Thursday, May 21, 2026

PM Narendra Modi : परदेश दौऱ्यावरून परतताच मोदींची तातडीची बैठक; पेट्रोल-एलपीजीवर मोठा निर्णय?

PM Narendra Modi : परदेश दौऱ्यावरून परतताच मोदींची तातडीची बैठक; पेट्रोल-एलपीजीवर मोठा निर्णय?

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, गुरुवारी मंत्रिमंडळाची बैठक घेणार आहेत. जवळपास वर्षभरानंतर होत असलेल्या या बैठकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे, पंतप्रधान मोदी आपल्या पाच देशांच्या परदेश दौऱ्यावरून मायदेशी परतल्यानंतर लगेचच ही बैठक बोलावण्यात आली आहे. त्यामुळे या बैठकीत काही मोठे निर्णय घेतले जाणार का, याबाबत राजकीय वर्तुळासह सर्वसामान्य नागरिकांमध्येही मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत असल्याने पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीच्या दरांबाबत सरकार काही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकते, अशी जोरदार चर्चा सुरू आहे. इंधनाच्या किमतींमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने सामान्य नागरिकांवर त्याचा थेट परिणाम होत आहे. त्यामुळे सरकारकडून दिलासा देणाऱ्या उपाययोजना जाहीर होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आज होणाऱ्या या बैठकीला सर्व कॅबिनेट मंत्री, स्वतंत्र कार्यभार असलेले राज्यमंत्री आणि इतर राज्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. मंत्रिमंडळ आणि संघटनात्मक फेरबदलाच्या चर्चांदरम्यान ही बैठक होत असल्याने तिचे राजकीय महत्त्वही अधिक वाढले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या बैठकीत विविध मंत्रालयांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला जाणार असून अलीकडील महत्त्वाच्या निर्णयांचे परिणाम आणि पुढील काळातील रणनीतीवर चर्चा केली जाणार आहे.

सरकारी योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे कशी करता येईल, नागरिकांना त्याचा जास्तीत जास्त फायदा कसा मिळवून देता येईल आणि विविध विभागांमध्ये समन्वय कसा वाढवता येईल, यावरही बैठकीत विशेष भर दिला जाण्याची शक्यता आहे. तसेच, केंद्र सरकारच्या विविध विकास योजनांच्या प्रगतीचाही आढावा घेतला जाऊ शकतो.

पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षाचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर आणि पुरवठा साखळीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे ऊर्जा, कृषी, खते, विमान वाहतूक, जहाजबांधणी आणि लॉजिस्टिक्स या महत्त्वाच्या क्षेत्रांवर बैठकीत विशेष चर्चा होऊ शकते. इंधन दरवाढीचा परिणाम वाहतूक आणि वस्तूंच्या किमतींवर होत असल्याने सरकार विविध मंत्रालयांना परिस्थिती हाताळण्यासाठी आवश्यक निर्देश देऊ शकते.

सूत्रांच्या माहितीनुसार, सामान्य नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी विविध उपाययोजनांवरही चर्चा होणार आहे. महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि आवश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी केंद्र सरकारकडून काही महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम आशियातील संघर्ष सुरू झाल्यानंतरच संबंधित मंत्रालयांना सतर्क राहण्याचे आणि नागरिकांच्या हितासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते. आजच्या बैठकीत त्या निर्देशांच्या अंमलबजावणीचाही आढावा घेतला जाऊ शकतो.

याशिवाय, भविष्यात उद्भवू शकणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारची तयारी, प्रशासनातील समन्वय आणि नागरिकांना दिलासा देणाऱ्या धोरणांवरही चर्चा होण्याची शक्यता आहे. काही सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘वर्क फ्रॉम होम’ संदर्भातही काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या जाऊ शकतात.

आज संध्याकाळी होणाऱ्या या बैठकीतून नेमके कोणते निर्णय समोर येतात आणि सरकार कोणती भूमिका घेते, याकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >