Tuesday, June 2, 2026

Pune Liquor Poisoning Case : विषारी दारुकांडातील आरोपी फुगेवाडीत पोहोचताच संतापाचा स्फोट; नागरिक चप्पल, दगड घेऊन धावले, पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला

Pune Liquor Poisoning Case : विषारी दारुकांडातील आरोपी फुगेवाडीत पोहोचताच संतापाचा स्फोट; नागरिक चप्पल, दगड घेऊन धावले, पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला

पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसराला हादरवून सोडणाऱ्या विषारी दारुकांड प्रकरणातील आरोपींना तपासासाठी फुगेवाडी येथे आणण्यात आल्यानंतर परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. आरोपींना पाहताच संतप्त नागरिक आणि मृतांच्या नातेवाईकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. काहींनी चप्पल दाखवत निषेध केला, तर काही युवक दगड आणि सिमेंट ब्लॉक घेऊन आरोपींकडे धावल्याचे पाहायला मिळाले. मात्र, सीआयडी आणि पोलिसांच्या वेळीच केलेल्या हस्तक्षेपामुळे कोणतीही अनुचित घटना घडली नाही. (Pune Liquor Poisoning Case)

आरोपींना पाहताच नागरिकांचा संताप अनावर :

विषारी दारूमुळे आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू झाल्याने फुगेवाडी आणि दापोडी परिसरात शोककळा पसरली आहे. या घटनेमुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली असून नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे. सीआयडीचे पथक पंचनामा आणि तपासासाठी आरोपींना घटनास्थळी घेऊन आले असता संतप्त जमावाने आरोपींविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. (Pune Liquor Poisoning Case)

यावेळी एका वृद्ध महिलेनं हातात चप्पल घेऊन आरोपींसमोर उभे राहत संताप व्यक्त केला. काही युवकांनी आरोपींचा पाठलाग करण्याचाही प्रयत्न केला. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची चिन्हे दिसताच पोलिसांनी सुरक्षा कवच उभे करून आरोपींना सुरक्षितपणे बाहेर काढले. (Pune Liquor Poisoning Case)

मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला थरार :

घटनास्थळी निर्माण झालेला हा तणावपूर्ण प्रसंग अनेकांनी मोबाईलमध्ये चित्रित केला. सोशल मीडियावरही या व्हिडिओंची चर्चा सुरू असून नागरिकांचा रोष किती तीव्र आहे, याची झलक या दृश्यांतून दिसून येत आहे. (Pune Liquor Poisoning Case)

मिथेनॉल मिसळून तयार केली जात होती घातक दारू :

तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, फुगेवाडी परिसरातील एका घरातच गावठी दारूमध्ये मोठ्या प्रमाणावर मिथेनॉल मिसळून विषारी दारू तयार केली जात होती. या प्रकरणात कर्नेलसिंग विरका, त्यांची पत्नी इंदरजित विरका आणि मुलगा गुरुचरण उर्फ विक्की विरका यांच्यासह अनेक जणांवर गंभीर आरोप आहेत. काही हजार रुपयांच्या नफ्यासाठी आरोपींनी अनेकांच्या जीवाशी खेळ केल्याचा आरोप तपास यंत्रणांकडून करण्यात येत आहे. (Pune Liquor Poisoning Case)

या प्रकरणात आतापर्यंत खालील आरोपींची नावे समोर आली आहेत :

- योगेश वाशखेडे - राधेश्याम प्रजापती - कर्नलसिंह विरका - गुरमितसिंह विरका - कल्पेश अग्रवाल - अरिहंत धोत्रे - आकाश जाधव - अशोक हांडे

नेमकं प्रकरण काय?

पिंपरी-चिंचवडमधील दापोडी आणि फुगेवाडी परिसरात काही दिवसांत अनेक संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. प्राथमिक तपासात हे मृत्यू विषारी गावठी दारू सेवनामुळे झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. त्यानंतर पोलिस आणि सीआयडीने मोठ्या प्रमाणावर तपास सुरू केला. या प्रकरणामुळे अवैध दारू विक्री आणि हातभट्टी व्यवसायावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. (Pune Liquor Poisoning Case)

राजकीय वर्तुळातही खळबळ :

या घटनेनंतर राजकीय वातावरणही तापले आहे. स्थानिक नागरिकांसह विविध पक्षांच्या नेत्यांनी अवैध दारू विक्रीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत प्रशासनावर टीका केली आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्यासोबतच अशा अवैध धंद्यांना संरक्षण देणाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे. दरम्यान, विषारी दारुकांडाचा तपास वेगाने सुरू असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या प्रकरणातील आणखी धक्कादायक खुलासे पुढील तपासात समोर येण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >