Monday, June 1, 2026

Mitchell Santner : मिचेल सँटनरचा न्यूझीलंड संघात कमबॅक

Mitchell Santner : मिचेल सँटनरचा न्यूझीलंड संघात कमबॅक

खांद्याच्या दुखापतीवर मात; लॉर्ड्स कसोटीसाठी सज्ज

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :

इंग्लंडविरुद्ध ४ जूनपासून लॉर्ड्स येथे सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी न्यूझीलंडला मोठा दिलासा मिळाला आहे. अनुभवी फिरकी अष्टपैलू मिचेल सँटनर याचे संघात पुनरागमन झाले आहे. आयपीएलदरम्यान मुंबई इंडियन्सकडून खेळताना खांद्याला गंभीर दुखापत झाल्याने तो काही काळ मैदानाबाहेर होता.

३४ वर्षीय सँटनरला सुरुवातीला लॉर्ड्स कसोटी तसेच आयर्लंडविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यातून बाहेर ठेवण्यात आले होते. वैद्यकीय तपासणीत त्याच्या खांद्याला तिसऱ्या दर्जाची दुखापत झाल्याचे स्पष्ट झाले होते आणि त्यासाठी सुमारे महिनाभर पुनर्वसनाची गरज होती. मात्र उपचार आणि पुनर्वसन यशस्वी ठरल्याने सँटनर पूर्णपणे तंदुरुस्त झाला असून शनिवारी तो इंग्लंडमध्ये दाखल झाला.

सँटनरच्या अनुपस्थितीत मुंबई इंडियन्सने दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू केशव महाराज याला संघात घेतले होते. दरम्यान, न्यूझीलंडने आयर्लंडविरुद्धचा कसोटी सामना तीन दिवसांच्या आत डावाने जिंकला. या विजयात नॅथन स्मिथ आणि ब्लेअर टिकनर यांच्या प्रभावी गोलंदाजीचा मोलाचा वाटा होता.

दुसरीकडे, वेगवान गोलंदाज मॅट हेन्री हॅमस्ट्रिंगच्या किरकोळ दुखापतीमुळे आयर्लंडविरुद्ध खेळू शकला नाही. तो आता काइल जेमिसन आणि विल ओ'रुर्केसह लंडनमध्ये दाखल झाला असून इंग्लंड मालिकेच्या तयारीत सहभागी झाला आहे.

ब्रेंडन मॅक्युलम यांच्या मार्गदर्शनाखाली इंग्लंड संघही नव्या उत्साहाने मैदानात उतरणार आहे. चार वर्षांपूर्वी न्यूझीलंडकडून झालेल्या ३-० पराभवाची आठवण ताजी असताना दोन्ही संघांमधील ही मालिका चुरशीची होण्याची अपेक्षा आहे.

Comments
Add Comment