Tuesday, August 25, 2026

IND vs SL Colombo Test : कोलंबो कसोटीत ICC चा बडगा सुरूच; खात्यात जमा झाला डिमेरिट पॉईंट

IND vs SL Colombo Test : कोलंबो कसोटीत ICC चा बडगा सुरूच; खात्यात जमा झाला डिमेरिट पॉईंट

Colombo : भारत आणि श्रीलंका यांच्यात कोलंबो येथे सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) शिस्तीचा बडगा कायम ठेवत आणखी एका खेळाडूस शिक्षा सुनावली आहे. याआधी भारताचा सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज असिथा फर्नांडो यांच्यावर दंडात्मक कारवाई झाल्यानंतर, आता श्रीलंकेचा प्रमुख फिरकी गोलंदाज प्रभात जयसूर्या याच्यावरही कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. आयसीसीच्या आचारसंहितेतील कलम २.२ चा भंग केल्याप्रकरणी प्रभात जयसूर्याला अधिकृत ताकीद देण्यात आली असून, त्याच्या शिस्तभंगाच्या खात्यात एक ‘डिमेरिट पॉईंट’ जमा करण्यात आला आहे. गेल्या २४ महिन्यांतील त्याचा हा पहिलाच गुन्हा ठरला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी बाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतताना जयसूर्याने आपला राग व्यक्त करत बॅटने मैदानातील सीमेवरील जाहिरातींच्या फलकांवर (बाउंड्री वेजेस) प्रहार केला होता. या वर्तणुकीमुळे त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, प्रभात जयसूर्याने आपली चूक मान्य केली असून, आयसीसी एलिट पॅनेलचे मॅच रेफ्री अँडी पायक्रॉफ्ट यांनी सुचवलेली शिक्षा विनाअट स्वीकारली आहे. त्यामुळे या प्रकरणी औपचारिक सुनावणीची कोणतीही गरज भासली नाही. मैदानावर पंच म्हणून जबाबदारी पार पाडणाऱ्या अहसान रझा, शरफुद्दुला इब्ने शाहिद, तिसरे पंच रॉड टकर आणि चौथे पंच प्रगीथ रामबुकवेल्ला यांनी जयसूर्याविरोधात तक्रार नोंदवली होती. या सामन्यात आयसीसीच्या शिक्षेला सामोरे जाणारा जयसूर्या हा तिसरा खेळाडू ठरला आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवशी झालेल्या वादानंतर जैस्वाल आणि फर्नांडो यांना प्रत्येकी मॅच फीच्या २५ टक्के दंड आणि एक डिमेरिट पॉईंट ठोठावण्यात आला होता. दरम्यान, या सामन्याच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू असून, भारताने आपला पहिला डाव ५०३ धावांवर घोषित केला आहे. प्रत्युत्तरात श्रीलंकेने पहिल्या डावात ७ गडी बाद २३० धावा केल्या आहेत. दोन सामन्यांच्या या मालिकेत भारतीय संघ आधीच १-० अशा आघाडीवर असून, या मालिकेतील हा सामना आता चांगलाच रंगत चालला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >