Wednesday, May 27, 2026

विधानपरिषदेचे जागावाटप मुंबईतच अंतिम होणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विधानपरिषदेचे जागावाटप मुंबईतच अंतिम होणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; नाशिक, छत्रपती संभाजी नगर, पुण्याचा तिढा कायम मुंबई : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील विधानपरिषद निवडणुकांच्या १७ जागांसाठी महायुतीमधील जागावाटपाचा तिढा जवळपास सुटला असून केवळ २ ते ३ जागांवर अंतिम निर्णय होणे बाकी आहे. हा जागावाटपाचा तिढा दिल्लीत नव्हे, तर मुंबईतच मित्रपक्षांचे प्रमुख नेते एकत्र बसून सोडवतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी स्पष्ट केले आहे. महायुतीमध्ये सध्या नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या जागांवरून शिवसेनेसोबत (शिंदे गट), तर पुण्याच्या जागेवरून राष्ट्रवादी काँग्रेससोबत (अजित पवार गट) भाजपची चर्चा सुरू असून, हा तिढा लवकरच सुटेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

नवी दिल्लीत केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांच्यासमवेत साखर उद्योगासंदर्भातील एका महत्त्वाच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुतीचे इतर प्रमुख नेते उपस्थित होते. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी विधानपरिषद निवडणुकीच्या जागावाटपावर भाष्य केले. "विधानपरिषद निवडणुकीबाबत आमचे जवळपास एकमत (अॅग्रीमेंट) झालेले आहे. फक्त नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या जागा आम्हाला मिळाव्यात, असा आमचा शिवसेनेकडे आग्रह आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने आमच्याकडे पुण्याच्या जागेची मागणी केली आहे. सध्या याच जागांवरून चर्चा अडकली असली, तरी आम्ही ती सकारात्मकतेने सोडवून घेऊ," असे फडणवीस म्हणाले. महायुतीसमोरील जागावाटपाचा 'कठीण पेपर' संपला असून आता केवळ 'सोपा पेपर' सोडवून त्यावर 'टीकमार्क' करणे बाकी आहे, असेही त्यांनी सांगितले

उमेदवारी अर्ज भरतानाच चित्र स्पष्ट होणार

महायुतीच्या संभाव्य जागावाटपानुसार, १७ पैकी सर्वाधिक १२ जागांवर भाजप निवडणूक लढवण्याची चिन्हे असून, शिवसेनेला ३ आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला २ जागा मिळण्याची चर्चा आहे. या संदर्भात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, विधानपरिषदेच्या बाबतीत इतक्या आधी गोष्टी निश्चित होत नसतात, त्या वेळेवरच होतात. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम टप्प्यातच जागावाटप आणि उमेदवारांच्या नावांची अधिकृत घोषणा मुंबईतूनच केली जाईल.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा