आरोग्य केंद्रात तणावाचे वातावरण होते. शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा आरोपही फिर्यादीत करण्यात आला आहे. या प्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५७८/२०२६ नोंदविण्यात आला असून भारतीय न्याय संहितेच्या कलम १३२, २९६, ३५२ आणि ३५१(२) अन्वये कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल तुकाराम सोनवणे करीत आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा