Thursday, May 21, 2026

Cyber Crime : मुंबईत सायबर गुन्ह्यातील १०० कोटी वाचविण्यात यश

Cyber Crime : मुंबईत सायबर गुन्ह्यातील १०० कोटी वाचविण्यात यश

मुंबई : गेल्या काही वर्षांत सायबर फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून सायबर पोलिसांनी सुरू केलेल्या मदत क्रमांकामुळे यावर्षी नागरिकांची शंभर कोटी रुपयांहून अधिक रक्कम भामट्यांच्या खात्यात वर्ग होण्यापासून रोखण्यात यश आले आहे. तर गेल्या चार वर्षांत फसवणुकीचे ४९१ कोटी रुपये गोठवून पोलिसांनी नागरिकांना दिलासा दिला.

गेल्या काही वर्षांमध्ये सायबर गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सायबर गुन्हेगार विविध मार्गाने सर्वसामान्य नागरिकांच्या बँक खात्यावर डल्ला मारून लाखो रुपये ऑनलाईन पद्धतीने काढून घेत आहेत. याच फसवणुकीला आळा घालण्यासाठी २०२२ पासून मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेने मदत क्रमांक १९३० सुरू केला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच नागरिक या मदत क्रमांकावर संपर्क साधत असून मदत क्रमांकावर नागरिकांची तक्रार येताच पोलीस तत्काळ कारवाईला सुरुवात करीत आहेत. परिणामी, यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे.

सायबर पोलिसांच्या या मदत क्रमांकावर जानेवारी २०२६ ते १९ मे २०२६ या कालावधीत फसवणूक झालेल्या २ लाख ५५ हजार ९२ नागरिकांनी तक्रारी केल्या. यापैकी ३० हजार ३०२ जणांच्या बँक खात्यामधील रक्कम इतर खात्यात जाण्यापूर्वीच पोलिसांनी रोखली.

ही रक्कम १०१ कोटी ३९ लाख ६ हजार ५५६ रुपये इतकी आहे. तर मे २०२२ ते मे २०२६ या चार वर्षांमध्ये आरोपींच्या बँक खात्यातील एकूण ४९१ कोटी ५७ लाख ८० हजार ७७९ रुपये इतकी रक्कम गोठवण्यात सायबर पोलिसांना यश आले.

पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त इरफान शेख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुवर्णा शिंदे, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय अलगुर, पोलीस उपनिरीक्षक पूनम जाधव आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. नागरिकांनी फसवणूक झाल्यानंतर घाबरून न जाता तत्काळ मदत क्रमांक १९३० वर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Comments
Add Comment