Monday, June 1, 2026

Accident News : लग्नाला निघालेल्या कुटुंबाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू

Accident News :  लग्नाला निघालेल्या कुटुंबाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू

Accident News : उत्तर प्रदेशातील आग्रा-लखनौ महामार्गावर फतेहाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत भीषण अपघाताची घटना घडली आहे. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. लग्नाला निघालेल्या कुटुंबाच्या कारची कंटेनरला धडक बसून हा अपघात झाला. लग्नाला निघालेल्या कुटुंबावर अशा प्रकारे काळाने घाला घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

नेमकं काय घडलं ?

बिहारमधून (Bihar) एक कुटुंब राजस्थानच्या (Rajasthan० चुरू जिल्ह्यात एका लग्न सोहळ्यासाठी जात होते. प्रवासादरम्यान आग्रा-लखनौ द्रुतगती मार्गावर त्यांच्या कारचा अपघात झाला. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, चालकाला डुलकी लागल्याने कारवरील त्याचे नियंत्रण सुटले आणि भरधाव वेगात असलेली कार समोरून जाणाऱ्या कंटेनरला मागून जाऊन धडकली. (Accident News)

वाहनाचा अर्धा भाग कंटेनरमध्ये घुसला

ही धडक इतकी जोरदार होती की कारचा पुढील भाग अक्षरशः चेंदामेंदा झाला आहे. वाहनाचा अर्धा भाग थेट कंटेनरमध्ये घुसला होता. अपघातानंतर कारमध्ये अडकलेल्या प्रवाशांनी आरडाओरड केली यावेळेस आजूबाजूच्या नागरिकांनी तात्काळ अपघातस्थळी धाव घेतली. बचावकार्य केले. या अपघातात कारमधील शंकर कुमार आणि त्यांचा भाऊ सुनील कुमार यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर एका महिलेचा रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला. तर अपघातात चालक मोहम्मद शोएब उर्फ सोहैब, परमिता कुमारी, पूजा कुमारी, राजीव कुमार उर्फ राजू आणि अयांश हे गंभीर जखमी झाले आहेत.

घटनेची माहिती मिळताच पोलीस, यूपीडीए आणि रुग्णवाहिका पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. बचाव पथकाने अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले. जखमींना फतेहाबाद येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना आग्रा येथील एसएन मेडिकल कॉलेजमध्ये पुढील उपचारासाठी हलवण्यात आले. दरम्यान, पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले असून अपघाताचा अधिक तपास सुरु आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा