Wednesday, May 27, 2026

Nashik : रिंग रोड बाधित शेतकऱ्यांचे भुजबळ फार्मवर ‘दाद मागो आंदोलन’

Nashik : रिंग रोड बाधित शेतकऱ्यांचे भुजबळ फार्मवर ‘दाद मागो आंदोलन’

नाशिक : रिंग रोड बाधित शेतकऱ्यांनी बुधवारी ( दि.२७) आपल्या न्याय हक्काच्या मागण्यांसाठी मंत्री छगन भुजबळ (Minister Chhagan Bhujbal) यांच्या “भुजबळ फार्म” (Bhujbal Farm) या निवासस्थानी मोठ्या संख्येने उपस्थित राहत “दाद मागो आंदोलन” केले. शेतकरी आपल्या सहकुटुंबीयांसह आंदोलनात सहभागी झाले होते.

दरम्यान, कांदा प्रश्नासंदर्भातील महत्त्वपूर्ण बैठकीसाठी मंत्री भुजबळ यांना तातडीने दिल्ली येथे जावे लागल्याने ते प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र, त्यांच्या स्वीय सहाय्यकांसोबत शेतकरी शिष्टमंडळाची सविस्तर चर्चा पार पडली.नाशिक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद (District Collector Ayush Prasad) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत तयार होणाऱ्या पर्यायांवर अंतिम निर्णय मंत्रीस्तरावर घेतला जाणार असल्याने नामदार गिरीश महाजन, नामदार छगन भुजबळ, नामदार दादा भुसे आणि नामदार नरहरी झिरवाळ या नाशिक जिल्ह्यातील चारही वरिष्ठ मंत्र्यांनी एकत्रितपणे शेतकरी हिताचा निर्णय घ्यावा, यासाठी आम्ही सर्व मंत्र्यांची भेट घेणार असल्याचे शिष्टमंडळाने स्पष्ट केले. त्याच अनुषंगाने आजची भेट आयोजित करण्यात आली होती.

रिंग रोडच्या भूसंपादनामध्ये कोणताही शेतकरी भूमिहीन होऊ नये, कोणाची घरे, विहिरी, गोठे व शेती उद्ध्वस्त होणार नाही याची काळजी घेत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच डीपी व आरपी रोडच्या धर्तीवर रस्त्याची अलाइनमेंट निश्चित करत शेतकऱ्यांचे कमीत कमी नुकसान होईल, अशा पद्धतीने नियोजन करावे. तोपर्यंत कोणतीही जमीन अधिग्रहित करू नये, नोटिसा पाठवू नयेत व जमीन खरेदी करू नये, अशी ठाम भूमिका शेतकरी प्रतिनिधींनी मांडली.

शिष्टमंडळाने नाशिक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद (District Collector Ayush Prasad) यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या सकारात्मक बैठकीतील सर्व आश्वासनांची पूर्तता शासनाच्या संबंधित विभागांनी करावी, अशी ठाम मागणी केली. शासनाने आमच्याशी दगाफटका केला तर शेतकरी यापेक्षा अधिक तीव्र आंदोलन उभे करतील, असा इशाराही देण्यात आला. त्यामुळे शासनाने संयमाची भूमिका लक्षात घेत न्याय्य निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली.

आंदोलनात छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर, शिवा तेलंग, नवनाथ शिंदे, आशिष हिरे, सुभाष गायकर, प्रवीण पाटील, योगेश गांगुर्डे, भारत पिंगळे, दादासाहेब जोगदंड, ज्ञानेश्वर पालखेडे यांच्यासह २५ गावांतील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा